जम्मू-काश्मीर : कठोर मार्गांचा अवलंब करण्याची वेळ... - पुढारी

जम्मू-काश्मीर : कठोर मार्गांचा अवलंब करण्याची वेळ...

- श्रीराम जोशी

जम्मू-काश्मीर खोर्‍यात हिंदू-शीखांच्या राजरोस होत असलेल्या हत्या, बांगला देशात धर्मांधानी हिंदू लोकांच्या घरांची, मंदिरांची चालविलेली जाळपोळ, तिकडे चीनने लडाख आणि ईशान्य भारतात युद्धाच्या द‍ृष्टीने चालविलेली तयारी अशा घडामोडी केंद्र सरकारच्या द‍ृष्टीने चिंताजनक बनल्या आहेत. एकाचवेळी सुरू असलेल्या या घटनाक्रमांचा विचार केला, तर फार मोठा कट यामागे शिजतो आहे की काय, अशी शंका येण्यास निश्‍चितपणे वाव आहे.

अफगाणिस्तानवर जेव्हापासून तालिबानने कब्जा केला आहे, तेव्हापासून जम्मू-काश्मीर खोर्‍यातील दहशतवादी हल्ले आणि हिंदू शीखांना वेचून मारण्याचे प्रकार वाढले आहेत. नेमके याचवेळी ‘कुराण’चा अपमान केल्याचे सांगत (जाणीवपूर्वकपणे दुर्गा मंडपात ‘कुराण’ ठेवणारा मुस्लिम व्यक्‍ती पकडला गेला आहे.) हिंदूंविरोधात आगडोंब उसळविण्यात आला आहे. तिकडे चीनने सर्व प्रकारची आधुनिक शस्त्रास्त्रे सीमारेषांवर तैनात केली आहेत. एकाचवेळी अनेक आघाड्यांवर आव्हाने निर्माण झाल्याने सरकारला आगामी काळात डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे, हे वास्तव आहे.

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही जुमानत नसलेल्या चीनने गेल्या काही वर्षांत भारतासह विविध शेजारी देशांसोबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. अर्थकारण आणि तंत्रज्ञानात मोठी मजल गाठल्यानंतर चीनने आपला खरा रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. गतवर्षी लडाखच्या गलवान खोर्‍यात आगळीक करण्याचा प्रयत्न चीनने केला होता आणि त्याला भारतीय सैनिकांनी जशास तसे उत्तर दिले होते. चीनने सीमेवर चालविलेल्या घातक हालचाली लक्षात घेऊन केंद्र सरकारने संपूर्ण चिनी सीमांवरील सुरक्षा सज्जता वाढविली आहे. तेथील सैनिकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. चीन फक्‍त भारताला सतावू पाहत असे नाही, तर तैवान गिळंकृत करण्याचा जाहीर इशारा चिनी पंतप्रधान जिनपिंग यांनी अलीकडेच दिला आहे. तिकडे व्हिएतनाम, फिलिपाईन्स, जपान आदी देशांच्या सागरी हद्दीवर आणि विविध बेटांवर दावा सांगत चीन शक्‍तिप्रदर्शन करीत आहे. ऑस्ट्रेलिया लिथुआनिया या देशांनाही वारंवार चिनी नेते धमकी देत आहेत. चीनची प्रतिमा धमकीबाज अशी बनली असली, तरी ते केव्हा दगाफटका करतील, याचा काहीच नेम नसल्याने सर्वच देशांना आपल्या ताकदीमध्ये येत्या काळात प्रचंड प्रमाणात वाढ करावी लागणार आहे. त्यातही भारताची मोठी सीमारेषा चीनला लागून आहे. त्यामुळे चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताला साम – दाम – दंड – भेद अशा सर्व पर्यायांचा वापर करावाच लागणार आहे. ती इच्छाशक्‍ती तयार करणे ही देशासाठी काळाची गरज बनली आहे.

कामगारांची पिळवणूक, व्यापाराच्या क्षेत्रात छक्केपंजे वापरणे, आयपी-कॉपीराईटचे सर्रास उल्लंघन, स्थानिक उद्योगांना प्रचंड सबसिडी देणे, विविध देशांत वस्तूंचे डंपिंग करणे आदी माध्यमांतून चीनने जागतिक व्यापार क्षेत्र पादाक्रांत केले आहे. त्याचा मुकाबला करणे आता अमेरिकेसह विविध देशांना कठीण जात आहे. चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी जगाला उपाय शोधावेच लागणार आहेत. पैसा आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर दादागिरी करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. लडाखपाठोपाठ ईशान्य भारतात सीमारेषांवर चीन करीत असलेली लष्करी तयारी देशासाठी चिंताजनक बाब बनत आहे. अरुणाचल प्रदेशजवळच्या सीमांवर चीन सैनिकांसाठी मोठ्या प्रमाणात घरे बांधत असून तिथे लष्करी सरावही सुरू आहे. एकीकडे सीमावादावर चर्चा करण्याचे नाटक करायचे आणि त्याचवेळी सीमेवरील सज्जता वाढवायची, अशी दुटप्पी खेळी चीनकडून सुरू आहे. आसामला लागून असलेल्या 1,346 किलोमीटर लांबीच्या सीमांवर चीनची वर्दळ वाढली आहे. सिक्‍कीम-भूतान-तिबेट सीमांवर डोकलामजवळ 2017 मध्ये चीनने वाद उकरून काढला होता. ईशान्य भारताला उर्वरित देशांशी जोडण्याच्या द‍ृष्टीने हा भाग महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे लष्कराला या भागात विशेष काळजी घ्यावी लागत आहे. चिनी तयारीचा अंदाज घेतला, तर आगामी काळात घुसखोरीची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा लष्करी तज्ज्ञांनी दिलेला आहे. अरुणाचलच्या तवांगमध्ये याआधी युद्ध झाले होते. हा भागही सुरक्षेच्या द‍ृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. भारताविरोधात कारवाया करण्यासाठी यावेळी चीन जास्त सक्रिय झाला असल्याचे आणि त्यासाठी त्याचा गुलाम असलेल्या पाकिस्तानची मदत घेत असल्याचे दिसून येत आहे. जम्मू-काश्मीर खोर्‍यातील दहशतवादी हल्ल्यात झालेली वाढ, हिंदू-शिखांचे सुरू असलेले हत्याकांड ही त्याची उदाहरणे आहेत. त्याचवेळी बांगला देशात हिंदूंविरोधात जाणीवपूर्वक हिंसाचार घडवून आणला जात आहे. चीनच्या सांगण्यावरून जिहादी संघटनांच्या माध्यमातून पाकिस्तान ही खेळी खेळत आहे. बांगला देशात हिंदू लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तेथील पंतप्रधान शेख हसीना यांनी कारवाईचे आश्‍वासन दिलेले असले, तरी बांगला देशातील घडामोडींमुळे भारतीयांच्या मनात प्रचंड असंतोष  आणि संताप खदखदत आहे. ही खदखद कोणत्या मार्गाने बाहेर पडेल, याची काही शाश्‍वती नाही. त्यामुळे केंद्राला बांगला देशवर मोठा दबाव आणावा लागेल, अन्यथा कारवाईसाठी अन्य पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. भारतात बांगलादेशी घुसखोरांची, रोहिंग्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना कायमचे हाकलून लावण्यासाठी देखील सरकारला गंभीर व्हावे लागेल. बांगला देश जर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या मार्गाने जाणार असेल, तर बांगला देशला लागून असलेल्या सीमादेखील मजबूत कराव्या लागतील. एरव्ही केंद्र सरकारविरोधात तुटून पडणार्‍या विरोधी पक्षांनी राष्ट्रहिताच्या काही मुद्द्यांवर राजकारण न करता देशहितासाठी सरकारचे समर्थन करणे आवश्यक ठरते. धोक्याची पातळी वाढलेली आहे. शत्रू हा शत्रू असतो. तो वार करताना हा सत्ताधारी… तो विरोधक, हे काही पाहत नाही. किमान याचे तरी भान देशातल्या विरोधी पक्षांनी ठेवणे आवश्यक आहे.

Back to top button