कोकण महामार्ग की मृत्यूचा सापळा? | पुढारी

कोकण महामार्ग की मृत्यूचा सापळा?

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग अल्प काळात पूर्ण झाल्याचे सांगितले जाते आणि ते खरेच आहे. आता नव्याने मुंबई ते दिल्ली महामार्गाचीही घोषणा केली गेली आहे. तथापि, मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या कामाला मात्र गती मिळत नाही, अशी जी स्थिती आहे ती गंभीर म्हटली पाहिजे. हे काम युद्धपातळीवर पूर्ण व्हायला हवे.

कोकणातील दळणवळणाच्या द़ृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दैवाचे दशावतार गेली 15 वर्षे मागील पानावरून पुढे सुरू आहे. 2007 साली पळस्पा ते इंदापूर या जवळपास 99 किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरण घोषित झाले. तथापि, 2023 या नववर्षाला सुरुवात झाली तरीदेखील हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यानंतरचा टप्प्पा म्हणजे इंदापूर ते झारा. जवळपास 400 किलोमीटरचा हा टप्प्पा असून त्याच्या काँक्रिटीकरण आणि चौपदरीकरणाची घोषणा झाली.

प्रत्यक्षात या कामाला 2016 मध्ये प्रारंभ झाला. हे कामही 2023 उजाडले तरी पूर्ण झालेले नाही. उच्च न्यायालयानेही या मार्गाच्या दुरवस्थेबाबत सरकारला खडे बोल सुनावले. त्यानंतरही या मार्गाच्या स्थितीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. अलीकडेच माणगावजवळ अपुर्‍या असलेल्या रस्त्यावर जे डायव्हर्शन दाखवण्यात आले होते, त्या ठिकाणी ट्रक आणि कार यांची धडक होऊन दहा प्रवाशांचा मृत्यू झाला. गेल्या 15 वर्षांतील अपघातांची आणि मृत्यूंची संख्या काढली तर जवळपास 700 ते 800 अपघात होऊन एक हजारापेक्षा अधिक माणसांना प्राण गमवावे लागले आहेत. अपघातांची ही आकडेवारीच या मार्गाची भीषणता दर्शवते.

एका बाजूला भारत हा सर्वात जलद रस्ते बनवणारा देश, अशी आपण आपली ओळख सांगतो. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग अल्प काळात पूर्ण झाल्याचे सांगितले जाते आणि ते खरेच आहे. आता नव्याने मुंबई ते दिल्ली महामार्गाचीही घोषणा केली गेली आहे. तथापि, मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या कामाला मात्र गती मिळत नाही, अशी जी स्थिती आहे ती गंभीर म्हटली पाहिजे. यावर आता चौफेर टीका होत आहे. यासंबंधी जी कारणे दिली जात आहेत,

त्यातील एक म्हणजे ठेकेदाराने काम पूर्ण केले नाही. त्याच्याकडून काम काढून घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ते प्रकरण न्यायालयात गेले. त्यामुळे नवा ठेका देण्यास उशीर झाला. जुन्या ठेकेदाराने मागितलेली नुकसान भरपाईची रक्कम अव्व्वाच्या सव्वा प्रमाणात आहे. त्यामुळे ती प्रचंड रक्कम सरकार देऊ शकत नाही यासारखी अन्य कारणे देत काम थांबल्याचे समर्थन केले जात आहे. वास्तविक ते अनाकलनीय आहे. खरे तर मुंबई आणि कोकण यांचे नाते हे वर्षानुवर्षांचे आहे. मुंबईसुद्धा कोकणातच येते.

मुंबईतील मूळच्या कोकणवासीयांची संख्या मोजायची म्हटले तर तीसुद्धा 50 लाखांहून अधिक असल्याचे दिसते. विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हेही कोकणातील आहेत. या रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हापासून राज्यात पाच सार्वजनिक बांधकाम मंत्री बदलले गेले आहेत. तरीही हा महामार्ग पूर्ण झालेला नाही. महाराष्ट्रातील हा अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे. केंद्रातही महाराष्ट्राचे मंत्री आहेत आणि ज्या कोकणात हा रस्ता जातो त्याच कोकणचे सुपुत्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. असा योग जुळून आल्यानंतर तरी किमान हा महामार्ग होईल, अशी कोकणवासीयांची अपेक्षा आहे.

या महामार्गावर सर्वाधिक गाड्या धावतात त्या गौरी गणपती आणि आंगणेवाडीच्या जत्रेच्या वेळी. आंगणेवाडीची जत्रा 4 फेब्रुवारीला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या महामार्गाच्या उपयुक्ततेची चर्चा सुरू झाली आहे. या महामार्गावर अपुर्‍या कामामुळे 25 ठिकाणी ब्लॅकस्पॉट तयार झाले आहेत. हे ब्लॅकस्पॉट नागोठणे ते राजापूर या 300 किलोमीटरच्या मार्गावर आहेत. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतच प्रामुख्याने हे काम रखडलेले आहे. पणजी ते खारेपाटण हा जवळपास 150 किलोमीटर मार्गाचा टप्प्पा पूर्णत्वाला गेला आहे.

संगमेश्वर, चिपळूण, खेड, पोलादपूर, माणगाव या टप्प्यांत चौपदरीकरण आणि काँक्रिटीकरण रखडले आहे. कशेळी घाट, परशुराम घाट, भोस्ते घाट, सुकेळी खिंड येथे मोठ्या प्रमाणात अपघात होतच आहेत. याचे कारण म्हणजे या महामार्गाचे अपूर्ण काम. म्हणूनच या महामार्गाच्या रखडलेल्या कामाचे वास्तव ठसठशीतपणे समोर येताना दिसते. याबद्दल दिरंगाई परवडणारी नाही. त्यामुळे निदान आता तरी विद्यमान सरकारने ठोस पावले उचलून या महामार्गाला गती द्यावी एवढीच अपेक्षा.

– शशिकांत सावंत

Back to top button