धोका सौरवादळाचा | पुढारी

धोका सौरवादळाचा

प्रा. विजया पंडित

पुढील दशकात एका मोठ्या सौरवादळामुळे जगातील वीज आणि इंटरनेट संरचनेला गंभीर धोका संभवतो. हे विशाल सौरवादळ म्हणजे सूर्याकडून प्राप्त द्रव्यमान आणि ऊर्जा यांची एक अग्निरेखाच असेल.

आपल्या पृथ्वीला सूर्यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता संभवत आहे. पुढील दशकात अशा एका सौरवादळाची शक्यता आहे, ज्यामुळे पृथ्वीवर कनेक्टिव्हिटी नेटवर्कचे नुकसान आणि जीवित तसेच वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल. संशोधनावर आधारित केलेल्या भाकितात असे म्हटले आहे की, हे विशाल सौरवादळ म्हणजे सूर्याकडून प्राप्त द्रव्यमान आणि ऊर्जा यांची एक अग्निरेखाच असेल. पृथ्वी त्या अग्निरेखेच्या कक्षेत आली, तर आपल्याला असे काही परिणाम भोगावे लागू शकतात, जे यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. जगाच्या मोठ्या भागात वीजपुरवठा अनेक दिवसांसाठी खंडित होऊ शकतो. पृथ्वीची परिक्रमा करीत असलेल्या उपग्रहांसह समुद्रतळाशी विखुरलेल्या केबलच्या नेटवर्कचीही हानी होऊ शकते. कॅलिफोर्निया विद्यापीठ, इरविन आणि व्हीएमवेअर रिसर्च यांच्याशी संलग्न असलेल्या मूळ भारतीय वंशाच्या संशोधिका संगीता अब्दू ज्योती यांनी लिहिलेल्या ‘सोलर सुपरस्टॉर्म ः प्लॅनिंग फॉर इंटरनेट अ‍ॅपोकॅलिप्स’ या शोधनिबंधात असे म्हटले आहे की, सौरवादळ येण्याची शक्यता 1.6 ते 12 टक्क्यांपर्यंत आहे. एक टक्का जरी तशी शक्यता असली, तरी सौरवादळापासून बचावाची तयारी आपण ठेवायला हवी. ही तयारी वेळीच सुरू करण्याचा इशारा शास्त्रज्ञांनी सर्व देशांना दिला आहे.

जो सूर्य अनेक दशके खूप सौम्य होता, तो आता जणू हळूहळू झोपेतून जागा होत आहे, असे अनेक शास्त्रज्ञांनी संशोधनांती सांगितले आहे. आता सूर्यापासून आगीच्या ज्वाळा निघू लागतील आणि त्या ज्वाळा सौरवादळाचे रूप घेऊन पृथ्वीच्या दिशेने येऊ लागतील. यावर्षी जुलै महिन्यात एका मोठ्या सौरवादळाचा धोका पृथ्वीला होता. परंतु, यापासून फारसे नुकसान झाले नाही. अर्थात, गंभीर स्वरूपाची सौरवादळे अत्यंत दुर्मीळ असतात आणि नजीकच्या इतिहासात तशी केवळ तीनच उदाहरणे आढळतात. 1859 आणि 1921 मध्ये आलेल्या आपत्तींनी असे दाखवून दिले होते की, भूचुंबकीय घडामोडींमुळे वीजनिर्मितीची पायाभूत संरचना आणि टेलिग्राफच्या तारा आदी संचार प्रणालींवर गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. 1859 मध्ये जेव्हा सौरवादळ आले होते तेव्हा कंपासमधील (होकायंत्र) काटा वेगाने इकडेतिकडे डोलू लागला होता. त्या काळात जगात विजेच्या ग्रिडची मुहूर्तमेढही रोवली गेली नव्हती, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आता जर सौरवादळ आले, तर त्याचा परिणाम थेट विजेच्या ग्रिडवर होईल. हा दुष्परिणाम कसा आणि किती मोठ्या स्वरूपाचा असेल, त्याचा जास्तीत जास्त अचूक अंदाज शास्त्रज्ञांना लावावा लागेल, जेणेकरून त्या हिशेबाने तयारी करता येईल. 1989 मध्ये आलेल्या एका मध्यम गंभीर स्वरूपाच्या सौरवादळामुळे हायड्रोक्युबेक ग्रिडवर मोठा दुष्परिणाम झाला होता आणि ईशान्य कॅनडामध्ये नऊ तास ‘ब्लॅकआउट’ करावा लागला होता. परंतु, ही घटना अशा काळात घडलेली आहे, जेव्हा जगात इंटरनेटचे जाळे निर्माण झालेले नव्हते.

एकूण असे म्हणता येईल की, सौरवादळासारखी आपत्ती पृथ्वीसाठी नवीन नसली, तरी आधुनिक दुनियेसाठी ही निश्चितच अपरिचित आपत्ती असणार आहे. आजचे संपूर्ण जनजीवन वीज आणि इंटरनेटच्या आधारावर अवलंबून राहू लागले आहे. मोठे नेटवर्क आणि मोठ्या ग्रिडवर आपले अवलंबित्व प्रचंड प्रमाणात वाढले आहे. प्रवासापासून रुग्णालय सुविधांपर्यंत बर्‍याच गोष्टी विजेवर आणि इंटरनेटवर आधारित आहेत. त्यामुळे एकाच क्षणात या नेटवर्कची संपूर्ण संरचना निकामी होऊ नये, अशा रीतीने आपल्याला तयारी करावी लागेल. छोटे ग्रिड आणि स्थानिक पातळीवर छोटी नेटवर्क उभारली जाऊ शकणार नाहीत का? गरज पडल्यास ग्रिड आणि नेटवर्कना वेगवेगळे करणारी सुविधा देणारी संरचना उभी करणेच हितावह नाही का? प्रत्येक सुविधेची पाईपलाईन, तारा आणि बिनतारी यंत्रणा यांविषयी आपल्याला वेळीच विचार केला पाहिजे. या आपत्तीची शक्यता आपल्याला पृथ्वीच्या संबंधाने अधिक सजग होण्यास प्रेरित करणारी आहे. एक संरक्षित, सुरक्षित पृथ्वीच आपले संरक्षण करू शकते.

Back to top button