लवंगी मिरची : ‘त्यांना’ थांगपत्ता लागलाच नाही | पुढारी

लवंगी मिरची : ‘त्यांना’ थांगपत्ता लागलाच नाही

आता तिकडे कोणीच नाही महाराज. महाराजांचा विजय असो. मी हजर आहे महाराज, तुमचा प्रधानजी.
प्रधानजी, राजमहालातील सगळे नोकरचाकर कुठे गेले आहेत? महाराज ते पदवीधर निवडणुकीचा निकाल लागला ना, ते तिकडे सगळेजण मिरवणुकीत नाचायला गेले आहेत.
म्हणजे आमचे सगळे नोकरचाकर पदवीधर आहेत की काय?
नाही महाराज, तसं काही नाही. काही जण आहेत, काही जण नाहीत!
प्रधानजी, मग ते पदवीधरच्या निवडणुकीत नाचायला कसे काय गेले?
त्याचं काय आहे महाराज, आपला देश लोकशाहीप्रधान आहे. त्यामुळे बारा महिने कुठल्या ना कुठल्या निवडणुका सुरूच असतात. पदवीधर झाल्या, शिक्षक मतदार झाल्या, आता पोटनिवडणुका आल्या आहेत. निवडणुका म्हटलं की गर्दी जमवावी लागते. कोणीही गर्दी करण्यासाठी बोलावलं की आपले राजवाड्यातले नोकरचाकर तिकडे धाव घेतात. कारण आपल्याकडे पगाराचे वांदे झाले आहेत.
प्रधानजी या निवडणुकांना आमची प्रजाही कंटाळली असेल ना? आम्ही आहोत नामधारी राजे, पण आम्हाला या गोष्टींचा कंटाळा आलाय. काहीतरी सूत्र असे काढा की निवडणुकाच व्हायला नकोत. असं काय बोलता महाराज. हळू बोला. बाहेर तुमचं हे स्टेटमेंट गेले तर अडचण होईल.
हे बघा, एकदा लोकशाही मान्य केली की निवडणुका आल्याचं. आपले प्रतिनिधी लोकांमधून निवडून आले पाहिजेत, यासाठी निवडणुकांना पर्याय नाही. निवडणुका म्हणलं की मग राजकारण आलं, निवडणुका म्हणलं की उमेदवारी आली, राजकीय पक्ष आले, प्रचार सभा आल्या, पैसा आला. यापुढे जाऊन सांगतो महाराज, तुम्हाला माहीत नाही, पण निवडणुका आल्या की कोंबड्या आल्या आणि बकर्‍या पण आल्या.
महाराज, जशा पार पाडायच्या तशा पडल्या. कायदा आणि सुव्यवस्था चोख होती. बाकी कोण कोणाकडून लढत आहे हे शेवटपर्यंत मतदारांना कळाले नाही. कुणाचा कुणाला पाठिंबा आहे हे शेवटपर्यंत रहस्य राहिले. सगळ्यात गाजली ती आटपाट नगरओ पदवीधर मतदार संघाची निवडणूक.
काय सांगता प्रधानजी? तिथे सर्व काही व्यवस्थित पार पडले असेल.
होय महाराज. तिथे एका पक्षाने वडिलांना तिकीट दिले. तिकीट म्हणजे आजकाल एबी फॉर्म असतो महाराज. तुम्ही कधी निवडणूक लढवली नाही ना म्हणून तुम्हाला माहीत नसेल. तर एका पक्षाने एबी फॉर्म वडिलांना दिला. पक्षाचा तो एबी फॉर्म असलेले पाकीट त्या वडिलांनी उघडून न पाहता तिजोरीत टाकून दिले आणि ऐनवेळी त्यांचे चिरंजीव अपक्ष म्हणून उभे राहिले. पक्ष तोंडावर पडला. कारवाई काय करावी, या घोळात आठ-दहा दिवस गेले. तिकडे चिरंजीवांनी जोरदार प्रचार केला. त्यांना पाठिंबा कोणाचा आहे हे शेवटपर्यंत कुणालाच कळाले नाही, पण ते प्रचंड बहुमताने निवडून आले.
प्रधानजी, वडिलांनी मुलासाठी त्याग करावा यात नवल ते कसले? आता आमचे युवराज सातवी पास होऊ शकले नाहीत; परंतु आमच्यानंतर गादीवर तेच बसणार ना? एक वडील म्हणून आमचे ते कर्तव्य आहे आणि पुत्र म्हणून तो त्यांचा हक्क आहे.
होय महाराज. इथे चिरंजीवांनी असे काही राजकारण खेळले की कुणालाच समजले नाही. त्यांना कोणी पाठिंबा दिला नाही त्यांनी कोणाचा पाठिंबा मागितला नाही. या गोंधळात मतदारांनी त्यांना पाठिंबा दिला आणि ते प्रचंड मतांनी निवडून आले. हा चमत्कार लोकशाहीमध्ये आपल्याच राज्यात होऊ शकतो महाराज.

  • झटका

Back to top button