कॉसमॉस वनस्पतीने जैविकता धोक्यात! | पुढारी

कॉसमॉस वनस्पतीने जैविकता धोक्यात!

काय वनराई फुललीये, पावसाळ्यानंतर बाहेर पडल्यावर दोन्ही बाजूंना फुललेल्या पिवळ्या-केशरी फुलांकडे पाहून असा प्रश्न आपोआपच पडतो; पण या सुंदर फुलांना आणि ती वागवणार्‍या कॉसमॉसनामक तणाने सारी जैविक सृष्टीच धोक्यात आल्याची जाणीव फारच थोड्या जणांना होते. कॉसमॉससह सर्वच घातक तणांच्या विरोधात सुरू झालेल्या मोहिमेला व्यापकत्व आल्यानंतरच निसर्गचक्र आणि पर्यायाने माणसाचे अस्तित्वही सुरक्षित राहू शकणार आहे.

दुर्दैवाने स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवरून ही मोहीम सुरू झाली असली तरी राज्य सरकारने त्यात स्वत:हून पुढाकार घेतल्याचे दिसत नाही. पावसाळ्यानंतर शहरीजन पर्यटनाला बाहेर पडतात, तर ग्रामीणजनांना रानात जाणे हा नित्याचाच भाग असतो. या सर्वांना रस्त्याच्या दुतर्फा पिवळ्या-केशरी फुलांनी फुललेले ताटवे दिसतात. दिसायला आकर्षक, मनमोहक; पण आपल्या देशाच्या दृष्टीने तितकेच धोकादायक. कॉसमॉस ही मूळची मेक्सिकोमधील वनस्पती. ती धोकादायक का आहे, ते समजावून घेणे आवश्यक ठरते. तिचा वाढीचा वेग मोठा आहे. एकदा वाढायला लागली की, ती अवघा आसमंत व्यापते. परिणामी स्थानिक गवताच्या आणि इतर वनस्पतींच्या जाती-प्रजातींच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे स्थानिक जैवसाखळी नष्ट होऊ लागली आहे.

स्थानिक वनस्पतींबरोबर कॉसमॉस जागेसाठी, प्रकाशासाठी, अन्नद्रव्यांसाठी मोठी स्पर्धा करते आणि त्यात जिंकतेही. मधमाशी, भुंगे, फुलपाखरे आदी फुलांचे परागकण गोळा करतात. कॉसमॉस वाढल्याने साहजिकच स्थानिक वनस्पतींपेक्षा तिचेच परागकण गोळा केले जातात आणि त्यामुळे परागीकरणाअभावी स्थानिक वनस्पतींची वाढ खुंटते. गुरांचे तसेच हरणांसारख्या तृणभक्ष्यी प्राण्यांचे स्थानिक खाद्य कमी झाल्याने हे प्राणी शेतातील पिकांकडे वळतात आणि पिकांचे पर्यायाने शेतकर्‍यांचे नुकसान होते. शेतकर्‍यांचे 32 टक्के उत्पन्न या तणांच्या नियंत्रणासाठी जाते, असे एका पाहणीत आढळले आहे. मानव-वन्यजीव संघर्षाचे एक कारण कॉसमॉससारख्या परदेशी वनस्पतीही आहेत.

जगातील जैवविविधतेला घातक ठरणारे सर्वात मोठे संकट आहे ते अधिवास धोक्यात येण्याचे, तर दुसर्‍या क्रमांकाचे संकट हे या परदेशी वनस्पतींच्या आक्रमणाचे असल्याचे मत अभ्यासकांनी नोंदवून ठेवले आहे. अशा वनस्पतींच्या आक्रमणाने मानवजातीची अन्न सुरक्षाच धोक्यात येणार आहे. कॉसमॉस आपल्याकडे आली कशी आणि कधी? सुमारे वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात या वनस्पतीचे आगमन झाले. कुणीतरी पुण्याजवळच्या कात्रज घाटातून जात असताना या वनस्पतींच्या बिया उधळल्या, असे वनस्पतीतज्ज्ञ सांगतात. त्यानंतर ती झपाट्याने पसरू लागली. तिने घाट चढून सातार्‍याची सीमा ओलांडली, आता ती कोल्हापूर परिसरापर्यंत पोहोचली आहे. इकडे जुन्नर-नाशिक-पुणे ते मुंबई रस्त्यावरील मावळचा भाग, रायगडपर्यंत तिने मजल मारली आहे.

पहिल्या काही वर्षांत रस्त्याच्या दुतर्फा असलेली ही वनस्पती आता अंतर्गत भागातही शिरकाव करीत पुढे सरकली आहे. काही वेळा तिचा प्रसार गुरांमार्फत होताना दिसतो, तर काही वेळा गाडीच्या टायरमध्ये अडकून तिच्या बिया दूरवर जातात. तिच्या भयावह परिणामांची माहिती नसल्याने केवळ सुंदर फुले दिसतात, म्हणून काही नर्सरी व्यावसायिक चक्क तिची रोपे विकताना दिसतात. पर्यावरणविषयक एम.एस्सी. आणि पीएच.डी. केलेल्या सचिन पुणेकर या तरुणाने स्थापन केलेल्या बायोस्फियर्स संस्थेने काही महाविद्यालये, महापालिकेचा पर्यावरण विभाग तसेच वनविभाग यांना मदतीला घेत पहिल्यांदा तणहोळी केली ती 2016 मध्ये.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्याच्या डेक्कन जिमखाना परिसरात परदेशी कपड्यांच्या केलेल्या होळीच्या ठिकाणीच या परदेशी वनस्पतींविरोधातील तणहोळी करण्यात आली. त्यानंतर नाशिक, चंद्रपूर, सिल्लोड, सावंतवाडीलाही तणहोळ्यांचे कार्यक्रम झाले. इतिहासात प्रत्यक्ष लढाया करून आपण परकीय आक्रमणे परतवून लावली. आताच्या काळातील आधुनिक मराठ्यांची लढाई या कॉसमॉससारख्या परकीय आक्रमणाविरोधातली आहे. ते ऐतिहासिक पराक्रमांपासून स्फूर्ती घेऊन ही लढाई नक्कीच जिंकतील, अशी आशा करूयात.

सुनील माळी

Back to top button