लवंगी मिरची : आला महाराजा! - पुढारी

लवंगी मिरची : आला महाराजा!

तोटा आणि कर्ज यांनी वाकलेली एअर इंडिया ही हवाई वाहतूक कंपनी आमच्या रतनजी टाटा यांच्याकडे पुन्हा आली, हे ऐकून आम्हाला झालेला ‘विमानभर’ आनंद खरंच गगनात मावत नाही. लहानपणी बाबा कामानिमित्त गावाला निघाले की, आई म्हणायची, बाळ, त्यांना ‘टाटा’ कर बघू! तेव्हापासून ‘टाटा’ करणे म्हणजे निरोप देणे असेच आमच्या मनात पक्के बसले होते.

त्याचा अनुभव आम्ही नोकरी करतानाही घेतला. आपण प्रामाणिकपणे आणि सचोटीने करत असलेले काम पाहून कंपनीने आपणास ‘टाटा’ करण्याचे ठरविले आहे, असे मॅनेजरने आम्हास सांगितले तेव्हा आमच्या पायाखालची वाळूच सरकली होती; पण ‘टाटा करणे’ म्हणजे ‘निरोप देणे’ नव्हे, तर नवी सुरुवात करणे अशी आमची आता ठाम समजूत झाली आहे.

लहानपणी हस्त व्यवसायाच्या विषयात पास होण्यासाठी अनेकदा रंगीत कागदाची विमाने तयार करून हवेत उडवली तेव्हापासून एकदा तरी खर्‍या विमानात बसण्याचे स्वप्न होते. असं स्वप्न पाहिलं की, मित्र म्हणायचे, ‘स्वप्नातल्याच विमानात बसा.’ तेव्हा खूप नैराश्य यायचं. मग, ते नैराश्य घालविण्यासाठी आमच्या मित्रांनी ‘बार’ नावाच्या छोट्या विमानतळावर नेऊन कसले, तरी चैतन्य पेय देऊन आमचे विमान बरेच उंच जाईल, यासाठी प्रयत्न केल्याचेही चांगले आठवते. यापायी मित्रांचा बराच खर्च झाला आणि आमचे विमान काही उडलेच नाही.

आमच्या विमान उडू न देण्याच्या क्षमता पाहून मित्रांनी आम्हास पुन्हा कधीही ‘त्या’ विमानतळावर नेले नाही. त्यामुळे चैतन्य पेयाद्वारे विमान उडणे या आनंदापासून आम्ही वंचितच आहोत. नोकरीसाठी अनेक ठिकाणी उमेदवारी केल्यानंतर आणि अनेक कंपन्यांनी ‘टाटा’ केल्यानंतर आम्हास एका बर्‍या कंपनीत नोकरी मिळाली. आम्हास ती बरी कंपनी वाटत होती; पण ती कंपनी चांगली आहे, याची जाणीव आम्हास तेव्हा झाली जेव्हा या कंपनीने आम्हास चक्क विमान प्रवासाची सोय कामासाठी उपलब्ध करून दिली.

पहिल्या विमान प्रवासाच्या कल्पनेनेच आमच्या विचारांचे विमान हवेत तरंगायला लागले होेते. भीती आणि उत्सुकता अशा दोन्ही भावना मनात होत्या. पहिल्या बाळंतपणाच्या वेळी बाईची जशी घालमेल सुरू असते, तसेच आमचे झाले होते. हवाई सुंदरी बघायला मिळणार म्हणून खूप आनंद झाला होता. एअर इंडियाच्याच विमानाने आमचा पहिलावहिला विमान प्रवास घडणार होता. स्वागतासाठी महाराजा सज्ज होता. देवाचे नाव घेत विमानाच्या पायर्‍या चढून आत गेलो. जागेवर बसलो.

हवाई सुंदरीची वाट बघत असतानाच एक मावशीच्या वयाच्या बाई आल्या. त्यांनी काय हवे नको ते विचारले. वातावरण खूपच घरगुती वाटले. मी शेजारच्या प्रवाशाला विचारले, ‘हवाई सुंदरी कुठे दिसत नाहीत?’ त्यावर तो म्हणाला, ‘आता आपली विचारपूस करून गेल्या त्याच हवाई सुंदरी. एअर इंडियात असेच असते!’ आमचा खूपच भ्रमनिरास झाला.

तिथल्या अतिघरगुती वातावरणामुळे आपण विमान प्रवास वगैरे खूप वेगळे काही तरी करत आहोत, असे अजिबात वाटले नाही. आमच्या कल्पनेचं विमान एकदम जमिनीवर आलं. आता रतन टाटांना एकच विनंती आहे, अशा व्यवस्थेला आपण ‘टाटा’ करावे. -झटका

हेही वाचलंत का? 

Back to top button