आज घटस्थापना! : बया दार उघड! - पुढारी

आज घटस्थापना! : बया दार उघड!

आज घटस्थापना! आदिमाया, आदिजननी आई भवानीमातेच्या नवरात्राचा प्रारंभाचा दिवस. आई जगदंबेचे नवरात्र सुरू होत असताना जगज्जननीकडे काही लडीवाळ हट्ट धरणे अप्रस्तुत ठरणार नाही. दारिद्र्य, दुःख, भयहारिणी हे मूळ पीठनायिकेचे आद्य बीद्रच आहे. सकल सौभाग्यशुभकल्याणी, रामवरदायिनी, सच्चिदानंद प्रणवरुपिणी आई अंबाबाई आपल्या ब्रीदाला जागून भक्तांचे कोड पुरवील, यात किमपि संशय नाही. त्रिविधतापभवमोचक त्रिभुवनात्राती चामुंडेश्वरीच्या कृपाप्रसादाची भक्तांना कधी नव्हे एवढी नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे आणि म्हणूनच, ‘बया दार उघड’ अशी भक्तसमुदायातून आर्त आळवणी होत आहे. घटस्थापना म्हणजे एकेकाळच्या कृषी संस्कृतीतील कृषी उत्सव! भरण-पोषण करणार्‍या धान्याचे श्रद्धापूर्वक पूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्राचीन उत्सव. घटस्थापनेपासून ( घटस्थापना ) देवीचे नवरात्र सुरू होतात आणि नवरात्रानंतर दसरा उजाडतो. शेतामध्ये पिकांची कापणी झालेली असते. नवे धान्य घरी आलेले असते. धनधान्याची बरकत झालेली असते. उदारहृदयी बळीराजाच्या आनंदाला पारावर उरलेला नसतो. अशा चैतन्यमय वातावरणात दसरा साजरा होतो. हा सण म्हणजे प्राचीन कृषी संस्कृतीतील महत्त्वाचा लोकोत्सव! मध्ययुगात दसर्‍याला म्हणजे विजयादशमीला लष्करी आणि राजकीय स्वरूप आले असले, तरी मूळ हा सण उत्सव आहे, तो बळीराजाचा! आज नवरात्र आणि दसरा साजरा करण्याच्या मनःस्थितीत आणि परिस्थितीत बळीराजा आहे काय? आई भवानीला तर सारे ठावेच आहे. लेकरांनी मातेला काय सांगावे! गेल्या आषाढात महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी महावृष्टी झाली. लाखो एकरांतील पिके पाण्यात बुडाली. ढगफुटीसारखा पर्जन्य आणि विक्राळ महापूर अशा अस्मानी अपत्तीने होत्याचे नव्हते झाले. बळीराजाच्या डोक्यावरचे आभाळ फाटले. जी भयावह अवस्था शेतकर्‍यांची, तीच सर्वसामान्य जनतेची! हजारो घरांची पडझड झाली. हजारो संसार उद्ध्वस्त झाले. हजारोंची रोजीरोटी बुडाली. सामान्यांप्रमाणे धनिकवर्गालाही महापुराची झळ पोहोचली.

आषाढात असे आषाढमेघ कोसळले आणि पुन्हा भाद्रपदातही वरुणराजाने डोळे वटारले. आधी कोकणात आणि नंतर मराठवाडा, विदर्भ, खानदेशात पर्जन्याने हाहाकार उडवला. हजारो एकर शेतांचा अक्षरशः चिखल झाला. बळीराजाचे काबाडकष्ट मातीमोल झाले. एका तडाख्यातून सावरावे, डोके वर काढावे, तो दुसरा तडाखा बसावा, सारे भुईसपाट व्हावे, तशी बळीराजाची आणि त्याबरोबर हातावर पोट असलेल्या सामान्यजनांची दयनीय अवस्था झाली आहे. हे झाले यंदाच्या अस्मानी आपत्तीचे आरिष्ट! गेल्या दोन वर्षांपासून देशात आणि राज्यात कोरोना महामारीने कहर केला. आता हळूहळू परिस्थिती निवळत आहे. जनजीवन पूर्वपदावर येत आहे. तथापि, झालेले नुकसान अपरिमित आहे. त्या सार्‍यातून सावरण्यासाठी माते, सर्वांना बळ दे, शक्ती दे! ‘शरणागतदीनार्त परित्राणाय परायणे’, हा तुझा लौकिक वर्धिष्णू होऊ दे! ‘त्राहि माम्’च्या विनवणीला तुझ्या संबळाचा प्रतिसाद लाभू दे!! अनाथनाथ अंबे, तू तारक संजीवनी आहेस. तुला काय अशक्य आहे? राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपापल्या परीने बळीराजाला आणि आपदग्रस्त सामान्यजनांना मदत करीत आहेत. अशी मदत मिळत असली, तरी मदतीपासून अनेकजण वंचित राहिल्याच्या तक्रारी आहेत. मदत तुटपुंजी मिळाल्याची गार्‍हाणी आहेत. जी मदत प्राप्त झाली, ती वेळेत मिळाली नसल्याचेही प्रकार आहेत. ‘वरातीमागून घोडे’ अशाही कथा आहेत. पंचनाम्यात घालमेल झाल्याचे आपदग्रस्तांचे म्हणणे आहे. ‘शुंभनिशुंभदैत्यांतके’, झारीतील अशा शुक्राचार्यांचे निर्दालन करायला तुला निमिषमात्रही समय लागावयाचा नाही. प्रशासकीय यंत्रणा अधिक पारदर्शी आणि गतिमान व्हावी, ही लोकांची इच्छा. माते भगवती, तुझा कोरडा कडाडा वाजू दे, ज्ञानपोत उजळू दे आणि यंत्रणेच्या मनात आमूलाग्र बदल होऊ दे, हे तुझ्या चरणी तमाम भक्तांचे साकडे आहे.

‘सर्वमंगल मांगल्ये’, ही देवी तुझी ख्याती आणि कीर्ती! तुझ्या अस्तित्वाच्या स्मरणानेही सारा माहोल पावित्र्याने, मांगल्याने उजळावा; पण सांप्रत भारत वर्षात आणि तुझी साडेतीन शक्तिपीठे ज्या राज्यात आहेत, त्या महाराष्ट्र राज्यात आरोप-प्रत्यारोप, हेत्वारोपांचा गदारोळ आहे आणि भ्रष्टाचार, गैरव्यवहाराचा गोंधळ सुरू आहे. देवी महिषासुरमर्दिनी, याच नवरात्रीतील अष्टमीला तू म्हैशासुराचा वध केलास. उन्मत आणि मातलेल्या म्हैशासुराला यमसदनी धाडलेस. आताही असे म्हैशासुर ठायी ठायी आढळत आहेत. आई तुळजाभवानी, रामवरदायिनी, ‘रावण, कुंभकर्ण मातले बळी। करी लंकेची होळी॥’ याप्रमाणे भ्रष्ट, गैरकारभारी यांची गत कर, अशी जनसमूहाची प्रार्थना आहे. प्रशासनाला आणि विकासकामांना लागलेल्या या जळवांचे निर्दालन होऊ दे, ही कळकळीची भावना जनमानसातून प्रकट होत आहे, त्याची हे माते, दखल घे! ( घटस्थापना ) माते करुणामृतसरिते, भक्तपालके, गुणभरिते, भारतवर्षाची सस्यश्यामल भूमी सुखदाम्, वरदाम् होऊ दे. भारतभूमीचा सुवर्णकाळ पुनरपि अवतरू दे! देशाला ग्रासण्यासाठी सीमेवर राहू-केतू टपलेलेच आहेत. तेव्हा हे दुर्गाभवानी, ‘रणवाद्य भम् भम्, दण् दण्, कड कड वाजती। तोची गोंधळ अंबे तुजप्रती॥ याचा आम्हाला प्रत्यय येऊ दे! ‘शिलंगण खेळसी नाना परी।’ या उक्तीची आम्हाला याची देही, याची डोळा अनुभूती येऊ दे!! माहूर लक्ष्मी दार उघड बया। कोल्हापूर लक्ष्मी दार उघड बया! तुळजापूर लक्ष्मी दार उघड बया! असा तुझा उदोकार! त्यात आम्ही तल्लीन झालो आहोत. अनादि सिद्ध मूळ प्रकृती, महालक्ष्मी त्रिजगती, बया दार उघड, अशी आर्त हाक हृदय संपुटातून घालीत आहोत. सर्वार्थ कल्याणकारी हे माते अंबाबाई, तुळजाभवानी आशीर्वाद दे! तुझा वरदहस्त लाभू दे!!
उदयोऽस्तु। उदयोऽस्तु । उदयोऽस्तु।

Back to top button