लवंगी मिरची : सावकाश चालवा बाबांनो! | पुढारी

लवंगी मिरची : सावकाश चालवा बाबांनो!

अरे मित्रा, परवाच्या दिवशी पाडवा होता, तर पाडवा म्हणजे वर्षभरातला अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त. नवीन खरेदीसाठी हा मुहूर्त फार चांगला समजला जातो. त्या दिवशी राज्यामध्ये आजपर्यंतचे सगळे विक्रम मोडीत काढत प्रचंड प्रमाणात दुचाकी खरेदी झाली आहे.
अरे बापरे, म्हणजे आजच्या असलेल्या रोजच्या गर्दीत अक्षरश: हजारो वाहनांची भर पडली असेल, तर काय परिस्थिती उद्भवेल काय माहिती. काय असेल ते असो; पण आपल्या राज्यात दोनचाकी गाड्या फारच लोकप्रिय आहेत. आज तर मी पाहिले की, अनेकजण नवीन दुचाकी घेऊन ज्याला की हार घातलेला असतो, हजारोच्या संख्येने गावात इकडून तिकडे आणि तिकडून इकडे थाटात फिरत आहेत. पूर्वी मारली किक की निघ, अशी परिस्थिती होती.

आता तर किक मारायची पण गरज नाही. दाबले बटन की निघ असे झाले आहे. म्हणजे जवळपास सगळ्या गाड्या बटन स्टार्ट आलेल्या आहेत. त्यात पुन्हा ग्रामीण भागातून येणारे विक्रेते, दूध घालणारे शेतकरी यांच्या मोटारसायकलींच्या मागे पाच-सहा कॅन अडकवण्यासाठी लोखंडाचे एक डिझाईन केलेले असते. कित्येक वेळेला ग्रामीण भागातून गवताचे भारेच्या भारे घेऊन लोक शहराकडे येत असतात. भाज्या, फळफळावळ यांची आवक करण्यासाठी दुचाकी अत्यंत सोपी पडते.

आज-काल महिलांचे पण दुचाकी वापरण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. कार्यालयात जायचे असो, बाजारात जायचे असो किंवा छोट्या-मोठ्या कामासाठी जायचे असो, तत्काळ त्या स्कूटर प्रकारच्या दुचाकीवर स्वार होतात आणि रणरागिणीच्या आवेशात मार्केट काबीज करण्यासाठी निघतात. मग कधी-कधी त्या उजवीकडे वळायचे असेल, तर डावीकडचा हात दाखवतात आणि डावीकडे वळायचे असेल, तर उजवीकडचा हात दाखवतात हा भाग वेगळा.

संबंधित बातम्या

शपथ तुला सांगतो, एखादी महिला जर

दुचाकीवर येत असेल तर मी घाबरूनच रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहत असतो. आपल्या अंगावर गाडी घातली तर आपला हात-पाय मोडायचा ही भीती असतेच. अरे तसे काही नाही. महिलांमध्ये आत्मविश्वास नसतो, असा काहीतरी तुझा गैरसमज झालेले दिसतो आहे. आज महिला पुरुषांच्या बरोबरीने आणि तितक्याच सफाईने दुचाकीच नव्हे तर चारचाकी, मोठी वाहने एवढेच काय विमान पण चालवत आहेत. त्यामुळे तुझ्या मनात असलेला गैरसमज आधी काढून टाक. ठीक आहे, मान्य आहे; पण दुचाकी घेण्याचा एखादा व्यक्ती निर्णय घेतो तेव्हा आधीच असलेली रहदारीची परिस्थिती त्याच्या लक्षात येत नाही का? येते ना; पण त्याचा नाईलाज असतो, कारण त्याच्यासाठी त्याची ही पहिलीच दुचाकी असते. याचा अर्थ मी असा घेतो की, दुचाकी खरेदी करण्याची शक्ती असलेल्या ग्राहकांची संख्या वाढत चाललेली आहे. याचा अर्थ आपला देश प्रगतीपथावर आहे.

आपली अर्थव्यवस्था भक्कम आहे. जो सायकलवर होता तो मोटारसायकलवर येत आहे आणि जो मोटारसायकलवर होता तो कारमध्ये फिरत आहे. हे प्रगतीचेच लक्ष नाही तर काय?… तू म्हणतोस त्या अर्थाने ही प्रगतीच आहे; पण याच्या संख्येवर काहीतरी नियंत्रण ठेवले पाहिजे, असे नाही का वाटत तुला? जेणेकरून रहदारीमध्ये होणारे अपघात, गर्दी खोळंबा टाळता येईल, असे काहीतरी केले पाहिजे. त्यापेक्षा कितीही गर्दी झाली तरी खोळंबा होणार नाही, असे काहीतरी केले पाहिजे असे का नाही वाटत तुला? पर्यायी रस्ते, उड्डाणपूल, दुहेरी मार्ग, एकेरी मार्ग इत्यादी बाबींचा विचार करून यावर मात करता येईल, असे मला वाटते.

Back to top button