ममता बॅनर्जी आहेत कुठे? | पुढारी

ममता बॅनर्जी आहेत कुठे?

देशात विरोधी आघाडीची मोट बांधण्याच्या तयारीत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी सध्या राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावरून गायब आहेत. भारतीय जनता पक्षाशी पश्चिम बंगालमध्ये दोन हात करण्याची ताकद असणार्‍या या नेतृत्वाने भाजपविरोधाच्या राजकारणाला दिलेला ब्रेक आणि त्यांचे मौन कोड्यात टाकणारे आहे. त्या आहेत कुठे?

पश्चिमबंगालच्या राजकारणातील डाव्या पक्षांची सुमारे 34 वर्षांपासूनची सद्दी मोडून काढणार्‍या आणि काँग्रेसमध्ये फूट पाडून सारा पक्ष ‘हायजॅक’ करणार्‍या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी गेल्या सहा महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते अमित शहा यांच्यावरील टीकेची धार केवळ सौम्यच केलेली नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक करीत त्यांनी राज्यातील सरकार अडचणीत आणणार्‍या विद्यमान घडामोडींवर ‘उतारा’ शोधण्याचा प्रयत्न चालविला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी करण्याच्या कामालाही त्या लागल्या आहेत.

त्यांच्या या ‘आस्ते कदम’ भूमिकेचा अन्वयार्थ प्रामुख्याने दोन घडामोडींवरून लावला जातो आहे. गेले संपूर्ण वर्ष हे राज्य कधी नव्हे इतक्या घोटाळ्यांनी गाजले. हे घोटाळ्यांचे आरोप थेट सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्यांवर झाले. ईडी, प्राप्तिकरसह सर्व केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांची झाडाझडती घेतली. शिक्षक भरती घोटाळा, शारदा चिटफंड घोटाळा, जादा परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूक घोटाळा या प्रकरणांत ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी, ममतांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर आरोप आहेत.

ईडीने त्यांच्याभोवतीचा फास आवळला आहे. राज्यातील भ्रष्टाचार प्रकरणांतून सरकारला भाजपने घेरल्याने ही कारवाईची धार बोथट करण्याच्या कामाला ममता लागल्या आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, आर्थिक संकटात असलेले हे राज्य विकास योजनांना कात्री लावत आहे. केंद्राकडे 21 हजार कोटींहून अधिक निधी अडकून पडल्याने त्यावर आलेल्या मर्यादांमुळे त्या अस्वस्थ आहेत. भाजपच्या नेत्यांवर जनतेची दिशाभूल करण्यासाठी केवळ टीकेची झोड उठवून चालणार नाही, त्याने राजकारण साधता येते; पण विकासकामे ठप्प होतात, हा राज्याला आर्थिक अडचणीत आणणारा अनुभव त्या घेत आहेत. लोकसभा निवडणुका जवळ येतील तसा त्यांच्यावरील हा दबाव वाढतो आहे, त्यातून त्यांनी हा ‘शांततेचा मार्ग’ पत्करला असावा.

भाजपची खेळी

हा दबाव निर्माण करण्यामागे भाजपच्या राजकीय खेळीचा भागही त्यामागे आहे. ममतांना वेसण घातल्याशिवाय त्यांना सत्तेतून बाजूला करता येणार नाही, हे ओळखून हे विरोधाचे राजकारण आणि ममतांची बंगालच्या राजकारणावरील मजबूत पकड हे त्यामागचे कारण. राज्यात थोडाफार लोकाधार असलेले डावे आणि काँग्रेस पुन्हा कशी उभी राहणार, हा प्रश्न असल्याने येथे भाजपला तृणमूल हाच थेट आणि प्रबळ प्रतिस्पर्धी. गेल्या विधानसभा निवडणुकीतील मतांची टक्केवारी लक्षात घेता 48 टक्के मते तृणमूलने घेतली. हा हुकमी मताधार तोडायचा कसा, हे भाजपसमोरचे मुख्य आव्हान. राज्यात डावे आणि काँग्रेसने एकेकाळी राजकीय अस्पृश्य ठरवलेल्या भाजपची गेल्या दोन विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांतील झेप लक्षणीय आहे. गेल्या विधानसभेला 37 टक्क्यांहून अधिक मते पक्षाने घेतली, लोकसभा निवडणुकांत सरासरी चार टक्क्यांनी मते वाढली, तर तृणमूलची तितकीच घटली. विधानसभेच्या 294 पैकी 77, तर लोकसभेच्या 18 जागा घेत पक्षाने हा मोठा पल्ला गाठला. ममतांना यावेळी रोखले नाही, तर या राज्यात फटका बसण्याचा धोका असल्याने सर्वच पातळ्यांवर त्यांची कोंडी करण्याचे हरेक प्रयत्न सुरू आहेत.

ममतांची राष्ट्रीय राजकारणात तिसर्‍या आघाडीचा प्रयोग करत पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीचे त्यांच्या गेल्या दोन वर्षांतील सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याने त्यांना राज्याच्या राजकारणातच गुंतवून ठेवण्याच्या भाजपच्या डावपेचांचा तो भाग आहे. ममता सरकार उलथवून टाकण्यासाठी भाजप नेत्यांनी गेल्या डिसेंबरची डेडलाईन ठरवली होती. मात्र, ममतांनी हे आव्हान परतवून लावले.

दुसरीकडे भाजपचाच सॉफ्ट अजेंडा पुढे नेण्याचा प्रयत्नही ममतांनी चालवला आहे. भाजपची खरी चिंता तीच आहे. हिंदुत्ववादी राजकारणाला हात घालण्याचाही त्यांचा प्रयत्न असल्याने त्याला उत्तर कसे द्यायचे, हा भाजपसमोरील आजघडीचा प्रश्न आहे. काशीप्रमाणे बंगालमध्येही गंगा महाआरती करण्याची त्यांनी केलेली घोषणा आणि त्यासाठी राज्यात सुरू केलेली पूर्वतयारी हा त्याचाच भाग. कोलकात्यातील दक्षिणेश्वर आणि बेळूर मठ येथेही महाआरती घेण्याचे त्यांचे नियोजन आहे. आपली व्होट बँक बळकट करताना भाजपकडे वळलेल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्या सक्रिय झाल्या आहेत.

विरोधकांची मोट बांधणार

ममतांनीबरोबर 25 वर्षांपूर्वी म्हणजे 1 जानेवारी 1998 रोजी तृणमूल काँग्रेसची स्थापना करत ही बंडखोरी यशस्वी करून दाखवली. त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ दिली, तर काँग्रेसच्या सहकार्याने राज्यात 2011 मध्ये डाव्यांची ‘लालसत्ता’ उलथवून टाकली. 2014 नंतर भाजपची घोडदौड सुरू झाल्यावर आपणास हा मोठा धोका असल्याचे ओळखून त्या भाजपविरोधात मैदानात उतरल्या.

आता केंद्रात काँग्रेस, जनता दल (राष्ट्रीय, संयुक्त, धर्मनिरपेक्ष) आणि डाव्या पक्षांसह शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेससह दक्षिणेतील दोन मोठ्या राजकीय पक्षांची भाजपविरोधात मोट बांधण्याची त्यांची धडपड दिसते. काँग्रेसची सर्वत्र वाताहत होत असताना प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तृणमूलची ओळख घट्ट व्हावी, यासाठी त्या धडपड करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालसह पूर्व भारतातून जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याचा निर्धार त्यांनी वारंवार व्यक्त केलेला आहे.

पश्चिम बंगालच्या बाहेर विस्तारण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. नेतृत्वाअभावी काँग्रेसची राज्यातील अवस्था केविलवाणी झाली असून, येत्या निवडणुकांतही हा पक्ष डोके वर कसे काढणार, हा प्रश्न आहे. यामुळे येत्या काळात भाजप आणि तृणमूल असा थेट टोकाचा संघर्ष पाहायला मिळेल. डावे पक्ष आणि काँग्रेसचा घसरलेला लोकाधार या पक्षांसाठी एकास एक लढती करण्यास भाग पाडणार आहे, त्याचमुळे भाजपसाठी बंगालची ही राजकीय लढाई कठीण असेल. राज्यातील जनतेला गोंधळात टाकणार्‍या ममतांची चाल आणि त्यांचे मौन संभ्रमात टाकणारे तसेच भ्रमित करणारे आहे. त्यांच्या मौनामागचे हे राजकीय वास्तव असले तरी त्या कधी उसळी घेतील हे सांगता येणार नाही!

विजय जाधव

Back to top button