लवंगी मिरची : जोडाजोडी | पुढारी

लवंगी मिरची : जोडाजोडी

कार्यकर्ता : हॅलो राहुल दाजी, राम राम!
कार्यकर्ता : पश्चिम महाराष्ट्रातून बोलतोय.
राहुल : अरे दादा, दाजी कशाला म्हणायला पाहिजे मला? अजून माझं लग्न झालेलं नाही.
कार्यकर्ता : तसं नाही, कवा ना कवा होईलच का नाही? तेव्हा तुमची बायको म्हणजे आमची बहीणच होणार की. म्हणून आम्ही तुम्हाला दाजी म्हणत असतो. बरं ते जाऊ द्या. आपली यात्रा कुठंपर्यंत आली? काश्मीरपर्यंत आली होती म्हणे, काय झालं पुढे?

राहुल : काय नाही सध्या स्थगित केली आहे.
कार्यकर्ता : आम्ही इथून पाच पन्नास कार्यकर्ते येणार होतो तुमच्याबरोबर चालायला. म्हटलं चला तेवढेच आपले फोटो येतील तुमच्याबरोबर; पण आज पेपरात वाचलं की, यात्रा स्थगित झाली म्हणून. ती आपली जोडाजोडी करायची यात्रा. अजून तुमची लग्नासाठी कुणाबरोबर जोड बसली नाही; पण ही जोडाजोडी यात्रा मात्र जोरात चाललीआहे. तुमचे कौतुकच करायला हवे.
राहुल : दादा, अरे सध्या हवामान खराब असल्यामुळे यात्रा स्थगित केली आहे. हवामान नीट झालं की पुन्हा चालणार.
कार्यकर्ता : राहुल दाजी, देश केवढा मोठा. प्रत्येक राज्यात वेगळं हवामान, कमी-जास्त होणारच की. त्याच्यामुळे यात्रा कुठे स्थगित करतात काय. हवा असो, नसो चालत राहिलेच पाहिजे. म्हणजे आपलं जोडाजोडीचे काम थांबायला नाही पाहिजे होतं. आमच्यासारखे कार्यकर्ते नाराज होतात. चालत राहा , टाके भिडवत राहावा, एकजूट शिलाई दिसते बघा. बरं, मग आता तुम्ही म्हणता हवामान नीट नाही. नीट नाही म्हणजे आभाळातलं हवामान म्हणायचं का राजकारणातलं? तुमच्या भारत जोडो यात्रेला खूपच गर्दी झालेली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एखादा हिरो नाहीतर हिरोईन सोबत असू द्या. त्यांना बघायला पब्लिक अशी गर्दी करते की, बघायचं काम नाही.

तीन महिन्यांपूर्वी आमच्या जयसिंगपुरात एक हिंदी पिक्चरची हिरोईन आली होती. काय गर्दी उसळली होती म्हणून सांगू. तोबा गर्दी. जिकडं पाहावं तिकडं माणसंच माणसं. झाडावर बसलेली, गच्चीवर बसलेली. आणि जशी का हिरोईन आली तशी तिच्या मागे लागले सगळे पळायला. तुमचं काय झालं आहे, तुम्ही आहात मोठ्या घरचे; पण हिरोईनचे वेगळेच असते बघा. माझं तर म्हणणं आहे की, पाच पंचवीस हिरोईन घेऊन टाका आपल्या पक्षात. या हिरोईन तुमच्याबरोबर चालायला लागल्या की, असे काही आणखी पब्लिक जमेल की, मोजायला सोय नाही पडणार. भव्य प्रतिसाद म्हणून बातम्या द्यायला मीडिया आहेच. पाच पंचवीस हिरोईन आणल्या आन् त्यांच्यातल्या एखादीबरोबर टाका भिडवा म्हणजे तुमचे लग्नाचे मार्गी लागेल.

पोरांचे लग्न होणे आता फार अवघड झाले आहे. त्यात ना तुम्हाला जमीन, ना ऊस, ना नोकरी. कसं काय व्हायचं तुमचं? आईला कशी काय काळजी वाटत नाही म्हणतो मी? अजून तुमचंच काही मार्गी नाही म्हटल्यावर काय जोडाजोडी करणार तुम्ही? त्याच्यापेक्षा एक काम करा. एखादीबरोबर जोड लावा, चार दिवस यात्रा स्थगित झाली तरी चालते; पण आधी आपली जोडी करून घ्या गड्या. त्याच्याशिवाय बाकी जोडाजोडीचं काही खरं नाही. मी आपला एक सामान्य कार्यकर्ता आहे. देश जोडता येईल, आधी नवरा-बायकोचा टाका भिडला पाहिजे, जोडला पाहिजे तर बाकी काही खरं आहे. या वयात पोरगी तरी कोण देणार तुम्हाला? आमच्या भागात तर अजिबात नाही. पोरींचे बाप पार पाचव्या मजल्यावरून बोलायला लागलेत. शेती किती? ऊस किती? दुकानं किती? नोकरी असेल तर पॅकेज किती? शंभर प्रश्न विचारतात.

– झटका 

Back to top button