गेले अनेक महिने मराठीच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर माध्यम वर्तुळात चर्चा असलेली 'पुढारी न्यूज' ही वृत्तवाहिनी जगभरातील मराठी भाषिकांच्या सेवेसाठी मंगळवारी थाटात दाखल झाली. पत्रकारितेच्या क्षेत्रातील साडेआठ दशकांची परंपरा असलेल्या 'पुढारी' समूहाने इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दमदार पाऊल टाकले आणि माध्यमांच्या सर्व क्षेत्रांत एकाचवेळी संचार असणारा 'पुढारी' हा एकमेव मराठी वृत्तसमूह बनला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची लखलखती परंपरा असलेल्या महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराजांच्या समताभूमी कोल्हापूरमधून 'पुढारी'ची सुरुवात झाली. 'कैवारी', 'सेवक'च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर 'पुढारी'चे संस्थापक-संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी 1937 मध्ये 'पुढारी' साप्ताहिक सुरू केले आणि 1 जानेवारी 1939 रोजी त्याचे दैनिकात रूपांतर झाले.
भास्करराव जाधव, प्रबोधनकार ठाकरे, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर आदींच्या सत्यशोधकी सहवासात त्यांची जडणघडण झाली आणि त्यातूनच त्यांनी पत्रकारितेचे असिधारा व्रत स्वीकारले. महात्मा गांधी यांनी उभारलेल्या स्वातंत्र्यलढ्यात हिरिरीने सहभाग घेतानाच स्वातंत्र्यसेनानी डॉ. ग. गो. जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहासह अनेक सामाजिक चळवळींतून सहभाग घेतला. सदैव जनतेसमवेत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसमवेत निर्भीडपणे राहण्याचा तोच वारसा 'पुढारी'ने अखंडितपणे चालवलाच शिवाय मराठी पत्रकारितेचे प्रांगण तेजस्वी पत्रकारितेने समृद्ध केले. पश्चिम महाराष्ट्रच नव्हे, तर कोकण, मुंबई, मराठवाडा, गोवा, उत्तर कर्नाटक अशा विविध भागांमध्ये 'पुढारी'चा विस्तार झाला. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात तर वृत्तपत्र म्हणजे 'पुढारी' हे समीकरण बनले.
'पुढारी'ची डिजिटल आवृत्तीही आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे आणि 'टोमॅटो' एफएम वाहिनी राज्यातील प्रमुख एफएम वाहिन्यांमध्ये अग्रस्थानी आहे. माध्यम क्षेत्रातील ज्या-ज्या प्रांतात 'पुढारी'ने पाऊल टाकले तेथील पुढारीपण आपसूकच स्वतःकडे घेतले. बड्या साखळी वृत्तपत्रसमूहांचे आव्हान परतवून अग्रस्थान टिकवले. हाच आत्मविश्वास घेऊन 'पुढारी न्यूज' ही टीव्ही वृत्तवाहिनी दाखल झाली आहे. वाहिन्यांच्या गर्दीत केवळ आणखी एक वाहिनी आणायची असा द़ृष्टिकोन ठेवून हे पाऊल टाकलेले नाही. जे करायचे ते अस्सल आणि स्वतंत्र बाण्याचे, ही 'पुढारी'ची परंपरा आणि त्याच परंपरेला जागून 'पुढारी न्यूज' वृत्तवाहिनी मराठी माणसाच्या सेवेत आली आहे.
या वाहिनीच्या माध्यमातून सामान्य माणसांचे प्रश्न सत्ताधार्यांसमोर मांडण्याची कामगिरी निष्ठापूर्वक पार पाडली जाईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या क्षेत्रातील अनुभवी, तसेच नव्या दमाची कल्पक टीम 'पुढारी न्यूज'कडे आहे. शिवाय महाराष्ट्राच्या गावागावांतील खडान् खडा माहिती सर्वात आधी पोहोचवणारे 'पुढारी'चे वार्ताहरांचे व्यापक जाळे आहे आणि या सगळ्याच्या मुळाशी 'पुढारी'च्या स्वतंत्र बाण्याच्या पत्रकारितेची परंपरा आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा गटाशी बांधिलकी नसणारा 'पुढारी' हा एकमेव वृत्तसमूह. त्यामुळे निष्पक्ष बातम्या आणि सखोल, परखड विश्लेषणासाठी महाराष्ट्रातील वाचक 'पुढारी'लाच प्राधान्य देतो. सामान्य माणूस हा केंद्रबिंदू आणि दर्शकांशी बांधिलकी ठेवून 'पुढारी न्यूज'च्या माध्यमातून हीच परंपरा पुढे नेण्याची ग्वाही आम्ही देतो.
देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झाली. भारत देश एका नव्या वळणावर पोहोचला असून सध्याच्या काळाला 'अमृतकाळ' म्हटले जाते. अमृतकाळात भारत देश नवनवी क्षितिजे पादाक्रांत करीत आहे. या सगळ्या बदलांचा, देशाच्या उभारणीचा आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीचा 'पुढारी' केवळ साक्षीदारच नव्हे, तर भागीदारही आहे. पत्रकारितेला दिलेली सामाजिक बांधिलकीची जोड आणि भरीव योगदान हे 'पुढारी'चे वैशिष्ट्य. अनेक राष्ट्रीय आपत्तींमध्ये 'पुढारी'ने केलेली मदत आणि सियाचीनसारख्या ठिकाणी सैनिकांसाठी उभारलेले हॉस्पिटल ही त्याची ठळक उदाहरणे. महासत्तेचे स्वप्न पाहणार्या आणि त्या दिशेने दमदार, आश्वासक पाऊल टाकणार्या भारताच्या कर्तृत्वाचा डंका जागतिक पातळीवर अनेक क्षेत्रांत वाजत आहे. अशा सगळ्या झळाळत्या काळात 'पुढारी न्यूज' ही वाहिनी दाखल झाली आहे.
अंधःकारात अडकलेल्या माणसांना प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी एका सशक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाची गरज होती आणि ती गरज 'पुढारी न्यूज' निश्चितपणे पार पाडल्याशिवाय राहणार नाही. एका नव्या भारताचे, त्याच्या अंतरंगाचे, अंतरंगातील लखलखत्या उजेडाचे दर्शन देशवासीयांना घडवण्याची माध्यमांची जबाबदारी असल्याचे आम्ही मानतो. प्रसारमाध्यमांनी सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडून ते प्रश्न राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावेत आणि त्यासंदर्भात दबाव वाढवून त्यांची सोडवणूक करून घ्यावी, अशी अपेक्षा केली जाते. आजवर 'पुढारी' ते करीत आला आहे. 'पुढारी न्यूज' टीव्ही वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ते काम अधिक प्रभावीपणे केले जाईल.
'पुढारी न्यूज' हा सामान्य माणसांचा आवाज बनेल. सध्याचा काळ हा राजकारणाच्या प्रभावाचा काळ. निष्पक्षपणा आणि वस्तुनिष्ठता जपत विश्वासार्हता कधीच ढळू न देता 'पुढारी'ने ते व्रत नेमस्थपणे जपले. वाचकाचा तोच प्राण. 'पुढारी न्यूज' वृत्तवाहिनीच्या माध्यमातून निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ बातम्या दर्शकांपर्यंत पोहोचवल्या जातील. कोणत्याही दबावाशिवाय दिल्या जाणार्या बातम्या हे 'पुढारी न्यूज'चे वैशिष्ट्य राहील. मुद्रितमाध्यमांची परंपरा मोठी असली, तरी इलेक्ट्रॉनिक माध्यमे तरुण आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा दर्शकही तुलनेने तरुण आहे. या तरुणांच्या आकांक्षांना पंख देण्याचे काम या नव्या माध्यमातून करण्याची ग्वाही आम्ही देतो. चोवीस तास बातम्या देणार्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशातील त्याचबरोबर जगभरातील मराठी दर्शकांना माहिती आणि ज्ञानाच्या बाबतीत अद्ययावत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका 'पुढारी न्यूज' पार पाडेल. सर्व वयोगटातील, सर्व समाज घटकांतील, आर्थिक-सामाजिक स्तरातील लोकांना आपले हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. जनतेचा आवाज 'पुढारी न्यूज' बुलंद करेल. 'पुढारी'ला मराठी वाचकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद जगभरातील मराठी दर्शक या वृत्तवाहिनीला देतील, असा आम्हाला विश्वास वाटतो.