कोल्हापूर : फरांडेबाबांचा हेडाम, पट्टणकोडोलीत विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ | पुढारी

कोल्हापूर : फरांडेबाबांचा हेडाम, पट्टणकोडोलीत विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ

पट्टणकोडोली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध— प्रदेश, गोवा, उत्तर प्रदेश आदी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल बिरदेव यात्रेला सोमवारपासून प्रारंभ झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गाव पातळीवर पुजारी व मानकरी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पूर्ण करण्यास परवानगी दिल्याने मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत फरांडेबाबांचा हेडाम व भाकणूक सोहळा पार पडला.

यात्रेत भाविकांनी उधळलेल्या भंडार्‍याने पट्टणकोडोलीनगरी सुवर्णमय झाली. चार दिवस यात्रा चालणार आहे. प्रथम गावचावडीत मानाच्या तलवारीचे पूजन झाले. तलवारीसह प्रकाश पाटील, रणजित पाटील यांच्यासह गावडे, कुलकर्णी, जोशी, आवटे, चौगुले, मगदूम आदी मानकरी व धनगर समाजाची पंच मंडळी हे फरांडेबाबांना भेटण्यासाठी निघाले. ढोल, ताशा वाजत-गाजत भंडार्‍याच्या उधळणीत ही मिरवणूक भानस मंदिर, कालेश्वर मंदिर, ‘श्रीं’चे मंदिर या मार्गाने मंदिरासमोरील मानाच्या दगडी गादीजवळ दुपारी आली. या गादीवर नानादेव फरांडेबाबांना आलिंगन देऊन मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर भंडार्‍याची, लोकर, खारीक, खोबर्‍याची उधळण करण्यात आली. मंदिरातील गाभार्‍यात हेडाम खेळत तलवार पोटावर मारून घेत भाकणूक केली.

पाच दिवस चालणार्‍या यात्रेवर कोरोनाच्या निर्बंधांचे सावट जाणवत होते. अंदाजे दहा ते पंधरा कोटींची उलाढाल ठप्प झाली.

…अशी केली भाकणूक ( फरांडेबाबांचा हेडाम )

रोहिणीचा पाऊस, मृगाचा पेरा होईल. तांबडं धान्य (मिरची, गूळ, हरबरा) व रस भांडं (ऊस) कडक होईल. कानानं ऐकाल; पण डोळ्यानं पाहणार नाहीसा. माझी सेवा कराल तर मेवा खाशीला, सेवा करणार्‍याला कांबळ्याखाली घेईन. सात दिवसांत पाऊस पडेल.

Back to top button