मोर्चे जिवंतपणी निघाले, तरच दर्शनला मरण नाही! | पुढारी

मोर्चे जिवंतपणी निघाले, तरच दर्शनला मरण नाही!

तुमची आयआयटी मुंबई सात आयआयटींपैकी एक. मोठी प्रसिद्ध संस्था. जगभरातल्या कंपन्यांत तुमचे विद्यार्थी निवडले जातात. याच आयआयटीत असे तुम्ही काय केले की, मोठ्या कष्टाने तिथपर्यंत पोहोचलेला दर्शन सोलंकी आत्महत्या करतो? दर्शनच्या आईच्या या प्रश्नावर आयआयटी मुंबई निरुत्तर आहे.

दर्शन सोलंकीने होस्टेलच्या आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. मुळात उडी मारण्यासाठी कोण मरतो? त्या टोकावर त्याला कुणी पोहोचवले, हे पोलिसांची नोंद सांगत नसते. आयआयटी मुंबईत पोहोचलेल्या जातीयवादाने दर्शनला मरणाच्या दारात पोहोचवले आणि उडी मारण्यास भाग पाडले. जातीयवाद हा सामाजिकच असतो असे नाही. समाजाचेच बोट धरून उभ्या संस्थांमध्ये जात शिरते तेव्हा हा संस्थात्मक जातीयवाद जातीयवादी समाजाइतकाच निबर, माणुसकी शून्य निपजतो.

दर्शन सोलंकीला उच्चजातीय विद्यार्थ्यांनी छळ छळ छळले, त्याला बहिष्कृत केले, वाळीत टाकले. बी. टेक.च्या पहिल्याच वर्षात, पहिल्या काहीच महिन्यांत बसलेल्या या धक्क्यातून मग दर्शन सावरलाच नाही. त्याचा कॅम्पसमध्ये जातीवरून छळ झाला, हे ऐकून आयआयटी प्रशासनाला कोणताही धक्का बसलेला नाही. या घटनेने आयआयटी प्रशासनाच्या कारभारात कोणताही कल्लोळ निर्माण केला नाही. नाही म्हणायला एक श्रद्धांजली सभा भरवली गेली; पण हे आत्महत्या प्रकरण जातीय वळणावर जाण्याची चिन्हे दिसू लागताच संचालक सुभासिस चौधरी यांनी माईक काढून खिशात घातला.

प्रत्येकाला आपले म्हणणे मांडता येईल, अशी व्यवस्था केली जाईल, असे सांगत त्यांनीही ही श्रद्धांजली सभा सोडली. आयआयटी मुंबईतील जाती व्यवस्थेने दर्शनचा बळी घेतला, हे त्यांनी मान्य करण्याचे कारण नाही. गुन्हा नाकबूल करण्याची परंपरा जपत जपत व्यवस्था सनातन होत जाते. आयआयटीही त्यास अपवाद नाही. आयआयटीची सनातन जाती व्यवस्था दर्शन सोलंकीचाही बळी पचवून जात्यंध ढेकर देतच राहणार आहे. आयआयटीत जातीयवाद नाही, असे प्रशासन सांगते; पण मागच्याच वर्षी आयआयटी मुंबईतील अनुसूचित जाती-जमाती सेलने केलेल्या सर्वेक्षणात किमान शंभर विद्यार्थ्यांनी जातीय छळ होत असल्याचे म्हटले होते, तरीही जातीवरून सुरू असलेले आरक्षित विद्यार्थ्यांचे छळ सत्र थांबत नाही.

दर्शन सोलंकीने बुद्धिमत्तेची कथित मक्तेदारी मोडून काढली. आयआयटीची प्रवेश परीक्षा एकदा नव्हे तो दोनदा उत्तीर्ण झाला. पहिल्यांदा कॉम्पुटर सायन्स घेतले; पण हवी ती शाखा मिळाली नाही म्हणून आयआयटी सोडली. पुन्हा परीक्षा देत तो केमिकल इंजिनिअरिंगला दाखल झाला होता. यावरून आंबेडकरी मार्गाचा तो किती कडवट अनुयायी होता हे वेगळे सांगायला लागत नाही; पण ज्या क्षणी कळले की, दर्शन ‘कोटा’वाला आहे, आरक्षणातून आलाय त्याक्षणी सोबतच्या सवर्ण विद्यार्थ्यांनी त्याच्याशी उभा दावा मांडला. येता जाता ‘कोटा’वाला म्हणून हिणवले जाऊ लागले. टोमणे मारले जाऊ लागले. कुणी सोबत बसत नव्हते, मदत करत नव्हते. ज्या आयआयटीत एससी-एसटी सेल आहे आणि तो गेल्याच वर्षी ‘कोटा’वाल्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याइतपत सक्रिय आहे त्या आयआयटीत शिकणार्‍या दर्शनला या सेलचाही आधार वाटला नाही, हे कसे? आयआयटीत गुणवत्तेच्या जोरावरच पण आरक्षणातून प्रवेश घेणारा दर्शन एकटा नव्हता.

एकूण आरक्षण 50 टक्के आहे. त्यात 27 टक्के जागा ओबीसींना, 15 टक्के अनुसूचित जाती, तर 7.5 टक्के अनुसूचित जमातीला आहे. यातले 27 टक्के ओबीसी आरक्षित असले, तरी तसे ते वरच्याच जातीतले स्वतःला समजतात, हे साहजिक म्हणायचे; पण आयआयटीत एकूण मुलांमध्ये एससी-एसटी विद्यार्थ्यांचा टक्का 22.5 असतानाही आंबेडकरी वाटा तुडवत इथवर आलेला दर्शन सोलंकी एकटा पडला. आयआयटीत आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कलदेखील आहे. कथित उच्च जातीय टोळके रोज टोचून टोचून मारत राहिले आणि दर्शन तो सारा छळ एकट्याने सहन करत राहिला. जातीय छळ, टोमणे, एकाकी पाडणे, वाळीत टाकणे यातून दर्शनने जीव दिला असे या सर्कलने आता सांगितले. दर्शन जीवघेणा जातीय छळ सहन करत असताना हे आंबेडकर-पेरियार यांच्या नावाने चालणारे स्टडी सर्कल होते कुठे? ना प्रशासन जागेवर ना बिरादरीचे विद्यार्थी पाठीशी. परजातींनी रोज छळ मांडला आणि स्वजातीयांनी दुर्लक्षच केले. मग, दर्शन जगेल कसा?

अहमदाबादच्या मणीनगरात त्याचे वडील रमेशभाई राहतात. ते प्लम्बर आहेत. आई तारलीकाबेन घरकाम करते. आठवडाभरापूर्वी व्हिडीओ कॉलवर तो आई- वडिलांशी बोलला. हा फोन संपला आणि पाऊण तासाने दर्शनने आत्महत्या केली. मोठ्या कष्टाने शिक्षण घेत आयआयटीपर्यंत तेवत राहिला तो सोलंकीच्या घरातला पहिलाच दिवा होता. तोही विझला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र आयआयटीत पराभूत झाला. जे शिकतात त्यांना सोबत घेऊन इथे कुणी संघटित होत नाही. संघर्ष तर फार दूरची गोष्ट. आयआयटीमध्ये एससी-एसटी सेल आणि आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल असूनही आपली छळ कहाणी दर्शन फक्त बहीण जान्हवीला सांगू शकला. कॅम्पसमध्ये तो एकटाच होता. त्याच्यासाठी संघर्ष करणारा कुणी नव्हता. कदाचित अशाच वळणावर 2014 मध्ये याच आयआयटी मुंबईत सचिन अंभोरे या पीएच. डी. विद्यार्थ्याने आत्महत्या केली असावी.

हैदराबाद विद्यापीठात रोहित येमुला हा पीएचडीचाच विद्यार्थी 2016 मध्ये आपण असाच गमावला किंवा मुंबईच्या नायर रुग्णालयात टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर पायल तडवीने जातीय छळापुढे हात टेकले अन् जगाचा निरोप घेतला. दर्शन, अंभोरे, येमुला, डॉक्टर तडवी हे सारे त्यांच्या त्यांच्या कुटुंबातून पुढे सरकलेली पहिलीच पिढी होती. हीच पिढी अशी शिकार होत राहिली, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दातील ‘मोक्याच्या जागा’ कोण पटकावणार? ही उगवती पिढीच गारद करण्याचे सामाजिक कारस्थान आयआयटीसारख्या कॅम्पसमध्ये तडीस जात असेल, तर अशा आंबेडकरी पिढ्या तगवण्यासाटी आंबेडकरी चळवळीलाच उभे राहावे लागेल.

कॅम्पसमधल्या चातुर्वर्णाने ‘कोटा स्टुडंट’ ही नवी जात शोधली असेल, तर या ‘कोटा स्टुडन्ट्स’नादेखील सतत एकत्र राहावे लागेल; पण जो समाज दीड-दोन डझन संघटनांत आधीच दुभंगला आणि निरनिराळ्या आखरावरल्या गव्हाणींना ज्याचे नेतृत्व बांधले गेले, तो समाज आपल्या मुलांच्या पाठीशी उभा राहील, ही शक्यताच फार धूसर आहे. जीव गेल्यावर मोर्चे गट-तट सांभाळत धडकतात. त्यांचा उपयोग काय?

विवेक गिरधारी

Back to top button