उपेक्षित प्रतिभांचा गौरव | पुढारी

उपेक्षित प्रतिभांचा गौरव

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांनी विविध क्षेत्रातल्या गुणवत्तेचा आणि कर्तृत्वाचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे. देशाच्या या सर्वोच्च नागरी सन्मानांकडे सर्वांचे लक्ष असते आणि या यादीत आपले नाव कधीतरी समाविष्ट व्हावे, अशी मनीषा अनेकजण बाळगून असतात. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन विभागांमध्ये हे पुरस्कार देण्यात येतात. कला, समाजकार्य, उद्योग, विज्ञान, वैद्यकीय, शिक्षण, साहित्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये विशेष सेवा बजावणार्‍या कर्मयोगींचा गौरव केला जातो. अनेकजण कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न करता आपण स्वीकारलेल्या क्षेत्रात निष्ठेने, निरपेक्षपणे काम करीत असतात. अशा उपेक्षितांचाही सन्मान होताना दिसतो. केंद्रातील सरकारकडून पुरस्कार दिले जात असल्यामुळे त्यावर सरकारच्या विचारधारेचा प्रभाव असणे स्वाभाविक असते. परंतु पुरस्कार दिले जाताना मात्र कर्तृत्वाचाच विचार केला जातो आणि त्यासाठीचे निकषही कठोर असतात. सरकार म्हणून काम करताना पक्षीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन काम करायचे असते, याचा वस्तुपाठ या पुरस्कारांच्या निमित्ताने मोदी सरकारने घालून दिला. त्याचमुळे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर करण्यात आला. मुलायमसिंह यांनी आयुष्यभर भाजपच्या विचारधारेच्या विरोधात काम केले. परंतु त्यांचे देशाच्या राजकारणातील योगदान महत्त्वपूर्ण आहे.

पक्षीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन सरकारने त्यांची नोंद घेतली. यापूर्वीही मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शरद पवार यांना पद्मविभूषणने सन्मानित केले होते, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांनी अखेरच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांचे आयुष्य काँग्रेसमध्ये गेले, त्यांनाही पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. यादीतल्या प्रत्येकाचे कर्तृत्व डोंगराएवढे आहे, परंतु त्यातही काही वेगळी नावे आहेत. त्यामध्ये डॉ. दिलीप महालनाबिस यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. महालनाबिस यांनी शोधलेल्या ‘ओआरएस’च्या फॉर्म्युल्यामुळे दरवर्षी जगभरातील पाच कोटी बालकांचे प्राण वाचतात. विसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाचा शोध म्हणून त्याकडे पाहिले जाते, तो शोध लावणार्‍या महालबानिस यांना मरणोत्तर पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. यंदाच्या पद्म पुरस्कार्थींच्या यादीत 106 जणांचा समावेश असून त्यामध्ये जसे चर्चित चेहरे आहेत, तसेच अनेक उपेक्षित प्रतिभावंत आहेत. त्याअर्थाने विचार केला तर या पुरस्कारांनी अनेक दुर्लक्षित गुणवंतांचा सन्मान केला. 106 पुरस्कारांमध्ये सहा जणांना पद्मविभूषण, नऊ जणांना पद्मभूषण तर 91 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले. यंदाच्या पुरस्कारांचे वैशिष्ट्य म्हणजे 19 महिलांचा त्यात समावेश आहे. सात जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाले, तर दोन अनिवासी भारतीयांचाही सन्मान झाला. देशाच्या कानाकोपर्‍यात निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सुरू असलेल्या सेवेचा हा गौरव आहे.

महाराष्ट्रातील बारा जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये कला क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेले जसे नामांकित आहेत, तसेच लोकांना माहीत नसलेले दुर्लक्षितही आहेत. तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांनी तबला वादनाने आणि शैलीनेही अनेक पिढ्यांवर गारूड केले. शास्त्रीय संगीताच्या मैफलीच्या पलीकडे तबल्याची लोकप्रियता पोहोचवली, त्यांनाही पद्मविभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. कुमार मंगलम बिर्ला यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात, दीपक धर यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात, तर गायिका सुमन कल्याणपूर यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण जाहीर झाला. लता मंगेशकर यांच्या काळात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणार्‍या प्रतिभावंत गायिका म्हणून सुमन कल्याणपूर यांचे नाव घेतले जाते. त्यांची दखल घेण्यास काहीसा उशीर झाला असला तरी ती घेतली, हे महत्त्वाचे. पुण्या-मुंबईतल्या कला क्षेत्रातल्या लोकांना लवकर ओळख मिळते आणि मानसन्मानही मिळतात. परंतु त्यापलीकडे राज्याच्या कानाकोपर्‍यातही कलेची सेवा करणारे अनेक कलावंत असतात, त्यांच्यापर्यंत हे सन्मान अपवादानेच पोहोचतात. विदर्भात झाडीपट्टी रंगभूमी लोकप्रिय असून परशुराम कोमाजी खुणे हे त्या रंगभूमीवरचे लोकप्रिय अभिनेते. ‘विदर्भाचे दादा कोंडके’ म्हणून त्यांना ओळखले जाते. पद्मश्री पुरस्कारामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील जनतेला त्यांच्याबरोबरीने झाडीपट्टी रंगभूमीचीही ओळख होण्यास मदत होणार आहे.

लोकसाहित्याच्या अभ्यासाच्या क्षेत्रात काम करणार्‍या डॉ. प्रभाकर मांडे यांचा गौरवही असाच उल्लेखनीय. भिकूजी इदाते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समरसता मंचाच्या माध्यमातून दीर्घकाळ समाजसेवा करीत आहेत. गजानन माने हेही उपेक्षित समाजसेवक यादीत आहेत. लेखक रमेश पतंगे, विमान कंपनी सुरू करणारे राकेश झुणझुणवाला, अभिनेत्री रविना टंडन यांचाही ‘पद्मश्री’च्या यादीत समावेश आहे. याव्यतिरिक्त महाराष्ट्राला परिचित असलेले आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे सुधा मूर्ती. लेखिका म्हणून मराठी माणसाला त्यांचा परिचय असला तरी इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या समाजकार्याचा पद्मभूषण देऊन सन्मान करण्यात आला, हे लक्षात घ्यावे लागेल. कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांचे देशभरात आदराने नाव घेतले जाते.

विविध भाषांमध्ये त्यांच्या साहित्यकृतींचा अनुवाद झाला असल्यामुळे मराठीसह अनेक भाषांमधील वाचकांना ते आपल्या भाषेतील लेखक वाटतात. भैरप्पा यांचा होत असलेला सन्मान हा त्यांच्या विचारसरणीच्या पलीकडे लेखक म्हणून असलेल्या महानतेचा सन्मान आहे. पद्म पुरस्कारांची घोषणा हा खर्‍या अर्थाने एक राष्ट्रीय सोहळा असतो. देशाभिमान आणि राष्ट्र प्रथम भावनेचा जागर करणारा हा सोहळा प्रजासत्ताक दिनाचा आनंद द्विगुणित करणारा असतो. यंदाच्या पुरस्कारांनी झाकीर हुसेन यांच्या तबल्यापासून झाडीपट्टी रंगभूमीवरच्या परशुराम खुणे यांच्यापर्यंतच्या विविध गुणवंतांचा गौरव करून पुरस्कारांची शान वाढवली गेली आहे.

Back to top button