भाजपचे ‘मिशन 2024’ | पुढारी

भाजपचे ‘मिशन 2024’

राजकारणाच्या केंद्रस्थानी निवडणुकाच असतात आणि सगळे राजकारण निवडणुकांभोवती फिरत असते; परंतु लोकांपुढे केवळ निवडणुकांच्या गोष्टी घेऊन जाण्यात हशील नसते, हे जाणत्या राजकीय नेतृत्वाला ठाऊक असते. ऐवज निवडणुकीचाच; परंतु त्याला विकासनीतीची जोड असेल तर त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढत असतो आणि हे इप्सित देशाच्या राजकारणावर निर्विवाद वर्चस्व मिळवलेल्या भारतीय जनता पक्षाइतके इतर कुणाला उमगणे शक्यही नाही.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ताज्या बैठकीतून नेमके हेच दिसून आले. पक्षाला गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकून ‘शतप्रतिशत भाजप’चे राजकारण करायचे आहे. भारताला जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवल्याचे, तसेच सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने नेल्याचे आणि कोरोना काळातील प्रभावी उपाययोजना राबविल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा ठसवण्यात आले.

अर्थात, या गोष्टीही पुन्हा पूरक म्हणता येतील अशा आहेत. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा हेच भाजपचे शक्तिस्थान आणि भांडवल असून, निवडणुकांना सामोरे जाताना तेच कामी येणार आहे. त्याचमुळे विरोधी पक्षांकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर केली जाणारी टीका हा बैठकीतील चर्चेचा एक प्रमुख मुद्दा राहिला. पेगॅसस हेरगिरी, राफेल दलाली प्रकरण, ईडीच्या कारवाया, मनी लाँड्रिंग, सेंट्रल विस्टा प्रकल्प, नोटाबंदी आदी मुद्द्यांवरून विरोधकांनी पंतप्रधानांच्या विरोधात बदनामीची मोहीम चालवली. हे सगळे विषय न्यायालयात नेण्यात आले;

परंतु न्यायालयांचे निकाल सरकारच्या बाजूने लागले आणि कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून विरोधकांचा बुरखा फाडल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या पार्श्वभूमीवर म्हटले आहे. मोदी भारताला विश्वगुरू बनवण्याचा प्रयत्न करीत असताना विरोधक मात्र संकुचित दृष्टीने त्यांच्या बदनामीची मोहीम चालवत असल्याचा आरोप कायदामंत्री किरेन रिजीजू यांनी केला आहे.

जी-20 चे अध्यक्षपद भारताकडे आले हा देशाचा गौरव असल्याचे आणि तो मोदींमुळे लाभला, मोदींनी प्रस्ताव मांडल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केला. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणले. आर्थिक संकटाशी झुंजणार्‍या श्रीलंकेला मदत केली, आदी बाबींचा त्यासंदर्भाने गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. पंतप्रधानांची प्रतिमा हा भाजपसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचेच बैठकीतील चर्चेवरून समोर आले.

अर्थात, या चिंतेचे कारण ठरली आहे, ती राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’. काँग्रेसला जनाधार नसल्याचे वातावरण निर्माण केले जात असताना राहुल गांधी यांच्या या यात्रेला मिळणारा प्रतिसाद आणि राहुल गांधी यांची काहीशी बदलणारी प्रतिमा हा भाजपच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. त्यातूनच मोदी यांच्या प्रतिमेचा मुद्दा कार्यकारिणीच्या बैठकीत प्रामुख्याने चर्चेत आला.

आगामी निवडणुकांमध्ये भाजपच्यादृष्टीने अयोध्येतील राम मंदिर आणि राष्ट्रवाद हे मुद्दे महत्त्वाचे असतील, आणि तेच केंद्रस्थानी ठेवून पक्ष निवडणुकांना सामोरा जाईल, याचेही संकेत बैठकीच्या निमित्ताने मिळाले. पंतप्रधान मोदी यांनीच लक्षात आणून दिल्यानुसार लोकसभा निवडणुकांना फक्त चारशे दिवस उरले आहेत. याचा अर्थ एक वर्ष आणि जेमतेम काही दिवस. सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी हा कालावधी तसा कमीच म्हणावा लागेल.

कारण, दरम्यानच्या काळात नऊ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे सरकारची कामे लोकांपर्यंत घेऊन जाण्यात अडथळे येणार आहेत. याचा विचार करून कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे, असाच संदेश बैठकीतून देण्यात आला. नऊ राज्यांच्या विधानसभांची आणि लोकसभेची तयारी यादृष्टीने भाजप तयारीला लागला असताना विरोधी गोटात मात्र त्यादृष्टीने काहीही हालचाली नाहीत.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर नेहमी निवडणुकीच्या तयारीत असलेले नेते म्हणून टीका केली जाते; परंतु राजकारणात बारा महिने चोवीस तास सक्रिय राहावे लागते, हेच त्यांनी दाखवून दिले आहे. पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व जेव्हा गतिमानतेने काम करीत असते, तेव्हा तीच गती तळागाळातले कार्यकर्तेही राखतात. भाजपविरोधात नकारात्मक मोहिमा राबवूनही अनेक निवडणुकांमध्ये भाजपने यश मिळवले, त्याचे कारणही याच वरपासून खालपर्यंतच्या गतिमानतेमध्ये आहे.

पक्षाचे विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ येत्या 20 जानेवारीला समाप्त होत होता; परंतु त्यांना जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, याचा अर्थ 2024 च्या लोकसभा निवडणुका पक्ष नड्डा यांच्या अध्यक्षतेखालीच लढवणार आहे. सलग दुसर्‍यांदा अध्यक्षपद मिळणारे नड्डा हे लालकृष्ण अडवाणी आणि अमित शहा यांच्यानंतरचे तिसरे अध्यक्ष बनले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा विश्वास संपादन केल्यामुळेच नड्डा यांना ही संधी मिळाली. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने 120 निवडणुका लढवल्या, त्यापैकी 73 निवडणुकांमध्ये यश मिळाले.

मोदींची लोकप्रियता मतांमध्ये परावर्तित करण्यामध्ये नड्डा यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दस्तुरखुद्द अमित शहा यांनी म्हटले आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत 303 जागा जिंकणार्‍या भाजपने 2024मध्ये 350 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नाजूक स्थिती असलेल्या 160 जागांची यादी पक्षाने तयार केली असून, त्याठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्यासाठी अमित शहा 11 राज्यांचा दौरा करणार आहेत. भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, सलग तिसर्‍यांदा सत्तेवर येण्यासाठी कंबर कसली आहे. विरोधकांनी कितीही रान उठवले तरी त्याची फिकीर न करता निश्चित केलेल्या मार्गाने मार्गक्रमण करण्याचा निर्धार भाजपने या बैठकीच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. निवडणुकांच्या तयारीच्या पातळीवर अन्य विरोधकांना मागे टाकून भाजप खूप पुढे गेला आहे.

Back to top button