कर्म तसे फळ | पुढारी

कर्म तसे फळ

मुलाखतः उद्योजक

प्रश्न : आज आपण एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जाता याबद्दल अभिनंदन! आपण बालपणापासून आतापर्यंत काय काय वाचन केले आहे?
उत्तर : वाचन? अच्छा वाचन. खरंतर पुस्तके अशी वाचलीच नाहीत. वाचल्या त्या बारीक अक्षरातल्या कॉप्याच, म्हणजे मायक्रो झेरॉक्स. बाकी काही नाही .
प्रश्न : नाही, म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त तुम्ही काय वाचन केले आहे?
उत्तर : त्याचे काय आहे की, आमच्या वडिलांची रॉकेलची एजन्सी होती. रेशनचे दुकान होते. घरात कोणी काही वाचायला लागले की, ते सरळ छडीने मारले जायचे. भयंकर राग होता त्यांना वाचनाचा. वाचन केल्याने माणूस सुसंस्कृत होतो आणि त्याची डेरिंग खल्लास होते, असे त्यांचे मत होते. वाचायचीच असतील तर ऐतिहासिक पुस्तके वाचली पाहिजेत असे ते म्हणायचे. ती कशासाठी? तर केव्हा माघार घ्यायची, रणांगणातून पळ कसा काढायचा, शत्रूचा गेम कसा करायचा. मला त्याचा खूपच फायदा झाला आयुष्यात.
मुलाखत ः प्राध्यापक
प्रश्न : वाचन संस्कृती कमी होत आहे, याबद्दल आपले मत काय?
उत्तर : माझे स्वतःचे दोन कथासंग्रह, एक कवितासंग्रह, एक नाटक आणि मराठी व्याकरणाचे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. परवाच माझ्या कथासंग्रहाला वाचनालयाचा विश्व साहित्याचा पुरस्कार मिळालेला आहे. ते असो. लोक वाचत नाहीत. कारण वाचन संपले आणि दर्शन सुरू झाले. दर्शन म्हणजे दूरदर्शन, म्हणजे टीव्ही आणि नंतर मोबाईल आले. टीव्हीवरील शेकडो चॅनेल्स, त्यावरील हजारो मालिका, लाखो मल्लिका, रिअ‍ॅलिटी शोज, करोडपती करण्याचे कार्यक्रम बंद करून एखादा वाचत बसला तर त्याच्या हाताशी मोबाईल असतो. त्या मोबाईलवर नाही नाही ते सारखे येत असते. आणि खरंच, असा कोणी वाचन करत बसला तर घरातील सदस्य आधी त्याला वेड्यात काढतील.
प्रश्न : बरोबर आहे तुमचे म्हणणे; पण मग यावर उपाय काय?
उत्तर : आम्ही प्राध्यापक साहित्यिक मंडळी उपाय काढतच असतो. आता हेच पाहा ना. माझी पाच पुस्तके छापून झाली. ऑफ द रेकॉर्ड सांगतो की, ही सर्व माझ्याच खर्चाने प्रकाशित झाली आहेत. त्याचे गठ्ठेच्या गठ्ठे दोन वर्षे माझ्या घरात माळ्यावर पडून होते. गतवर्षी मग माझ्या मनात एक विचार चमकून गेला. माझ्या मुलाच्या लग्नात देण्यासाठी म्हणजे देण्या- घेण्यासाठी, म्हणजे अहो रिटर्न गिफ्टसाठी मी काहीही खरेदी केले नाही. ज्यांनी मला नगदी किंवा उपहार स्वरूपात आहेर केले त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून मी सुंदर पॅकिंग करून माझा एकशे ऐंशी रुपये एमआरपी असलेला कवितासंग्रह देऊन टाकला आणि पुस्तकाची पहिली आवृत्ती संपवली. मला कल्पना आहे की, शंभरातील पन्नास लोकांनी पुन्हा म्हणून माझ्याकडे कार्याला यायचे नाही असे ठरविले असेल. चाळीस जणांनी मला भविष्यात कुठलाच आहेर करायचा नाही हे ठरवले असेल. उर्वरित पैकी आठ लोकांनी तत्काळ ते पुस्तक रद्दीमध्ये भिरकावले असेल; पण हे लोक महत्त्वाचे नाहीत. शेवटच्या दोन पैकी एकाने जरी ते वाचले तरी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी भरीव कार्य केल्यासारखे होईल. अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने राज्यात काम करणारा मी पहिला साहित्यिक आहे; पण लक्षात कोण घेतो? मी लिहिलेल्या इतर पुस्तकांच्या पडून असलेल्या प्रती संपवण्यासाठी मी दिवाळीनंतर माझ्या मुलीचे लग्न काढले आहे. नातवंडांच्या मुंजीपर्यंत सर्व पुस्तकांच्या नवीन आवृत्ती छापून घ्याव्या लागतील असे दिसते.

– झटका 

Back to top button