लवंगी मिरची : अपूर्ण इच्छा | पुढारी

लवंगी मिरची : अपूर्ण इच्छा

आनंद : मराठी माणसांची कोणती स्वप्नं अद्याप पूर्ण व्हायची राहिली आहेत? त्याविषयी सांगाल का?

अजय : फार दुखावणारा प्रश्न विचारलात. मराठी माणसाची स्वप्नं दोनच. पहिले म्हणजे मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झालेला पाहणे आणि दुसरे म्हणजे बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र होणे. मराठी माणूस पंतप्रधान होण्याची समस्या वेगळीच आहे. इथे कोणी मी पंतप्रधानपदाचा उमेदवार आहे, असे म्हटले की, राज्यभर हा पंतप्रधानपदाचा उमेदवार कसा नाही हे सिद्ध करण्याची चर्चा सुरू होते. बरेच लोक त्या खुर्चीच्या जवळपास जाऊन आले, उपपंतप्रधानही झाले; परंतु त्या खुर्चीवर अद्याप कोणी मराठी माणूस बसू शकलेला नाही, याचे मला फार वाईट वाटते; पण इलाज नाही. राज्यात नेतृत्व बळकट केलेले अनेकजण या पदासाठी पात्र आहेत. त्यापैकी एखादी व्यक्ती कदाचित येत्या दहा वर्षांत त्या पदावर बसलेली दिसू शकते. ईश्वराची इच्छा असेल तर येत्या दहा वर्षांत आपली म्हणजे मराठी माणसाची ही इच्छा पूर्ण होईल. दुसरे स्वप्न जे मी तुम्हाला सांगितले ते म्हणजे, संयुक्त महाराष्ट्राचे. तो प्रश्न कोर्टात प्रलंबित असल्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. पिताश्री जाताना सर्वांना सांभाळ, असे कधीच म्हणाले नाहीत; पण त्यांनी माझ्याकडून एक वचन मागून घेतलेकी, किमान बेळगाव तरी महाराष्ट्रात येईपर्यंत निवांत झोपू नकोस, असे ते म्हणाले. तेव्हापासून मी रात्री किमान तीनवेळा उठून ‘बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ अशी घोषणा मनातल्या मनात देतो आणि झोप पुढे चालू ठेवतो. हा प्रश्न अशा प्रकारे जिवंत ठेवला जाऊ शकतो.

आनंद : मराठी माणूस नाटकवेडा आहे, असे म्हटले जाते हे कितपत खरे आहे ?

अजय : मराठी माणूस नाटकवेडा आहे यात शंका नाही; परंतु हल्ली अस्सल मराठी माणसांची संख्या रोडावल्यामुळे बरीच नाटके साफ पडलेली दिसतील. साधारण वर्षभरापूर्वी मी मागे वळून पाहताना या नाटकाला गेलो होतो. समोरचे नाटक सुंदर होते; पण मागे वळून पाहिले तर प्रेक्षक नव्हते. यावरून मी निष्कर्ष काढला की, मराठी माणूस नाटकवेडा तर आहेच; पण त्याचबरोबर नाटकाच्या निर्मात्याला वेड लावण्याचे कसबसुद्धा त्याला पुरेपूर ज्ञात आहे.

आनंद : तुम्हाला अत्यंत राग आला आहे, असे एखादे ताजे प्रकरण असल्यास आम्हाला सांगाल काय?

अजय : हो नक्कीच! गेल्या काही वर्षांपासून मी सूक्ष्म निरीक्षण करतो आहे. आमच्या संस्कृतीमध्ये नसलेल्या अनेक गोष्टी आमच्यावर थोपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. उदाहरणार्थ, प्रथम आला ‘व्हॅलेंटाईन डे’ नंतर आला ‘मदर्स डे’. आता उदाहरणार्थ- आई म्हणजे मराठी माणसाचा जीव की प्राण; पण तिच्यासाठी वर्षातील एखादा दिवस राखून ठेवण्याची आम्हाला कधी गरज वाटली नाही. अर्थात, हे ‘मदर्स डे’चे फॅड काही मला काही कळले नाही. आम्ही फक्त विशेष दिवस म्हणून वर्षातून एकदा बैलांसाठी पोळा साजरा करतो. यापुढे बहुतेक ‘ब-दर्स डे’, ‘चुलत ब-दर्स डे’, ‘साडूज डे’ असे डे साजरे करावे लागतील की काय, या शंकेने मला फार राग आला होता; पण मराठी माणसाचा संतापावर चांगला ताबा असल्यामुळे मी शांत झालो आहे.

आनंद : आता शेवटचा प्रश्न. मराठी भाषेची स्थिती सध्या कशी आहे?

अजय : माणूसच जिथे रांगेत शेवटी उभा आहे, तिथे त्याची भाषा पुढे कशी राहणार? ते जाऊ द्या. मराठी भाषेचे म्हणाल तर वाघिणीच्या दुधाची चटक लागल्यावर शेळीचे दूध कोण पिणार हो? शेळीचे दूध पचायला सोपे, पौष्टिक वगैरे असेल; पण त्याचा प्रभाव पडत नाही ना! शेळीचे दूध प्यायलेल्या माणसाकडे समोरची माणसे एखाद्या गरीब शेळीकडे पाहावे तसे पाहतात. वाघिणीचे दूध म्हणजे इन्स्टंट एनर्जी. बहुसंख्य मराठी बांधवांना काय वाटते ते महत्त्वाचे आहे. रशियाचा अध्यक्ष रशियन भाषेत जगभर भाषणे देतो, त्याचे इंग्रजी वाचून काही अडत नाही, मग तुम्ही का वाद करता ? येऊ द्या की, मराठी भाषा पुढे .

Back to top button