वाहतूक समस्यांमुळे पर्यटनाला खोडा | पुढारी

वाहतूक समस्यांमुळे पर्यटनाला खोडा

गोव्याचा भूगोल चिमुकला. क्षेत्रफळ केवळ तीन हजार सातशे दोन किलोमीटर. निसर्गाच्या नजाकतीचा सुंदर नजारा. सह्याद्रीच्या रांगेतील काही भूभाग लाभलेला. जल, जमीन, जंगल सारेच लोभस. गोव्याची देखणी समुद्र किनारपट्टी 160 किलोमीटर. जंगल क्षेत्र 33 टक्के. गोव्याची लोकसंख्या सुमारे पंधरा लाख. अशा या भूमीत वर्षाला येणारे पर्यटक 45 ते 50 लाख. पर्यटन हंगाम सुरू होत असे ऑक्टोबरला. त्यानंतर चार-सहा महिने या पाहुण्यांची ये-जा असे. हे पिक्चर बदलले. आता बाराही महिने भेटतात- अतिथी देवो भव. यामुळे सर्व प्रकारचा ताणही सर्व व्यवस्थांना काचत असतो. परिणामी नानाविध समस्यांनी पर्यटन क्षेत्राला ग्रासलेले आहे.

गोव्याला पर्यटनाची जागतिक राजधानी करू, अशी आहे सरकारची भाषा. तिचे स्वागत करताना सांप्रतकाळातील समस्यांच्या बाकीचे काय करायचे? या समस्यांमुळे पर्यटनाला गालबोट लागण्याचे प्रकारही सुरूच असतात. त्याची व्याप्ती वाढते आहे. त्यामुळे प्रश्न पडतो प्रचंड संख्येने पर्यटकांचे ओझे पेलण्याची या भूमीची, सर्व यंत्रणांची सक्षमता आहे का? एकच मुद्दा घेऊ. गोव्याला जाताय? तर गाडी घेऊन जा, असा सल्ला का दिला जातो? गोव्यात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळेही बहुतेक पर्यटक स्वतःचे वाहन घेऊन येण्यास प्राधान्य देतात. मुळात गोव्यात लोकसंख्येपेक्षा जास्त म्हणजे सतरा लाखांवर वाहने. त्यात पर्यटकांच्या वाहनांची भर. परिणामी वाहनांचा महापूर. तासन्तास चक्काजाम. केवळ किनारपट्टी परिसरात नव्हे, तर सर्वत्रच. डिसेंबरमधील एक चक्का जाम असा – शाळेला जाण्यासाठी सकाळी घरातून बाहेर पडलेली मुले दुपार झाली तरी रस्त्यातच. अखेर शाळेला न जाता त्यांना घरी परतावे लागले. पार्किंगचे तीन-तेरा तर नेहमीच वाजलेले. अगदी राजधानी पणजीतदेखील.

वाहतूक व्यवस्था केवळ पुरेशी नव्हे तर पर्यटकांच्या खिशाला परवडणारी नको का? मान्य की पर्यटक चार पैसे खर्च करायला आलेले असतात, ते पैसे उधळायला आलेले नसतात. सर्वच पर्यटक कॅसिनो, डिस्को, डान्स बारसाठीचे नसतात. पणजी, म्हापसा, मडगाव, वास्को, फोंडा यांसारखी प्रमुख शहरे सोडल्यास ग्रामीण गोव्यात जाण्यासाठी पुरेशा बसेसच नाहीत. स्थानिकांनाच बसची व्यवस्था अपुरी पडते. अशा स्थितीत पर्यटकांनी काय पायी जायचे का? कदम कदम बढाये जा करत? पर्यटकांना खासगी पायलट (दुचाकीस्वार), टॅक्सी सेवेवर अवलंबून राहावे लागते. रिक्षांची संख्याही खूपच कमी. गोव्यातले टॅक्सीवाले पर्यटकांना लुटतात असे एक सामायिक समीकरण होऊन मोठा काळ लोटला. गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांची प्रतिमा केवळ देशात नव्हे तर जगात मलीन आहे. त्यांच्याकडून होणार्‍या लुटीचे किस्से समाजमाध्यमात नेहमीच गाजत असतात. कर्णोपकर्णी शब्दाप्रमाणे ‘मोटूमो’ म्हणूया – मोबाईल टू मोबाईल. परदेशी पर्यटक मुंबईहून गोव्यातील दाबोळी विमानतळावर उतरला. तेथून तो कळंगुट समुद्रकिनारी टॅक्सीने गेला. विमानाच्या तिकिटापेक्षा जवळजवळ दुप्पट पैसे त्याला टॅक्सीसाठी मोजावे लागले होते. गाजलेल्या अनेक घटनांपैकी एक.

गोव्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी टॅक्सी व्यावसायिकांना ‘टॅक्सी माफिया’ शब्द वापरला. आता बोला? या हंगामात टॅक्सी व्यावसायिकांमुळे अमेरिकेहून गोव्यात आलेले शंभर प्रवासी आल्या पावली माघारी फिरले. जहाजातून आलेल्या या अमेरिकन पर्यटकांना बसमध्ये बसण्यासच या टॅक्सी व्यावसायिकांनी अटकाव केलेला. गोव्याच्या विधानसभेतही टॅक्सी व्यावसायिकांच्या मनमानीवर अनेकवेळेला चर्चा झाली; कठोर निर्णय घेऊन अंमलबजावणीला कधी मुहूर्त सापडतो पाहायचे.

सध्याचे भाजप सरकार टॅक्सी व्यवसायाला शिस्त लावू इच्छिते. त्यासाठी टॅक्सीवाल्यांना अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्यास सांगून झाले. सध्या असलेल्या अ‍ॅप आधारित खासगी टॅक्सी सेवेत सहभागी होण्यास सांगून झाले. तुम्ही स्वत: अ‍ॅप सेवा सुरू करा, म्हणून सांगून झाले. टॅक्सींना मीटर लावा म्हणून सांगून झाले. मीटरसाठी अनुदान देतो म्हणून सांगून झाले. अनुदानच काय, मीटरच मोफत देतो, म्हणून सांगून झाले. काही मीटर वाटपही करून झाले. आता सरकारने स्वतःचे अ‍ॅप सुरू केलेले आहे. मुख्यमंत्री, वाहतूक मंत्री, पर्यटन मंत्री सर्वांनी टॅक्सीवाल्यांना मानसिकता बदला, पर्यटकांना लुटू नका, सरकारशी चर्चा करा अशी आर्जवे केली. बहाद्दर टॅक्सीवाले काही नमायला तयार नाहीत. ते दुराग्रही, हटवादी भूमिका सोडायला तयार नाही. टॅक्सीचे स्टेअरिंग नीट पकडा. स्वतःला बदला, काळाची पावले ओळखा, नाहीतर काळ तुम्हाला बदलेल, असे सर्व संबंधितांनी बजावले. अजून तरी फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे गोव्यात कसा प्रवास करावयाचा हो… ही पर्यटकांची विचारणा कायम आहे.

– सुरेश गुदले

Back to top button