पंतप्रधान नरेंद्र मोदी : समर्पित सेवेची वीस वर्षे - पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी : समर्पित सेवेची वीस वर्षे

- जे. पी. नड्डा, राष्ट्रीय अध्यक्ष भाजप

पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्वजनिक जीवनातील प्रशासकीय प्रमुख म्हणून केलेल्या वाटचालीची वीस वर्षे आज पूर्ण करीत आहेत. सात ऑक्टोबर 2001 रोजी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून प्रथम शपथ घेतली. सध्याच्या जागतिक भू-राजकीय परिस्थितीत भारताला मोदींची पूर्वीपेक्षाही अधिक गरज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सार्वजनिक जीवनातील प्रशासकीय प्रमुख म्हणून केलेल्या वाटचालीची वीस वर्षे आज पूर्ण करीत आहेत. दि. 7 ऑक्टोबर 2001 रोजी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून प्रथम शपथ घेतली होती. चार वेळा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर सर्वांत मोठ्या लोकशाहीचे प्रधानसेवक म्हणून नेतृत्व करण्यापर्यंतचा मोदी यांचा गेल्या वीस वर्षांतील प्रवास भारताला एक समृद्ध आणि मजबूत राष्ट्र, एक विश्वगुरू बनविण्याच्या दृष्टीने दिलेल्या समर्पित योगदानाचा इतिहास आहे. कर्मयोगी बनून आपल्यातील उत्कृष्टतेने त्यांनी देशाला न्यू इंडिया बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा विश्वास दिला आहे.

भूकंपग्रस्त भुजची पुनर्बांधणी, व्हायब्रंट गुजरातच्या माध्यमातून राज्याला गुंतवणूक करण्यासाठी जगातील सर्वाधिक अनुकूल ठिकाण म्हणून स्थान मिळवून देण्याबरोबरच, वीजनिर्मितीत राज्याला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनविणे, जागतिक दर्जाच्या पायाभूत संरचना आदी पैलूंमुळे गुजरातला जगात मान्यता मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून गुजरातचा कायापालट केला. कन्या केलवानी योजना, शाला प्रवेशोत्सव, बेटी बचाओ-बेटी पढाओ यासारख्या योजनांनी शाळेतील नावनोंदणी आणि महिला साक्षरतेचे प्रमाण सुधारले आणि महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत त्यांनी राष्ट्रीय मानदंड प्रस्थापित केला. ज्योतिग्राम योजना, ई-ग्राम विश्वग्राम, जलसंधारण आणि भूजल कायाकल्प प्रकल्प यांसारख्या योजनांनी ग्रामीण गुजरातचा चेहरामोहरा बदलला आणि ग्रामीण विकासाचे हे गुजरात मॉडेल संपूर्ण जगासाठी एक केस स्टडीचा विषय ठरले.

यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळानंतर 2014 मध्ये भारतासाठी बदलाचा क्षण उगवला. मोदी यांच्या बाजूने प्रचंड जनादेश आला आणि पंतप्रधान म्हणून नव्हे, तर प्रधानसेवक म्हणून त्यांनी शपथ घेतली. पहिल्याच दिवसापासून त्यांनी गरिबातील गरिबांसाठी काम करण्यासाठी स्वतःला वचनबद्ध आणि समर्पित केले आणि अशा प्रकारे ‘नवा भारत’ उभारणीच्या प्रवासाला सुरुवात झाली. गेल्या सात वर्षांत मोदी यांनी प्रत्येक भारतीयाच्या गरीब आणि वंचित वर्गाच्या, अल्पसंख्याकांच्या, तरुण आणि महिलावर्गाच्या, शेतकरी आणि शेतमजुरांच्या, विद्यार्थी आणि मुलांच्या शहरी आणि ग्रामीणवर्गाच्या अशा सर्वांच्याच जीवनात बदल घडवून आणण्याचा अथक प्रयत्न केला.
मोदी हे लोकनेते आहेत आणि जगातील सर्वांत लोकप्रिय नेतेही आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते आपत्तीच्या वेळी मदत आणि बचावकार्यावर व्यक्तिगत देखरेख करीत असत आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच तातडीची माहिती मिळविण्यासाठी आपत्तीग्रस्त ठिकाणी पोहोचत असत. मला या ठिकाणी दोन घटनांचा विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो. छत्तीसगडमधील एका कार्यक्रमात मोदी यांनी एका वृद्ध महिलेच्या पायाला हात लावून वंदन केले होते आणि दुसरा प्रसंग म्हणजे, स्वच्छ भारत अभियानातील योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांनी सफाई कर्मचार्‍यांचे पाय धुतले होते. आपले प्रधानसेवक हे अत्यंत दुर्लभ अशी शक्ती लाभलेले उत्तम संवादक आहेत. उदाहरणार्थ, मामल्लापुरम समुद्रकिनार्‍यावरील कचरा काढून त्यांनी आदर्श उभा केला आणि तोच ‘स्वच्छ भारत’ या देशव्यापी चळवळीसाठी प्रेरक ठरला.

मोदींच्या नेतृत्वाखाली भारत आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि आत्मनिर्भर देश म्हणून उभा आहे. जन-धन योजना, जनसुरक्षा योजना, मुद्रा योजना, डिजिटल इंडिया, उज्ज्वला योजना, उजाला योजना, आयुष्मान भारत योजना, शेतकरी सन्मान योजना, घरकूल योजना, सौभाग्य योजना, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल हे नरेंद्र मोदी सरकारचे प्रभावी कार्यक्रम आणि धोरणे असून, सामाजिक आणि आर्थिक आघाडीवर आपण उत्कृष्ट कामगिरी करीत आहोत.

‘एक देश, एक विधान, एक निशाण’ यासाठी देशाशी असलेल्या बांधिलकीची पूर्तता करण्यासाठी कलम 370 रद्द करणे, मुस्लिम महिलांना सशक्त करण्यासाठी प्रतिगामी तिहेरी तलाक रद्द करणे, अयोध्येतील राम जन्मभूमीत भव्य राममंदिराचे भूमिपूजन, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा, नागरिकत्व सुधारणा कायदा, सामान्य प्रवर्गातील गरिबांना 10 टक्के आरक्षण, जीएसटी हे सर्व निर्णय म्हणजे मोदी सरकारने पार केलेले महत्त्वाचे टप्पे आहेत आणि आपल्या राष्ट्राची मजबूत पायाभरणी करणारे असेच हे निर्णय आहेत.

देशाच्या सुरक्षिततेविषयी सतर्क राहतानाच सीमेपलीकडील दहशतवादी तळांवर हल्ले करण्यास परवानगी देऊन जगाला स्पष्ट संदेश दिला की, यापुढे दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही. त्याचप्रमाणे मोदींनी आपल्या पूर्वसूरींचे तळ्यात-मळ्यात परराष्ट्र धोरण टाळले आणि आपल्या जुन्या मित्रांशी संबंध दृढ करण्यासाठी, तसेच नवीन मित्र जोडण्यासाठी नवे मार्ग शोधले. योगाला खर्‍या अर्थाने जागतिक मान्यता मिळवून देऊन भारताच्या समृद्ध संस्कृतीचे आणि परंपरेचे वर्चस्व जगात प्रस्थापित केले ते मोदी यांनीच.

कोरोना आपत्तीत लॉकडाऊनची घोषणा वेळेवर करण्यापासून लसीचा विकास आणि देशव्यापी लसीकरण मोहिमेपर्यंत सर्वच आघाड्यांवर मोदी यांनी कोरोना महामारीविरुद्धच्या भारताच्या लढाईचे नेतृत्व केले. जगातील विकसित राष्ट्रेही या संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरली; मात्र आपण ती यशस्वीपणे लढलो. गरीब कल्याण अन्न योजना आणि गरीब कल्याण रोजगार योजना यांसारख्या गरीब आणि गरजूंसाठीच्या कल्याणकारी योजना याची साक्ष देतात. विरोधकांनी कितीही नकारात्मक प्रचार केला, तरी आपले शास्त्रज्ञ दोन लसी विकसित करण्यात यशस्वी झाले. आज आपण 93 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे आणि डिसेंबरपर्यंत सर्व नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झालेले असेल. मोदी प्रत्येक भारतीयाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवीत आहेत आणि भारताला विश्वगुरू म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. भारतातील सर्व लोकांना दिलेले वचन आणि केलेल्या प्रतिज्ञांची पूर्तता करण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य मिळावे, अशी मी जगन्नियंत्याकडे प्रार्थना करतो. सध्याच्या जागतिक भू-राजकीय परिस्थितीत भारताला त्यांची पूर्वीपेक्षाही अधिक गरज आहे.

Back to top button