राजस्थानात ‘काँग्रेस तोडो’! | पुढारी

राजस्थानात ‘काँग्रेस तोडो’!

राजस्थानात दोन नेत्यांमधील संघर्षाने काँग्रेस धराशायी होण्याच्या मार्गावर आहे. पक्षापेक्षा आपणच मोठे असल्याच्या थाटात वावरणार्‍या या नेत्यांनी पक्षनेतृत्वाचे आदेश धुडकावून लावत सवता सुभा मांडला. या नेत्यांची बेलगाम महत्त्वाकांक्षा आणि टोकाच्या राजकीय द्वेषामुळे पक्ष आतून पुरता पोखरला आहे. सत्ताधारी पक्षातील ही सुंदोपसुंदी भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडेल काय?

पक्षसंघटनेची बांधणी आणि आगामी निवडणुकांच्या तोंडावर जनमताचा कानोसा घेण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेवर बाहेर पडलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थानातील यात्रा संपवून ते मार्गस्थ झाले. त्यांची पाठ फिरते न फिरते तोच या राज्यातील पक्षनेत्यांनी आपल्या ‘काँग्रेस तोडो’ मोहिमेला नव्या दमाने सुरुवात केलेली दिसते. राहुल यांचा यात्रेदरम्यान राज्यात वीस दिवस मुक्काम होता. त्यामुळे पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण काहीसे थंडावले होते.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मुख्यमंत्रिपदाचे दावेदार युवा नेते सचिन पायलट यांच्यातील मतभेद संपले की काय, असा आभास दोन्ही नेत्यांकडून पद्धतशीरपणे तयार केला गेला. पायलट यांनी तर राहुल-प्रियांका निष्ठेचे ट्विटर प्रदर्शनही केले. आता दोन्ही गटांकडून हा वाद नव्याने उफाळला आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत नवी वाट शोधणारे पायलट यांनी प्रचार यात्राही सुरू केली असून यात्रेतून ते शेतकरी, तरुणांशी संवाद साधत आहेत. तसेच आपल्या गटाची मुळे तपासून पाहात आहेत.

प्रसंगी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागलाच तर त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांची कितपत तयारी आहे, सामान्य जनता कोणाच्या पाठीशी आहे, याची चाचपणी ते करत आहेत. ही मोर्चेबांधणी कशासाठी, हे आता लपून राहिलेले नाही. निमित्त पक्षबांधणीचे असल्याने त्याला तूर्त तरी कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही आणि कोणी घेतलाच तर तो न जुमानण्याची त्यांची मानसिकता नाही. आपल्या यात्रेत जाहीर सभांतून काय बोलत आहेत, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यांनी आपल्याच सरकारच्या विरोधात थेट आघाडी उघडली असून मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निर्णयांवर ते तोफा डागत आहेत.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षात सन्मान होत नाही, त्यांना पदे दिली जात नाहीत, निवृत्त अधिकार्‍यांना ही पदे देण्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत, असा टीकेचा सूर त्यांनी लावला आहे. त्यांचा यावेळचा पवित्रा बंडाचा जसा आहे, तसा राज्यातील तसेच केंद्रीय नेतृत्वाला ललकारण्याचाही आहे. जोरदार शक्तिप्रदर्शन करीत ते काँग्रेस नेतृत्वाला इशारा देत आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी अखेरचा दबाव टाकण्याचा प्रयत्न म्हणूनही त्याकडे बघितले जाते. हाती काहीच लागले नाही तर, पक्षात अन्याय झाल्याच्या कारणावरून बाहेर पडण्याचा मार्ग प्रशस्त करण्याच्या प्रयत्नात ते आहेत.

सरकार कोंडीत

आपलेच सरकार कोंडीत कसे पकडता येईल, त्यासाठी कामाला लागलेले पायलट अप्रत्यक्षरीत्या भारतीय जनता पक्षाला मदत करीत आहेत. भाजपचे अर्धेअधिक काम त्यांनी निवडणुकीआधीच सोपे केले आहे. राज्यातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला त्यांनी हात घातला आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे पेपर फुटी प्रकरण सध्या गाजते आहे. गेल्या महिन्यात आयोगाच्या परीक्षेआधी पेपर फुटला, हा विषय घेऊन ते जनतेत गेले आहेत. सरकारी बंदोबस्तात असलेल्या प्रश्नपत्रिका कशा काय फुटल्या? त्याला पाय फुटले की कोणी जादू केली? असे प्रश्न ते उपस्थित करून बेरोजगार तरुणांची मने जिंकण्याची त्यांची धडपड आहे. जादू या शब्दावर त्यांनी भर दिला आहे तो मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठी, तसेच ‘राजस्थानच्या राजकारणाचे जादूगार’ अशी गेहलोत यांची ओळख असल्यामुळे!

मुख्यमंत्रिपदासाठी गेहलोत-पायलट यांच्यातील संघर्ष नवा नाही. पायलट यांनी अलीकडेच त्यासाठी 19 आमदारांना सोबतीला घेऊन बंडाचा झेंडा हाती घेतला होता. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या मध्यस्थीने पायलट यांचे हे विमान उतरवण्यात आले. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत गेहलोत, पायलट या दोन नेत्यांना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्याचा तोडगा पक्षनेतृत्वाने काढला होता. तथापि, तो पाळला गेला नाही. त्याचेच धक्के पक्षाला आता ऐन ‘रण’धुमाळीत बसू लागले आहेत. कधी पायलट थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान देतात, तर कधी मुख्यमंत्री गेहलोत केंद्रीय नेतृत्वाला! पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेहलोत यांनी नेतृत्वाचा निर्णय धुडकावलाच, पक्षच हायजॅक करण्याचा प्रयत्न केला होता, आमदारांना हाताशी धरून पक्षाच्या बैठकीवर बहिष्कारही घातला होता. त्यावेळी पक्षाने निलंबित केलेल्या आमदार, काही नेते आणि पदाधिकार्‍यांचे निलंबन परस्पर मागे घेण्याचा निर्णयही त्यांनी नेतृत्वाला अंधारात ठेवून घेतला आहे. पायलट यांच्यावर त्यांनी गद्दार असा शिक्का मारला असून भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केल्याचा आरोपही ते करत असतात. पायलट यांना काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊच द्यायचा नाही, असा चंग त्यांनी बांधला आहे.

गद्दार कोण, निष्ठावंत कोण?

भारतीय जनता पक्षाला राज्यात सत्तेवरून बाजूला करण्यात मोठा वाटा उचलणारे हे दोन नेते राजकीय संषर्घात मागे हटायचे नाव घेईनात. एकाच पक्षाकडे सत्ता न देता काँग्रेस आणि भाजप असे सत्तांतर घडवून आणणार्‍या राजस्थानचे रण निवडणुकीआधीच तापले असून आता भाजपला सत्तेवर येण्यापासून रोखण्याचे मोठे आव्हान या पक्षासमेार आहे. ते कसे? याचे उत्तर जसे कोणाकडे नाही तसेच गद्दार कोण? निष्ठावंत कोण? याचेही उत्तर नाही. पक्षाचे राजस्थानचे प्रभारी अजय माकन यांनीही या भांडकुदळ नेत्यांसमोर हात टेकले असून या पदावर कामच न करण्याचा पवित्रा घेतला आहे. तो पक्षाला अधिक अडचणीत आणणारा ठरतो आहे. काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाचा बदल झाला आणि नेतृत्व गांधी घराण्याबाहेर गेल्याचा दावा किती तकलादू आहे हेच यावरून स्पष्ट होते! पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही या विषयाकडे केलेली डोळेझाक हेच त्याचे ‘उत्तर’ म्हणावे लागेल! देशात उरल्या-सुरल्या दोन राज्यांपैकी पक्षाची सत्ता असलेले हे महत्त्वाचे राज्य आणि पक्षाची झालेली दशा हा नेतृत्वाची निर्नायकी दर्शवणारा आहे.

हे दोन नेते मनमानी करीत पक्षाचा उंट हाकत आहेत. तो दिशाहीन झाला आहेच, त्याला वेळीच मार्ग दाखवण्याची नेतृत्वाचीही इच्छा दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसला येत्या काळात मोठा धक्का बसला तर नवल वाटायला नको. पायलट यांच्यासमोर बंडाचा झेंडा हाती घेण्याशिवाय पर्याय दिसत नाही. त्यासाठीचे मैदान ते तयार करत आहेत!

विजय जाधव

Back to top button