लवंगी मिरची : सुखावह मरण | पुढारी

लवंगी मिरची : सुखावह मरण

अरे ऐकलं का? आता एक नवीन स्टार्टअप सुरू झाले म्हणे, सुखाने मरायचं. म्हणजे मेल्यानंतर फक्त या स्टार्टअप कंपनीला फोन करायचा म्हणजे मग पुढचं जे काय बॉडीचं म्हणजे देहाचं क्रियाकर्म असतं ते इतकं चांगल्या पद्धतीने केलं जाईल की, मेलेल्या माणसाला ते स्वर्गातूनही सुख पाहता येईल. अरे, काय सांगतोस काय? इथे जगण्याचे वांदे आहेत आणि तू मरायच्या गोष्टी करायला लागलास? मेल्यानंतर कसेही काहीही क्रियाकर्म केलं तरी जो मेला आहे त्याला हे कसं कळणार? अरे दादा, गेलेला तर वर गेलेला असतो, पण त्याचे जे नातेवाईक, मुले, बाळे असतात त्यांना आपण आपल्या या प्रिय व्यक्तीला किती आनंदात आणि व्यवस्थित पोहोचवलं याचं समाधान मिळत असेल की नाही? हो, म्हणजे हे लोक नेमकं करतात काय? काहीच नाही, अगदी सोपे आहे.

तुमच्या घरचा कुणी टपकला की, फक्त एक फोन करायचा. त्यांची माणसे गणवेशात अ‍ॅम्ब्युलन्समधून येतील. व्यवस्थित पद्धतीने तुमच्याकडच्या मयताला शुभ्र वस्त्रामध्ये गुंडाळतील. त्यावर स्प्रे, सॅनिटायझर मारतील आणि कुणालाही आकर्षण वाटावे अशा सजवलेल्या तिरडीवर झोपवतील आणि ती तिरडी घेऊन ते त्यांच्या अत्यंत रम्य अशा स्मशानाकडे रवाना होतील. त्यांचे स्मशान हे जागोजागी ताटव्यांनी, फुलांनी, हारांनी आणि काचेच्या भिंतींनी सजवलेले असेल. म्हणजे ते पटांगण नसेल तर ती मोठ्या शोरूमसारखी बिल्डिंग असेल.

आता मला सांग, ते सजवलेलं असो की नसो, काय फरक असणार आहे? एरवीच्या आपल्या नेहमीच्या स्मशानात आणि याच्यात काय फरक असणार आहे? अरे, फरक म्हणजे काय, गेल्याबरोबर म्हणजे वर नाही तिथे पोहोचल्याबरोबर सर्व नातेवाईकांना आनंद वाटेल असं मनमोहक सुगंधी वातावरण असेल. तिथून तुम्हाला निघावं वाटणार नाही, अशा वातावरणात म्हणजे अ‍ॅम्बिऐंसमध्ये तुम्ही पोहोचाल. म्हणजे अत्यंत सुंदर अशा त्या तिरडीवरून अ‍ॅम्ब्युलन्समध्ये तो देह रवाना झाला की, पाठोपाठ तुम्ही जायचं आणि त्यांच्या शोरूमसारख्या स्मशानात पाठोपाठ पोहोचायचं. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे सगळे विधी केले जातील.

मंत्रोच्चार केले जातील आणि विधिवत क्रियाकर्म पूर्ण केले जाईल. याला स्टार्ट स्टार्ट म्हणायचं? अरे, हे म्हणजे एंडअप आहे. मृत्यू झाल्यानंतरच याचं काम आहे. असे आगळेवेगळे स्टार्टर आता पुण्यात आणि मुंबईत आलेले आहे. तुमचं आयुष्य कसंही गेलेलं असो; पण मरण मात्र सुखावह करण्याची तरतूद किंवा व्यवस्था करणारी ही कंपनीच आहे. काय भन्नाट आयडिया आहे नाही? म्हणजे परदेशात विशेषत: युरोपमध्ये लोक मेल्यानंतर पुरण्यासाठी आपली जागा आणि थडगे राखून ठेवतात म्हणे; हे तर त्याच्याही पुढे गेले आहे. काही राखून ठेवायची गरज नाही. गेल्यानंतर काही क्षणांत सुंदर पद्धतीने तुमची राख करण्याची जबाबदारी कंपनीने घेतली आहे.

आता याला स्टार्टअप म्हण किंवा एंडप म्हण; पण प्रत्येकाचा एंड होणारच आहे आणि याला भरपूर डिमांड राहील हे लक्षात घेऊन संबंधित उद्योजकाने टाकलेला उद्योग मात्र अफलातून आहे. फक्त एक फोन फिरवायचा आणि बाकी काहीच करायची गरज नाही. बरं मग या सिस्टीममध्ये ते राख सावडायचं वगैरे त्याची काय सोय आहे की नाही? काही कल्पना नाही; पण तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही जा, नाहीतर एखाद्या प्लास्टिकच्या सॅशेमध्ये तुमच्या गेलेल्या माणसाची राख, वरती झकपक लेबल लावून तुमच्या घरीपण पोहोचती केली जाईल अशी शक्यता आहे. बरं, काय म्हणतोस मग? जाऊयात का बघायला? आपण जायची गरज नाही बघायला. आपण गेलो की, आपले नातेवाईक जातील बघायला. जसं जन्मल्याबरोबर मॅटर्निटी होम आहेत, तसे मेल्याबरोबर सर्व सुविधा देणार्‍या सुखांत सुखावह अशा व्यवस्था निर्माण झाल्यात. म्हणजे आपला देश किती मोठा झाला नाही? म्हणजे आता आपला देश विकसित झालेला आहे असे आपण सांगू शकतो. काय सांगू यार..!

Back to top button