विजयेशु दसरा | पुढारी

विजयेशु दसरा

कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करण्यासाठी दसरा अर्थात विजयादशमी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवसाचे महत्त्व सांगणारे अनेक दाखले पुराणात आढळतात. वाईट प्रवृत्तींचा नाश आणि सत्प्रवृत्तीचा विजय हे तत्त्व विविध कथांमधून व्यक्त होते. संघर्ष नेहमी चांगल्या आणि वाईट शक्तीत होतो आणि यामध्ये विजय नेहमीच चांगल्या शक्तीचाच होतो, हाच संदेश विजयादशमी साजरा करण्यामधून व्यक्त होत असतो.

नवरात्राचे नऊ दिवस सरले की, आश्विन शुद्ध दशमीला देशभरात दसरा अर्थात विजयादशमी साजरी केली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस कुठल्याही चांगल्या, नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवसाचे महत्त्व सांगणारे अनेक दाखले पुराणातील कथांमध्ये सापडतात. याच दिवशी श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध करून सीतामातेला त्याच्या जोखडातून मुक्त केले. त्याचे स्मरण म्हणून आजही गावोगावच्या मैदानावर रावणाचे पुतळे जाळून विजयोत्सव साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तीचा नाश आणि सत्प्रवृत्तीचा विजय म्हणून हे प्रतीकात्मक दहन केले जाते.

महाभारतात पांडवांनी 12 वर्षे वनवास व 1 वर्षे अज्ञातवास संपवून आपली लपवलेली शस्त्रास्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीतून परत काढली. या विरांना शस्त्रास्त्रे परत देऊन विजयाचे रणशिंगच जणू या वृक्षाने फुंकले होते. त्यामुळे दसर्‍याच्या दिवशी शमी वृक्षाचे महत्त्व अधिक मानले जाते. दैवत भावाने या वृक्षाची पूजा केली जाते. ‘शमी शमयाते पापम् शमी लोकहितकांतका। धरिण्यार्जुनगणानाम् रामस्य् प्रियवंदिनी॥ क्रिशमान्यत्रया यथाकाल सचम्या। तारा निर्विघ्नकर्ती त्वाम् भव् श्रीरामपुजीते॥’ अर्थात, शमी वृक्ष हा वाईट प्रवृत्ती स्वच्छ करतो. त्याचे काटे लालसर रंगाचे असतात आणि प्रभू रामचंद्रांचा हा आवडता वृक्ष आहे. याच झाडावर पांडवांनी त्यांची शस्त्रे लपवली होती. ‘हे शमी, प्रभू रामचंद्रांनी तुझी पूजा केली. मी आता माझ्या विजय प्रवासाला सुरुवात करत आहे. तू माझा मार्ग आनंददायी आणि संकटमुक्तकरशील, असा विश्वास वाटतो.’ शमी वृक्षाला या दिवशी अशा प्रकारे प्रार्थना केली जाते.

दसर्‍यादिवशी आपट्याच्या वृक्षाचेही पूजन केले जाते. वरतंतू ऋषी, त्यांचा शिष्य कौत्स आणि रघुराजा यांची कथाही पुराणात आहे. रघुराजाने कौत्साला दिलेले सुवर्ण मोहोरांचे दान कौत्स आपल्या गुरूंना म्हणजे वरतंतू ऋषींना देतो; मात्र ते शिष्याच्या गुणांनीच संतुष्ट असतात. ते गुरुदक्षिणा नाकारतात. कौत्सही हे धन घेऊ शकत नाही व दान केलेले धन रघुराजाही घेऊ शकत नाही. त्यामुळे हे धन एका आपट्याच्या झाडाखाली ठेवून तमाम जनतेला ते लुटायला सांगतात. हा दिवस दसर्‍याचा असल्यामुळे या दिवशी आजही आपट्याच्या वृक्षाचे पूजन करून त्याची पाने सोने म्हणून एकमेकांना वाटली जातात. या देवाणघेवाणीतून खूप मोठा संदेश दिला आहे. आपण दान केलेल्या संपत्तीचा मोह धरू नये. गुरू, शिष्य व राजा या तिन्ही नाट्यातले आदर्शही या कथेतून व्यक्त झालेले दिसतात.

या दिवशी आपट्याच्या वृक्षाची पूजा करताना पुढील मंत्र म्हणतात, ‘अश्मांतक महावृक्ष महादोषनिवारणम्। इस्तना दर्शनम् देही कुरू शत्रूविनाशनम्॥’ याचा अर्थ, हे महान वृक्ष अश्मंतक अर्थात आपटे तू मोठ्यातील मोठ्या अडचणींवर मात करतोस. माझ्या मित्रांशी मला जवळ आण आणि माझ्यातील दोषांचे निरसन कर,’ असा आहे.

विजयादशमीचा दिवस आई दुर्गेचा विजयोत्सव म्हणूनही साजरा केला जातो. नऊ दिवस अखंडपणे शुंभ-निशुंभ, रक्तबीज, म्हैषासुर आदी राक्षसांना मारून या पृथ्वीला तीने भयमुक्त केले. या नऊ दिवसांच्या युद्धाची सांगता म्हणून विजयादशमी साजरी केली जाते. या दिवशी देवीची अर्थात स्त्री शक्तीच्या पूजेची सांगता केली जाते. विजयादशमीपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देवी विश्रांती घेते, असेही मानले जाते.

दसरा हा दिवस सर्वार्थाने यशाचा व विजयाचा दिवस मानला जातो. म्हणून या दिवशी आपणही घरात मंगल तोरण लावतो. आपल्या यंत्र सामग्रीची पूजा करतो. यांच्या सहाय्यानेच मला पुढच्या यशासाठी मार्गक्रमण करायचे आहे. त्यामुळे यांची साथ लाभू दे, असा एक भाव या पूजेमधून व्यक्त होतो. विजयादशमीच्या दिवशी आपण सीमोल्लंघनही करतो. पूर्वी राजे-महाराजे या दिवसाचा मुहूर्त साधून लढाईसाठी कूच करत असे आणि आपली सीमा ओलांडत असत. आज पूर्वीसारखी प्रत्यक्ष युद्धे नाहीत. देवीने राक्षसांना मारून मानवाला भयमुक्त केले; मात्र आपल्या मनातील षड्रिपूरूपी राक्षस अर्थात शत्रूंचे बळ वाढलेले दिसते. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर यासारख्या वृत्ती वाढल्यामुळे माणूस वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतीच्या दडपणाखाली वावरत असतो. हे दडपण मनातून जाण्यासाठी मनाचे सीम्मोलंघन करणे गरजेचे बनले आहे.

यंदा विजयादशमीच्या निमित्ताने आपण आपल्या मनाचे सीम्मोलंघन करू या. मनातील द्वेषाची, शत्रुत्त्वाची, क्रोधाची भावना काढून, बंधुत्वाची, आपलेपणाची समाधानाची भावना वाढीस लावू या. म्हणजे, स्वत:तील शत्रूंवर विजय मिळवून खर्‍या अर्थाने विजयोत्सव साजरा करण्याचा आनंद मिळेल.

रुढार्थाने सीमोल्लंघन म्हणजे रावणाच्या प्रतिकृतीचे दहन असे वाटत असले, तरी त्यामध्ये बराच अर्थ दडलेला आहे. रावणाचे दहन म्हणजेच दुष्ट, वाईट प्रवृत्तींचे दहन. सृष्टीत कितीही वाईट शक्ती असल्या, तरी त्यांना नीतिमत्तेपुढे नतमस्तक व्हावेच लागते, असे आपला सांस्कृतिक इतिहास सांगतो. रावण हा अतिशय बलाढ्य होता. अजेय होता. त्याने समस्त देवांना, ग्रहांना आपल्या मुठीत ठेवले होते. साक्षात भगवान शंकरांना त्याने प्रसन्न केले होते; पण कालांतराने मिळवलेल्या सर्व शक्तींचा त्याला अहंकार जडला. त्याची नीतिमत्ता भ्रष्ट झाली. तो ऋषीमुनींना त्रास देऊ लागला. अहंकाराच्या धुंदीने त्याची विवेकबुद्धीही चेतनाहीन झाली. त्याने साक्षात जगदंबेला म्हणजे सीतामाईला बंदी बनवले. अखेर प्रभू श्रीरामचंद्रांना या अहंकाराने उन्मत्त झालेल्या रावणाचा नाश करावाच लागला.

हा इतिहास म्हणजे केवळ कथा नाही, तर सर्वसामान्य माणसासाठी आखून दिलेला नीतीपाठ आहे. समाजातील वाईट शक्तींवर सदाचाराने, नीतीने विजय मिळवता येतो, याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणूनच प्रभू रामचंद्रांना पुरुषोत्तम असे म्हटले जाते. दसरा हा आपल्यातील चांगल्या शक्तींवर विश्वास ठेवला पाहिजे, या गोष्टीची आठवण करून देतो.

Back to top button