उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक : यूपीत आघाड्यांची जुळवाजुळव | पुढारी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक : यूपीत आघाड्यांची जुळवाजुळव

उत्तर प्रदेश चे राजकीय वातावरण तापू लागले आहे. छोट्या पक्षांना सोबत घेऊन आघाड्या बनविण्याच्या कामात प्रमुख राजकीय पक्ष मग्न झाले आहेत. मोर्चेबांधणीत भाजप आणि सप आघाडीवर आहेत. पश्चिम बंगालच्या पराभवानंतर भाजप उत्तर प्रदेशात प्रत्येक पाऊल सावधपणे टाकत आहे.

सन 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिलेला नसताना देखील पक्षाला एकहाती सत्ता मिळाली होती. यावेळी योगी आदित्यनाथ यांच्यासारखा सशक्त चेहरा भाजपकडे आहे. दुसरीकडे मागील अपयश विसरून समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव भाजपला चीत करण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजप आणि सप यांच्याकडून राजकीय व जातीय समीकरणांचे आडाखे बांधले जात आहेत. उत्तर प्रदेशातला मायावती यांचा करिश्मा बर्‍याच प्रमाणात ओसरला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर बसपच्या सहा आमदारांनी मायावतींना रामराम करून सपमध्ये प्रवेश केला आहे.

अर्थातच बसपची बाजू यामुळे आणखी कमकुवत बनली आहे. राज्यातल्या सात छोट्या पक्षांनी भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. तर, गतवेळी भाजपसोबत असलेला ओमप्रकाश राजभर यांचा सुहेलदेव भारतीय समाज पक्ष यंदा अखिलेश यांच्या व्यासपीठावर जाण्याची शक्यता बळावली आहे. भाजप आघाडीत सामील असलेल्या पक्षांत भारतीय मानव समाज पार्टी, मुसाफीर आंदोलन पक्ष, शोषित समाज पक्ष, मानवहित पार्टी, सुहेलदेव जनता पार्टी, पृथ्वीराज जनशक्ती पार्टी आणि भारतीय समता समाज पार्टी यांचा समावेश आहे. तुलनेने हे पक्ष खूप छोटे असले तरी त्या-त्या जिल्ह्यांतील त्यांची ताकद विसरता येण्याजोगी नाही.

संबंधित बातम्या

ओमप्रकाश राजभर यांच्या भारतीय सुहेलदेव पक्षाने गत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम करून ओवैसी यांच्या एमआयएमसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, ओवैसी यांच्यासोबत त्यांचा विसंवाद असल्याची जोरदार चर्चा आहे. ओवैसी यांनीच नव्याने स्थापन केलेल्या भागीदारी संकल्प मोर्चात सामील व्हावे, असे आवाहन राजभर यांनी केले आहे. भागीदारी संकल्प मोर्चात जे पक्ष सामील आहेत, त्यात भीम आर्मी, राष्ट्रीय उदय पार्टी, राष्ट्रीय उपेक्षित समाज पार्टी आणि जनता क्रांती पार्टी यांचा समावेश आहे.

आता हा गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवितो की अखिलेश यादव यांना पाठिबा देतो, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात प्रबळ असलेला राष्ट्रीय लोकदल कोणती भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरी आंदोलनात या पक्षाने पुढाकार घेतला होता. शेतकर्‍यांच्या मुद्द्यावर भाजप अपयशी ठरल्याचे सांगत रालोद नेते जयंत चौधरी यांनी सपसोबत जाण्याचे संकेत दिले आणि त्यामुळेच ते सपसोबत जाणार काय, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राजकीय पक्षांच्या या भाऊगर्दीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांसारखे राष्ट्रीय स्तरावरचे पक्षदेखील प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी बनविण्यासाठी धडपडत आहेत. काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी कोणताही पक्ष तयार नाही. त्यामुळे प्रियांका गांधी-वधेरा यांना एकट्यालाच सगळी ताकद पणाला लावावी लागत आहे. विधानसभा निवडणुकीत महिलांना 40 टक्के तिकिटे दिली जातील, असे सांगून प्रियांका यांनी महिला कार्ड खेळले आहे. मात्र, राज्यातली पक्षाची दयनीय अवस्था पाहता हे कार्ड कितपत चालणार, हा प्रश्न आहेच. आघाडीच्या दृष्टीने आमची दारे उघडी असल्याचे काँग्रेसने अलीकडेच सांगितले आहे, यावरून बरेच काही स्पष्ट होते.

मुसंडी मारण्याचा ‘आप’चा प्रयत्न

दिल्लीतील यशाची पुनरावृत्ती पंजाब, उत्तराखंडप्रमाणे उत्तर प्रदेशात करण्याचा आप नेते अरविंद केजरीवाल यांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस त्यांनी लखनौमध्ये विशाल जाहीर सभेचे आयोजन केले आहे. दिल्लीप्रमाणेच उत्तर प्रदेश व उत्तराखंडच्या नागरिकांना मोफत वीज, मोफत पाणी, मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य सुविधा देण्याची घोषणा त्यांनी याआधीच केली आहे. उत्तर प्रदेश हे महत्त्वाचे राज्य असल्याने जास्तीत जास्त वेळ या राज्यावर केंद्रित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. केजरीवाल यांनी अलीकडेच अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले होते.

संपूर्ण उत्तर प्रदेशात ‘आप’ची छाप पडणे कठीण असले तरी दिल्लीला लागून असलेल्या भागात ‘आप’मुळे मतांचे विभाजन होऊ शकते. याचा फायदा भाजपला होणार की सपला हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मायावती यांच्या बसपसाठी ही निवडणूक ‘करो वा मरो’ची ठरणार आहे. लोकसभा असो वा विधानसभा निवडणूक असो, सातत्याने बसपच्या पदरी अपयश पडत आहे. सोशल इंजिनिअरिंगचे मायावती यांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत.

भाजपकडून उच्चवर्णीयांवर अत्याचार सुरू असल्याचा आरोप मायावती यांनी चालविला आहे. थोडक्यात, दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण अशी मोट बांधण्याचा मायावती यांचा प्रयत्न राहील, असे दिसते. आगामी निवडणुकीतही मायावती यांना पराभवाला सामोरे जावे लागले तर त्यांच्या पक्षाची अवस्था केविलवाणी झाल्याशिवाय राहणार नाही. तिकडे भाजपला तोडीस तोड अशी टक्कर देण्याचा चंग अखिलेश यादव यांनी बांधला आहे. भाजपचा चक्रव्यूह भेदण्यात त्यांना यश येणार की नाही, हे येणारा काळच सांगणार आहे.

Back to top button