पूंछ ऑपरेशनची सामरिक मीमांसा | पुढारी

पूंछ ऑपरेशनची सामरिक मीमांसा

कर्नल अभय पटवर्धन

अलीकडेच पूंछ च्या थानामंडी क्षेत्रात जिहाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये दोन सेनाधिकार्‍यांसमेत नऊ सैनिक, दोन निष्पाप नागरिक आणि तीन पोलिस शहीद झाले. जिहादी पाकिस्तानमधून आले की, अनेक दिवस या क्षेत्रात वावरताहेत, याची शहानिशा अजून झालेली नाही. काश्मीरमध्ये स्लीपर सेल आता कार्यरत झाले आहेत, ही चिंतेची बाब आहे.

भारतीय सेना 11 ऑक्टोबर 2021 पासून काश्मीरमध्ये आजपर्यंत झालेल्या सर्व जिहादी दहशतवादविरोधी कारवायांपेक्षा मोठ्या आणि जटिल कारवाईत गुंतली आहे. ऑपरेशनमध्ये आजमितीला दोन सेनाधिकार्‍यांसमेत नऊ सैनिक, दोन निष्पाप नागरिक आणि तीन पोलिस शहीद झाले आहेत. जिहाद्यांनी पूंछ च्या थानामंडी क्षेत्रात 11 ऑक्टोबरला अंदाधुंद फायर करून एक नागरिक व दोन सैनिकांना शहीद केल्यानंत, त्या जिहाद्यांना शासन करण्यासाठी ‘ऑपरेशन ऑल आऊट’अंतर्गत ही कारवाई सुरू झाली.

त्याच दिवशी लाईन ऑफ कंट्रोलच्या (एलओसी) सुमारे 20 किलोमीटर आत सुरणकोटमधील नारखेस जंगलाजवळील गावात लपलेल्या जिहाद्यांशी झालेल्या चकमकीत या ऑपरेशनसंबंधी शोधकार्यात गुंतलेल्या सर्च पार्टीतील एक जेसीओ आणि चार सैनिकांची निर्घृण हत्त्या झाली. राष्ट्रीय रायफल (आरआर) युनिटचे हे पाचही वीर जवान चारमेर गावात काही जिहाद्यांनी ठाण मांडले आहे, अशी अशी खात्रीची बातमी मिळाल्यावर कारवाई करणार्‍या पेट्रोलचे अग्रणी असल्यामुळे जिहादी गोळ्यांच्या पहिल्याच भडिमाराला बळी पडले.

सेनेने संपूर्ण जंगली क्षेत्राची नाकाबंदी करून शोधकार्य सुरू केले. या जंगलातून पीरपंजाल पर्वत शृंखलेमार्गे श्रीनगर खोर्‍यातील शोपियाँमध्ये जाता येते. सेनेला अनेक वर्षांनंतर एकाच चकमकीत एवढी मोठी जीवहानी सहन करण्याची वेळ आली आहे. हे जिहादी नुकतेच पाकिस्तानमधून आले की, मागील काही दिवसांपासूनच या क्षेत्रात वावरताहेत, याची शहानिशा अजूनही होऊ शकलेली नाही.

पूंछ क्षेत्रातील सुरणकोट राजौरी महामार्गाच्या उत्तरेस असलेल्या भाटा धुरियां जंगलातील शोधकार्यात गुंतलेल्या सेना आणि आरआर सैनिकांच्या मदतीला पॅरा कमांडो, ड्रोन्स आणि हेलिकॉप्टर्सही तैनात केले आहेत. काश्मिरी पोलिसांनी चार स्त्रियांसमवेत 21 लोकांना जिहाद्यांना शिधा, जेवण आणि आसरा देण्याच्या आरोपाखाली अटक केली असून त्यांची उलट तपासणी सुरू आहे. या कारवाईची माहिती मला, माझ्या आजी व माजी सैनिक मित्रांकडून मिळाली.

60-70 चौरस किलोमीटर पसरलेल्या घनदाट जंगलात लपलेल्या पाकिस्तानात अथवा विदेशात प्रशिक्षित, प्रत्यक्ष संख्येबद्दल कल्पना नसलेल्या, पाक, काश्मिरी आणि विदेशी जिहादी दहशतवाद्यांविरुद्ध होणार्‍या कारवाईमध्ये यश मिळवायचे असेल, तर संयम आणि चिकाटीने केलेल्या, संथ आणि परिश्रमी कारवाईशिवाय दुसरा पर्याय नाही, हा स्वानुभव आहे. अशा इलाक्यातील घनदाट जंगलातील वृक्षवेलींमुळे सखोल टेहळणी कठीण असते.

आजमितीला विदेशी जिहादी, काश्मीरमधील जंगलांमध्ये लपून तेथेच आपली प्रशिक्षण शिबिरे चालवतात. यामुळे स्थानिक तरुणांना आतंकवादी प्रशिक्षणासाठी सीमा पार करून पाकिस्तानमध्ये जाण्याची गरज नसते. असे जिहादी व त्यांच्या शिबिरांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी हाती असलेल्या तंत्रज्ञानाचा अपेक्षित उपयोग होत नसला, तरी अशा सर्च ऑपरेशनमध्ये सामील हवाई टेहळणी व ध्वनी सर्वेक्षणासमवेत सर्व प्रकारचे तंत्रज्ञान वापरात आणावे लागते.

कारण, केव्हा, कुठे, कशी माहिती, कशा प्रकारे मिळेल, हे सांगता येत नाही. सर्च पार्टीच्या वाटेवर जिहाद्यांनी पेरलेल्या आयईडी शोधण्यासाठी शोधकयंत्र वापरावी लागत असल्यामुळे कारवाईची गती स्वाभाविकपणे संथ होते. सैनिक दमलेले असतील, तर जीवहानीची संभावना खूप मोठी असल्यामुळे अशा प्रकारच्या कारवाईत सैनिकांची यथायोग्य बदली करणे अपेक्षित असते.

अँटिटेररिस्ट ऑपरेशन्समध्ये उतावीळपणाला स्थान नसते. अ‍ॅक्शन करणार्‍या सेनाधिकार्‍यांनी धैर्य आणि चिकाटीचा अंगीकार करत बाष्कळ सूचना, टिप्पण्यांकडे सपशेल दुर्लक्ष करून जवानांना योग्य कारवाईची मुभा दिली, तरच सेनेला अशा कारवायांमध्ये यश मिळते. सर्व आक्षेपांना धैर्यानी तोंड देत, कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन सुरू ठेवण्याची वरिष्ठ अधिकार्‍यांची सामरिक चिकाटी हा जिहादीविरोधी ऑपरेशन्समधील सफलतेचा मापदंड असतो; मात्र त्याचबरोबर ऑपेरेशनमध्ये सहभागी झालेल्या युनिटस् आणि त्यामधील सैनिकांचा शारीरिक दणकटपणा, सामरिक धमक आणि नैर्सगिक सामर्थ्य अबाधित राखण्याची जबाबदारीही याच अधिकार्‍यांवर असते.

सध्या ऑपरेशन सुरू असलेला सुरणकोट राजौरी इलाका एलओसीच्या भारतीय बाजूस बराच आत असला, तरी पाकिस्तानी सेनेने केलेल्या गोळीबाराच्या आडोशात जिहादी, स्थानिक जयचंदांच्या मदतीने जंगली दर्‍यांमधून त्या क्षेत्रात आरामात घुसखोरी करू शकतात. जंगलातील सर्च ऑपरेशन बालपणीच्या लपाछपीच्या खेळासारखी असतात. लपणारे जिहादी नेहमी स्थिर व निष्क्रिय असतात. म्हणूनच त्यांना हुडकून त्यांचा वेध घेणे कठीण असते.

जोपर्यंत जिहाद्यांचा नक्की ठावठिकाणा उमजत नाही, त्यांच्याशी इफेक्टिव्ह कॉन्टॅक्ट होत नाही तोपर्यंत अशा ऑपरेशन्समध्ये पॅरा कमांडोसुद्धा यशस्वी होऊ शकत नाहीत. या ऑपरेशनमध्ये आलेल्या जिहाद्यांकडे भरपूर शिधासामग्री, दारुगोळा आणि पैसा असल्याशिवाय ते इतके दिवस टिकाव धरूच शकले नसते. जिहाद्यांनी गस्तीवर असलेल्यांवर स्नायपर रायफल्सनी हल्ला केल्याची शक्यता नाकारता येत नाही. सेनेचे नऊ जवान शहीद झाले, याचा अर्थ या जंगलात मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्र धारण केलेले जिहादी आहेत. या जिहाद्यांना नेपाळमार्गे मदत मिळते, अशी वदंता आहे.

पोलिसांनी पूंछ ऑपरेशनशी संबंधित तिघांना नेपाळला जाताना अटकही केली आहे. काश्मीरमध्ये स्लीपर सेल आता कार्यरत झालेले दिसताहेत. जिहाद्यांना स्थानिक जनतेचा पाठिंबा, सक्रिय सहानुभूती असल्याची शक्यता आहे. ही अतिशय चिंताजनक बाब असेल. कारण, याचा अर्थ अफगाणिस्तानमधील तालिबानच्या विजयानंतर पाकिस्तानी आयएसआय, काश्मिरी जनतेला परत एकदा कट्टर मूलतत्त्ववादी इस्लामी खलिफतच्या बाजूने झुकवण्यात सफल होत आहे, असा होतो. हे ऑपरेशन सुरू असतानाच काश्मीरमध्ये बर्फ वर्षाव सुरू झाला आहे.

त्यामुळे जर जिहाद्यांनी जंगलातून पीरपंजालमार्गे श्रीनगर खोर्‍यात जाण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचा ठावठिकाणा नक्‍की करणे सेनेला सहज शक्य होईल. जंगलात लपलेले जिहादी एकमेकांशी तसेच त्यांच्या पाकिस्तानी आकाशी सॅटेलाईट कम्युनिकेशनशिवाय दुसर्‍या कोणत्याही साधनांनी संपर्क साधू शकत नाहीत. त्यामुळे स्थानिक मोबाईल आणि इंटरनेट नेटवर्क बंद केले, तर इंटलिजन्स एजन्सीच्या ऑफ द एअर मोबाईल मॉनिटर्सच्या माध्यमातून जिहादी धोरणांचा कारवाईपूर्व आढावा घेता येईल. पाकिस्तान यापुढेही अशा कुरापती करतच राहील. त्यामुळे सेनेने मागील कारवायांपासून धडा घेत आपली पावले उचलणे अपरिहार्य असेल.

Back to top button