शाळा : गुरुजींना कोणता डोस हवाय? | पुढारी

शाळा : गुरुजींना कोणता डोस हवाय?

दीड वर्षानंतर शाळा सुरू झाल्या. शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावी असे वर्ग भरू लागले; पण अजूनही काही गुरुजींचा शाळेत जाण्याचा मूड दिसत नाही. ज्या पालकांनी मुलांना शाळेत जाण्याची परवानगी दिली, ती मुले उत्साहाने शाळेत जाऊ लागली. ज्यांची शाळा लांब आहे. ती मुलेदेखील आम्हाला शाळेत नेऊन सोडा, असा हट्ट पालकांकडे धरू लागली आहेत. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील तब्बल बत्तीस हजार शिक्षक अजूनही घरीच आहेत. शाळेत जायचे कसे? वाहनांची सोय नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. कोरोना योद्ध्यांना लोकल प्रवासाची जशी मुभा दिली तशी आम्हालाही द्या, म्हणून शिक्षक संघटना अडून बसल्या आहेत. शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या असल्या तरी घरूनच शिकवू द्या, अशीही मागणी काही शिक्षकांनी केलेली दिसते. वास्तविक दोन डोस झालेल्यांना लोकलचा पास आता सहज मिळतो. सर्वसामान्य नोकरदार आणि व्यावसायिकांनीदेखील लस घेऊन काम सुरू केले आहे. लसीकरण सुरू झाले तेव्हाच सर्व शिक्षकांनी प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले होते. त्यानुसार बहुतेक शिक्षकांनी आपले दोन्ही डोस घेतलेदेखील. मग या 32 हजार शिक्षकांचे घोडे कुठे अडले? त्यांना खरोखरच आपले कर्तव्य पार पाडायचे आहे की नुसतेच दिवस ढकलायचे आहेत? शाळा पुन: सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिक्षण विभागाने शाळांमध्ये शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. तत्पूर्वी लसीकरण केंद्रावर शिक्षकांना प्राधान्य द्या, अशा सूचना प्रशासनाने याआधीच दिल्या होत्या. त्यामुळे शिक्षकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, असे गृहीत धरता येईल. त्यामुळे लोकल प्रवासाचा पास मिळत नाही, हा युक्तिवादाचा मुद्दा होऊ शकत नाही. तरीही हे शिक्षक थातुरमातूर कारण देत शाळेत जाण्यास नकार देत आहेत. यामागची कारणे तपासण्याची वेळ आली आहे. एक तर गेल्या दीड वर्षामध्ये घरातूनच ऑनलाईन शिकवणे झाल्यामुळे या शिक्षकांची मानसिकता बदललेली असू शकते. या ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षकांच्या प्रवासाची दगदग थांबली होती. प्रवासाचा खर्चही वाचला होता. शाळेतील इतर कामे तसेच संघटनांचे इतर उपक्रमदेखील बंद होते. एकूणच घरात बसून निवांतपणे शिकवल्यामुळे एक प्रकारचा आळस या शिक्षकांमध्ये भिनला असावा. त्यामुळे आता पुनश्च हरि ओम करणे या शिक्षकांच्या जीवावर आले आहे. कोरोना काळात लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या. हजारो व्यवसाय बंद पडले. तसे शिक्षकांच्या बाबतीत झाले नाही. ना त्यांचा पगार थांबला, ना पगारात कपात झाली. तरीही हे शिक्षक शाळेत येण्यास आढेवेढे घेत असतील तर प्रशासनाने अशा शिक्षकांच्या विरोधात हयगय न करता कठोर पावले उचलावीत.

लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना घरीच ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयोग झाला. निव्वळ अभ्यासक्रम पूर्ण करणे इतकाच या प्रयोगाचा उद्देश होता. त्यातही या ऑनलाईन शिक्षणात केवळ दहा टक्के मुलांनीच मनापासून भाग घेतला. विद्यार्थ्यांना वर्गात प्रत्यक्ष शिकवणे आणि ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणे यात मोठा फरक आहे. ऑनलाईन शिक्षण हे एकसुरी आणि एकतर्फी वाटते. ज्या ठिकाणी मोबाईलचे नेटवर्क व्यवस्थित मिळते, अशा शहरी भागातच या ऑनलाईन शिक्षणाचा थोडाफार फायदा विद्यार्थ्यांना झाला असेल. ग्रामीण भागात हे ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून गेले. मोबाईल नसणे आणि असलाच तर नेटवर्क नसणे अशा परिस्थितीत खेड्यापाड्यातील मुलांचे शिक्षण असे ऑनलाईन उरकण्यात आले. ऑनलाईन कसे शिकवावे हे इथे शिक्षकांनाच माहीत नव्हते, त्याचे प्रशिक्षणही त्यांना दिले गेले नव्हते. तिथे या ऑनलाईन शिक्षणात मुलांचा बौद्धिक विकासही कसा झाला याबद्दल साशंकताच आहे. शाळेतील प्रत्यक्ष शिक्षणामुळे मुलांच्या बौद्धिक विकासासोबतच त्यांच्या अंगभूत कलागुणांनाही वाव मिळतो. प्रत्यक्ष शिक्षण म्हणूनच अत्यंत गरजेचे आहे, हे शिक्षण विभागही जाणतो. त्यामुळेच कोरोनाचा प्रभाव कमी होताच शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर मुलांपेक्षा अधिक उत्साहाने शिक्षक शाळांमध्ये दाखल होतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार सत्तर टक्के शिक्षकांनी शाळेत हजेरी लावलीही, पण उर्वरित शिक्षक अजूनही शाळेकडे फिरकण्यास तयार नाहीत. लोकल पास मागायचा किंवा डोस घेतले नाही म्हणून सांगायचे यापेक्षा तिसरे कारण या शिक्षकांकडे नाही. शाळेत गेलो काय किंवा न गेलो काय नोकरी शाबूत आहे, आपल्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, अशा कोरोना जिंदाबाद भ्रमात हे शिक्षक असू शकतात. शिक्षणाची बुज राखण्यासाठी शिक्षक संघटनांनीही आता अशा दांडीबहाद्दर शिक्षकांच्या पाठीशी अजिबात उभे राहता कामा नये. आधीच दीड वर्षापासून मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. शिक्षणाच्या क्षेत्राला रुळावर आणण्यासाठी काही काळ कठोर मेहनत घ्यावी लागेल. प्रत्यक्ष आणि आभासी यात सर्वच क्षेत्रांमध्ये फरक दिसतो. शाळाच नव्हे सर्वच कार्यालये लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन सुरू होती. विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली होती. या कंपन्यांनीदेखील आता कर्मचार्‍यांना कार्यालयात बोलावण्यास सुरुवात केली आहे. टीसीएससारख्या भारतातील सर्वात मोठ्या कंपनीनेही आपल्या कर्मचार्‍यांना त्याठिकाणी कोणतीही सबब न देता हजर होण्याचे आदेश काढले आहेत. जे कर्मचारी हजर होणार नाहीत त्यांना तत्काळ कामावरून कमी केले जाणार आहे. असा डोस बहुदा शिक्षकांनाही द्यावा लागेल. फार पूर्वी गावातील एक-दोन विद्यार्थी शाळेला ठरवून दांडी मारत. गुरुजींच्या ते लक्षात आले की चार मजबूत विद्यार्थी पाठवून त्या मुलांना उचलबांगडी करून शाळेत आणले जात असे. तशी वेळ आता दांडी बहाद्दर शिक्षकांनी सरकारवर आणू नये.

Back to top button