नितीशकुमार दिल्लीच्या दिशेने! | पुढारी

नितीशकुमार दिल्लीच्या दिशेने!

बिहारच्या राजकारणाला पुन्हा उकळी फुटली आहे ती मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राष्ट्रीय राजकारणात परतण्याच्या चर्चेने. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे पत्ते खुले केले असले तरी नितीशकुमार यांची त्यासाठीची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यांच्या राजकीय हालचालींचा अर्थ तोच आहे.

भारतीय जनता पक्ष, काँग्रेससह प्रादेशिक पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकांची जय्यत तयारी सुरू केली असताना बिहारच्या राजकारणातही नवी समीकरणे शिजू लागली आहेत. गेली दोन दशके समाजवादी अधिक डाव्या-उजव्या विचारांच्या आड राहात संधिसाधू राजकारणाचा फसवा चेहरा बनलेले मुख्यमंत्री नितीशकुमार या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. पंच्याहत्तरीकडे झुकलेल्या आणि कसलेल्या राजकीय नेतृत्वाचा प्रवास समाजवादी विचारधारेवर दावा सांगणारा असला तरी विद्यमान तडजोडीच्या आणि तोडफोडीच्या राजकारणाशी सुसंगत ठरतो आहे. काँग्रेसच्या विरोधात एकवटलेली तिसरी आघाडी, राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, डावे पक्ष ते व्हाया भारतीय जनता पक्ष अशा सर्वांसोबत साथसोबत करणारा हा नेता आता पुन्हा एकदा राजकीय कूस बदलण्याच्या तयारीत असून, त्यांना राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले आहेत.

धरसोडीचे राजकारण

पूर्वाश्रमीच्या एकसंध जनता दलाची नव्वदच्या दशकात अनेक शकले उडाली. बिहारपुरता विचार करायचा तर, त्यातील हे पक्ष लालूप्रसाद यादव, शरद यादव, नितीशकुमार या नेत्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रूजवले. काँग्रेसचा र्‍हास, निष्क्रियता आणि निर्नायकी हे त्यामागील प्रमुख कारण. मात्र, ही जागा दोन्ही जनता दलांनी घेतल्याने आजही भारतीय जनता पक्षाला येथे ठोसपणे उभे राहता आलेले नाही. नितीशकुमार यांनी या दोलायमान परिस्थितीचा फायदा उठवत कधी ‘महागठबंधन’, कधी भाजप असा राजकीय घरोबाच नव्हे, तर या पक्षांना आपल्यासोबत अक्षरश: फरफटत नेले.

गेल्या निवडणुकीत याच राजकीय अपरिहार्यतेमुळे त्यांनी भाजपचा (74) पाठिंबा मिळवला आणि अवघ्या 43 आमदारांच्या बळावर सत्ता काबीज केली. आगामी निवडणुकांच्या तोंडावर भाजपच्या डावपेचांचा अदमास आल्याने त्यांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात भारतीय जनता पक्षासोबतची मैत्री तोडून पुन्हा ‘महागठबंधन’चे सरकार आणले. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रातील शिवसेनेतील बंडानंतर केलेले वक्तव्य जसे निमित्त ठरले, तसेच बिहारच्या राजकारणाला हादरे देणारे ठरले. ‘देशात फक्त भाजपच राहील, परिवारवादी आणि प्रादेशिक आकांक्षा ठेवून सुरू झालेले पक्ष संपतील’ हे त्यांचे वक्तव्य कारण ठरले आणि त्यांनी भाजपला बाजूला केले.

2013 मध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना विरोध करणारे नितीशकुमार आता तिसर्‍या आघाडीची नव्याने मोट बांधून पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहत आहेत. तिसर्‍या आघाडीचे प्रयत्न याआधीही अनेकदा झाले खरे; पण नेतृत्वाचा वाद आणि त्यांच्या अतिमहत्त्वाकांक्षा यामुळे ते गणित जमून आले नव्हते. यावेळी नितीशकुमार यांनी आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार नसल्याचे सांगत सावधपणे पावले टाकायला सुरुवात केली आहे.

भारतीय जनता पक्ष कधीही आपला घास घेऊ शकतो, याची जाणीव झाल्याने आता बिहारची सत्ता टिकवण्याचे आणि त्यांचा संयुक्त जनता दल फाटाफुटीपासून वाचविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकांनंतर (2025) असल्याने नवी समीकरणे बनायला आणि बनवायला राजकीय पक्षांना संधी आहे. काँग्रेसच्या स्थितीत फारसा बदल झालेला नाही. लोकसभा आणि यावर्षी नऊ राज्यांत होणार्‍या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजप आणि प्रादेशिक राजकीय पक्षांतील संघर्ष तोंड वर काढू शकतो. बिहारच्या राजकारणाने त्याला तोंड फोडले.

दारूबंदीचे बळी !

गेल्या महिन्यातील राज्यातील विषारी दारू बळींचे प्रकरण नितीशकुमार सरकारच्या दारूबंदीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहे. सारण जिल्ह्यातील छपरा येथे घडलेल्या विषारी दारूकांडाने 80 हून अधिक जणांचे बळी घेतले. नितीशकुमार सरकारने (तत्कालीन संयुक्त जनता दल-भाजप) घेतलेल्या दारूबंदीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी आता खुद्द भाजपनेच केली आहे. अशा वारंवारच्या घटनांनी दारूबंदीची बाजू घेणार्‍या भाजपनेही आता नितीशकुमार सरकारवर हल्लाबोल करत ती मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यामागे असलेली कारणेही गंभीर आणि सर्वसामान्यांना कंगाल करणारी आहेत.

दारू पिणे हा गुन्हा ठरवण्यात आल्याने त्यासाठी पाच हजारांचा दंड, त्यासंबंधीचा खटला न्यायालयातच चालणार, एक महिना किंवा त्याहून अधिक तुरुंगवास यांसह संघटित गुन्ह्याच्या कक्षेत हा विषय आल्याने दारूपेक्षा या शिक्षेच्या भीतीनेच अनेक जण मरताहेत! आजपर्यंत राज्यात सहा लाखांवर लोक या आरोपाखाली तुरुंगात गेले आहेत. निर्णय मागे घेण्याच्या मन:स्थितीत नसलेले मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे ‘जो पिएगा वो मरेगा’ हे वक्तव्य त्याच उद्वेगातून आले आहे. तडजोडीच्या राजकारणामुळे नितीशकुमार यांनी विश्वासार्हता गमावली आहे. आधी त्यांनी ‘महागठबंधन’चा आणि नंतर भाजपचा विश्वासघात केलाच, त्यामुळे भाजपलाही आता या ‘बंदिस्त’ राजकारणाची कोंडी फोडणे गरजेचे वाटते. नितीशकुमार आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी वेळ आल्यास पुन्हा भाजपसोबत युती करू शकतात, ही खुद्द त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी सध्या चालवलेली चर्चा आहे.

प्रशांत किशोर यांची यात्रा

राजकीय सल्लागाराच्या भूमिकेतून आता थेट बिहारच्या राजकारणात उडी घेतलेले रणनीतीकार प्रशांत किशोर सध्या राज्याच्या दौर्‍यावर आहेत. गेले तीन महिने ते जनसुराज्य पदयात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असून, त्यांच्या पाठीशी कोण आहे, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. अर्थात, ते नितीशकुमार यांच्याविरोधात मैदानात उतरले आहेत. आगामी निवडणुकांत नितीशकुमार यांचा सर्वनाश निश्चित असल्याचा दावा करणारे प्रशांत किशोर राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दलात फूट पाडण्याच्या मोहिमेवर असल्याचे सांगितले जाते. या दोन पक्षांसह काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे ‘महागठबंधन’ हेच भाजपसमोरील मोठे आव्हान असेल. राजदचे युवा नेते तेजस्वी यादव यांच्याकडे राज्याची सत्तासूत्रे सोपविण्याचा नितीशकुमार यांचा डाव कितपत यशस्वी ठरणार? त्यांचे पुढचे पाऊल काय असेल? भाजप कोणता नवा डाव टाकणार? या प्रश्नांचे उत्तर नजीकच्या काळात मिळेल.

विजय जाधव

Back to top button