नाट्यगृह : वाजवा तिसरी घंटा... - पुढारी

नाट्यगृह : वाजवा तिसरी घंटा...

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेने जगाला संकटात टाकले. कडक संचारबंदी, लॉकडाऊन, अंशतः लॉकडाऊनच्या अंमलबजावणीमुळे जगभरात अनेक निर्बंध लागले. त्यात शाळा, मंदिरे, सिनेमागृहे आणि नाट्यगृहे बंद करण्यात आली, ती आजपर्यंत बंदच आहेत. मंदिरे उघडण्याच्या मागणीवर राजकारण तापले. नेमका काय निर्णय घ्यावा, हे सरकारसमोर मोठे आव्हान होतेही आणि आजही आहेच. सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स अद्यापही बंद आहेत. नाट्यगृहांचा पडदाही पडलेलाच आहे. हा पडदा उघडावा, यासाठी नाट्य कलावंत सातत्याने मागणी करताहेत. आगामी काळात नाट्यगृहांबाबत सुखद बातमी ऐकायला मिळावी. येत्या रंगभूमी दिनापासून म्हणजेच पाच नोव्हेंबरपासून नाट्यगृहे पन्नास टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत. खरे तर, लग्न समारंभातील गर्दीपासून ते अंत्ययात्रांपर्यंत जनतेने काही चांगली उदाहरणे घालून दिली. कमीत कमी उपस्थितीत लग्नसोहळे पार पडले. जिम सुरू झाल्यानंतर तिथेही निर्बंध पाळून लोकांनी आदर्श निर्माण केला. याउलट बाजारपेठेत आणि आठवडा बाजारात कोणतेही निर्बंध पाळले गेले नाहीत. याचाच अर्थ मोठ्या लोकसंख्येच्या देशात सार्वजनिक ठिकाणी गर्दी उसळते आणि त्यावर नियंत्रण करण्याची यंत्रणाच उभी राहू शकत नाही, हे स्पष्ट झाले. तुलनेने कार्यालयांमध्ये, बँकांमध्ये सुरक्षित अंतर राखता येते. तशी व्यवस्थाच उभी करता येते. नाट्यगृहांबाबतीतही हे सहज शक्य आहे. विमानतळावर दोन लस घेतलेल्यांचे प्रमाणपत्र तपासले जाते अन्यथा तपासणी केली जाते. तशीच व्यवस्था नाट्यगृहांमध्येही होऊ शकते. किंबहुना ती असायलाच हवी. कोरोनाची तिसरी लाट आली नाही, तरी सावधगिरी म्हणून या उपाययोजना आणखी काही काळ कराव्याच लागतील. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पदाधिकारी आणि नाट्य कलावंतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नाट्य कलावंतांची मागणी लक्षात घेऊन पाच नोव्हेंबरपासून पन्नास टक्के आसन क्षमतेने नाट्यगृहे सुरू करण्यास मुख्यमंत्री तयार झाले. त्यामुळे नाट्य कलावंतांना दिलासा मिळाला. आता पुन्हा तिसरी घंटा वाजणार, हे नक्की. राज्यभरात कोरोनाची रुग्णसंख्याही कमी होत आहे, हेही आशादायीच आहे. नाट्यगृहे सुरू करण्याची मागणी गेल्या वर्षीही झाली. प्रत्यक्षात दुसरी लाट आल्यामुळे ही मागणी बाजूला पडली. आता कलावंत आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सांगलीमध्ये तर बॅकस्टेज कलाकार रस्त्यावर उतरले. प्रयोग बंद असल्यामुळे बॅकस्टेज कलाकारांच्या रोजीरोटीचा प्रश्न उद्भवला. त्यांची आर्थिक कुचंबणा नाट्यगृहे सुरू झाली, तरच थांबू शकेल, असे त्यांचे म्हणणे आहे. मराठी रंगभूमी ही जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी आहे. अत्यंत लोकप्रिय असलेल्या अभिनेत्यांनाही मराठी रंगमंचाचे आकर्षण आहे. बॉलीवूडमध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या अनेक अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी मराठी रंगभूमीची सर येऊच शकत नाही, अशी पावती दिलेली आहे. हीच रंगभूमी आणखी किती दिवस बंद राहणार आणि अतोनात नुकसान झाल्यानंतर पुन्हा कशी सावरणार, हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे.

नाटक आणि मराठी माणूस यांचे अतूट असे नाते आहे. इतर कोणत्याही कला प्रकारापेक्षा मराठी माणसांचे नाटकांवर काकणभर जास्त प्रेम आहे. त्यामुळे भारतीय रंगभूमीवर सर्वाधिक नाटकांचे प्रयोग होतात ते महाराष्ट्रात. त्यानंतर नंबर लागतो तो पश्चिम बंगालचा. मराठी माणसांचे आणि नाटकांचे श्वासोच्छवासाचे नाते आहे, असे अनेकदा बोलले जाते; पण गेल्या दीड वर्षात मराठी माणसांचा हा श्वास कोंडला गेला होता. आता नाटकाचा पडदा वर जात असल्यामुळे मराठी माणूसही रंगमंदिरात जाऊन मोकळा श्वास घेणार आहे. एकीकडे रंगकर्मींची तडफड आणि दुसरीकडे प्रेक्षकांना नाटक पाहता येत नसल्याची खंत, असे चित्र होते. या काळातही नाटकांवरील प्रेमापोटी अश्विनी भावेंसारख्या ज्येष्ठ अभिनेत्रींनी नाटकाच्या बॅकस्टेजला काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी मोठी आर्थिक मदत करून त्यांचा चरितार्थ चालविण्यासाठी मोठी मदत केली होती. चंद्रकांत कुलकर्णींसारख्या काही ज्येष्ठ नाट्यकर्मींनीही बॅकस्टेज आर्टिस्टसाठी मदतीची मोहीम हाती घेतली होती. हे पुरेसे नसले, तरी बुडत्याला काडीचा आधार असा तो प्रयत्न निश्चितच होता. नाटके बंद असताना पुण्यातल्या काही हौशी रंगकर्मींनी ऑनलाईन नाटकांचीही शक्कल लढविली. त्यांचे काही प्रयोग यशस्वीही झाले; मात्र नाटकाचा खरा जीव थेट रंगमंदिरात नटाच्या जिवंत अभिनयाला मिळणार्‍या टाळ्यांमध्ये आहे, याची खंत प्रत्येकालाच होती. आता ही प्रेक्षकांची टाळी वाजणार आहे आणि नाटकात जीव येणार आहे. नव्याने नाटक सुरू होत असताना प्रशांत दामलेंसारख्या प्रसिद्ध नट-निर्मात्याने नाटक स्वस्तात बघता यावे म्हणून प्रेक्षकांसाठीही योजना आणली आहे. कलाकारांचा विचार करतानाच नाट्य निर्माते प्रेक्षकांचाही विचार करीत आहेत, ही नाटक जगविण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी स्वागतार्ह बाब म्हणावी लागेल. हे होत असतानाच चंद्रकांत कुलकर्णींसारखा ज्येष्ठ दिग्दर्शक प्रेक्षकांना साद घालतो ती महत्त्वाची आहे. राज्य शासनाने 50 टक्के प्रेक्षकांची मर्यादा घालून दिली आहे. या नाट्यकर्मींचे म्हणणे आहे की, ही 50 टक्के प्रेक्षक संख्या 100 टक्के भरली पाहिजे. कारण, कोरोना काळात सर्वांवरच विविध मार्गांनी आर्थिक कुर्‍हाड कोसळली आहे. त्यात नाट्यगृहांना तर दीड वर्ष कुलूपच लागले होते. ते कुलूप उघडत असताना, नाटकाचा पडदा वर जात असताना प्रेक्षागृहात टाळ्या देणारे रसिक आलेच पाहिजेत, तरच नटांना संवाद त्यांच्यापर्यंत फेकताना ताकद मिळणार आहे. ती मिळो, हीच या निमित्ताने शुभेच्छा द्यायला हवी.

Back to top button