भाऊबीज : बंधू-भगिनींच्या नात्याचे अतूट बंधन | पुढारी

भाऊबीज : बंधू-भगिनींच्या नात्याचे अतूट बंधन

जुन्या कथेनुसार बहिणीने भावाचे रक्षण केले म्हणून भावाने तिला ओवाळणी घालण्याची पद्धत सुरू झाली. यमद्वितीयेच्या दिवशी नरकात खितपत पडलेल्या जीवांना एक दिवसापुरती मोकळीक मिळते, अशी श्रद्धा आहे. दीपावलीशी जोडला गेलेला पुढचा महत्त्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज. हा दिवस जोडला गेलेला असे म्हणण्याचे कारण की, यमद्वितीया आणि गोवत्सद्वादशी हे दोन वेगळे सण आहेत; पण ते दिवाळीला इतके लागून येतात की, त्यांचा समावेश दिवाळी उत्सवातच केला गेला. भाऊबीज म्हणजे यमद्वितीया. या दिवशी यमदेवता आपल्या बहिणीकडे म्हणजे यमुनेकडे जेवायला गेली. त्याची आठवण म्हणून त्या दिवसाला यमद्वितीया असे नाव पडले. या दिवशी भावाने बहिणीकडे जेवायला जाऊन तिला वस्त्र, अलंकार अशी एखादी भेट देण्याची प्रथा आजही पाळली जाते. जुन्या कथेनुसार बहिणीने भावाचे रक्षण केले म्हणून भावाने तिला ओवाळणी घालण्याची पद्धत सुरू झाली. यमद्वितीयेच्या दिवशी नरकात खितपत पडलेल्या जीवांना एक दिवसापुरती मोकळीक मिळते, अशी श्रद्धा आहे. यमद्वितीया हे एक व्रतदेखील असून, त्या दिवशी यमधर्म, यमदूत, यमुना, चित्रगुप्‍त, मार्कंडेय आणि पितर अशा सर्वांची पूजा करावयाची असते.

यम ही एक वैदिक देवता आहे. ती मृत्युरूप आहे. यमाचे काम आणि त्याचे सामर्थ्य वर्णन करणार्‍या अनेक ऋचा ऋग्वेदात आहेत. यमासह पितर राहतात. पूर्वज ज्या गमनमार्गाने गेले, तो मार्ग यम जाणतो आणि अग्‍नी हा यमाचा प्रतिनिधी आहे, असे विचार वैदिक साहित्यात आढळतात. वेदानंतरच्या काळात यमाचे रूप कठोर न्यायाधीश म्हणून मानले जाऊ लागले. काही निसर्गवादी जुन्या पंडितांनी यम हे मावळत्या सूर्याचे प्रतीक आणि विवस्वान हा यमाचा पिता उगवत्या सूर्याचे प्रतीक म्हणून मानला, तर काही जणांनी यम हा सूर्यास्ताचा आणि यमी ही त्याची जुळी बहीण रात्रीचा प्रतिनिधी असल्याची कल्पना मांडली.पौराणिक काळातील यम संकल्पनेत त्याला पितरांचे स्वामित्व दिल्याची कथा आढळते.

विष्णुधर्मोत्तर पुराणात यममूर्तीजवळ हातात लेखणी आणि भूर्जपत्र घेऊन यमाच्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या चित्रगुप्‍ताचे वर्णन आढळते. चित्रगुप्‍त हेही एक गंभीर प्रतीकच आहे. जीवमात्रांच्या पाप-पुण्याचा हिशेब ठेवणारा चित्रगुप्‍त यमाच्या दरबारातील मोठा अधिकारी आहे. यमलोकाजवळ चित्रलोक असतो, असा पौराणिक उल्‍लेख आहे. मृत्युदेवतेचे दूत ते यमदूत होय. त्यांच्या हातात त्रिशूळ, सोटा आणि अनेक प्रकारचे पाश असतात, असे मानले जाते.

यमुना ही पवित्र नदी आणि यमाची बहीण. कलिंद पर्वतातून तिचा उगम झाला म्हणून ती कालिंदी. पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भावरून दिसते, की यमुनेचा प्रवाह निरनिराळ्या वेळी बदलत राहिला. मानवी रूपातील यमुनेची अनेक देखणी शिल्पे आढळतात. यमुना हा कुर्मावर आरूढ दाखवली जाते. कृष्णचरित्रात यमुनेला असाधारण महत्त्व आहे.

अशाप्रकारे दीपावलीच्या उत्सवात विविध नात्यांचे पावित्र्य, गांभीर्य, आधार आणि आनंद जपण्याचा उद्देश दिसतो. वर्तमान काळासह वेळोवेळी भूतकाळाचे म्हणजे पितरांचे स्मरण दिसते. आकाशदिव्याच्या स्थापनेपासून याचे पडसाद दिसतात. विशेषतः अष्टदलाकृती दिव्याचे महत्त्व दिसते. त्याखाली काढलेल्या अष्टदलाकृती कमळात धर्म, हर, भूती, दामोदर, धर्मराज, प्रजापती, पितर आणि प्रेत यांच्या आदरार्थ आठ दिवे लावण्याची प्रथा प्राचीन काळात होती. आमावस्येच्या दिवशी महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती यांच्या पूजेसाठी शाईची दौत, रुपया आणि वही ही प्रतीके ठेवली जातात. यक्षरात्री, दीपालिका उत्सव, दीपप्रतिपदुत्सव, दीपमाला उत्सव, दीपोत्सव अशा विविध शब्दांनी संस्कृत वाङ्मयात दीपावलीचा उल्‍लेख दिसतो आणि सर्व मराठी लोकांच्या चिरपरिचयाचा ‘दिवाळी’ हा शब्द प्रचलित झालेला दिसतो, तो इसवीसनाच्या अकराव्या शतकापासून! श्रीपती नावाच्या ज्योतिषाचार्यांनी आपल्या ‘ज्योतिषरत्नमाला’ नावाच्या ग्रंथावरील मराठी टीकेत ‘दिवाळी’ हा शब्द योजला.

सार्‍यांची मने आणि घरे प्रसन्‍न पणतीतील दीपकन्यांनी उजळून टाकणारा दिवाळी हा सण लौकिक आणि पारलौकिक आकांक्षांना व्यक्‍त करणारा मोठा उत्सव होय!

Back to top button