नीट व्हावी ‘नीट’ - पुढारी

नीट व्हावी ‘नीट’

- प्रा. अरविंद जोशी

वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणार्‍या नीट या परीक्षेला डमी विद्यार्थी बसवण्यात येत असल्याच्या काही घटना महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांत उघडकीस आल्या आहेत. एमपीएससी परीक्षांबाबतही असे रॅकेट उघडकीस आले होते. शिक्षणव्यवस्थेवर लागलेला हा डमींचा डाग पुसून टाकण्यासाठी गांभीर्याने पावले टाकणे आवश्यक आहे.

गेल्या काही वर्षांत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत पास होणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना पाल्याने कसेही करून डॉक्टर किंवा इंजिनिअर झालेच पाहिजे असे वाटू लागले आहे. त्यासाठी वाटेल ते करून संंबंधित महाविद्यालयात प्रवेश मिळालाच पाहिजे, यासाठीचे प्रयत्नही वाढू लागले आहेत. पालक-विद्यार्थ्यांची ही आगतिकता कॅश करण्यासाठी मग गैरप्रकार करणार्‍या प्रवृत्तीही सरसावल्या. गेल्या काही दिवसांत याची चर्चा सुरू झाली आहे, ती वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणार्‍या नीट परीक्षेमुळे. देशातील प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी ही परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक असते.

विद्यार्थी वर्ग यासाठी कसून अभ्यास करत असतात; पण काही जण शॉर्टकट किंवा आडवाटेचा शोध घेत असतात. साहजिकच अशांना हेरून आपली पोळी भाजणारे घटक समाजात उदयास येतात; पण नुकत्याच उघड झालेल्या प्रकरणामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाची शिकवणी वर्ग चालवणार्‍या संचालकांनीच काही विद्यार्थ्यांना नीट परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण करून देण्याचा दावा करत मूळ विद्यार्थ्यांच्या जागी बनावट विद्यार्थी बसवल्याचे उघड झाले आहे. नागपुरातील एका शिकवणी वर्गाद्वारे हा गैरप्रकार सुरू होता, हे लक्षात आल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांच्यावर छापे घातले. सीबीआयच्या तपासातून समोर आलेले वास्तव धक्कादायक आहे. त्यानुसार, सदर शिकवर्णी वर्ग संचालक आणि अन्य आरोपी एका विद्यार्थ्याकडून नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी तब्बल 50 लाख रुपये घेत होते. प्रवेश पक्का झाल्यानंतर विद्यार्थ्याने दिलेला धनादेश वटवला जायचा. विशेष म्हणजे, तोपर्यंत या विद्यार्थ्यांच्या दहावी-बारावीच्या गुणपत्रिका आणि इतर मूळ दस्तावेज आरोपी आपल्या ताब्यात ठेवून घेत होते. यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आणि राहण्याचा पत्ता बदलला होता. या प्रकरणात दिल्लीतील परीक्षा केंद्रात बनावट विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि ते पकडले गेले.

नीट परीक्षेत डमी विद्यार्थी बसवण्याचा गैरप्रकार केवळ महाराष्ट्रातच घडलेला नाही. अन्यही राज्यांतून असे प्रकार उघडकीस आले. डमी म्हणून पकडलेला व्यक्ती हा डॉक्टर असून राजस्थानातील चित्तोडगड जिल्ह्यात सरकारी इस्पितळात वैद्यकीय अधिकारी आहे. कोटामधील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये बायोलॉजी विषय शिकवत असल्याने त्याला ‘बायो गुरू’ म्हणून ओळखले जाते. गेल्या दोन वर्षांपासून तो डमी विद्यार्थी बसवणार्‍या टोळीच्या संपर्कात होता. डमी बसण्यासाठी या टोळ्या सदर व्यक्तीला 10 लाख रुपये देत असत, तर मूळ विद्यार्थ्याकडून 30 ते 35 लाख रुपये वसूल करत असत, असे समोर आले आहे.

‘नीट’ परीक्षेदरम्यान घडलेल्या या गैरप्रकारांनी मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देणे, सरकारी नोकरीमध्ये नियुक्त्या करणे अशा गैरप्रकारांना 2009 पासून सुरुवात झाली होती. 2013 पर्यंत जवळपास 1020 विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याचे दाखविण्यात आले; मात्र या सर्वांच्या अर्जांची छाननी केली असता एकाचाही अर्ज आढळून आला नाही, तर याच काळात 1087 अपात्र उमेदवारांना वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश देण्यात आला. यामुळे पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना डावलण्यात आले. कंत्राटी शिक्षक, अन्ननिरीक्षक, पोलिस हवालदार आणि आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकार्‍यांच्या नियुक्तीसाठीच्या प्रवेश परीक्षेमध्ये गैरव्यवहार करण्यात आले. या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांच्या गैरप्रकारांबाबत तक्रारी वाढल्यानंतर या घोटाळ्याला 2013 मध्ये वाचा फुटली. मध्यंतरी लोकसेवा आयोगामधील 2009 ते 2017 दरम्यान डमी विद्यार्थी व अधिकार्‍यांचे रॅकेट उघडकीस आले होते. या रॅकेटची सीबीआय चौकशी करून गैरमार्गाने सेवेत आलेल्या अधिकार्‍यांना पदमुक्त करण्यासाठी आंदोलनही करण्यात आले होते.

नीट असो, एमपीएससी असो किंवा व्यापम असो, या सर्वांमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय. दरवर्षी विविध शाखांच्या प्रवेश परीक्षांना, स्पर्धा परीक्षांना लाखो विद्यार्थी बसत असतात. त्यामुळे स्पर्धा कमालीची वाढली आहे. परिणामी, प्रत्येक विद्यार्थी परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी झटत असतो. अशा वेळी काही बनावट उमेदवार येऊन यश मिळवून जात असतील, तर तो या प्रामाणिक विद्यार्थ्यांवर होणारा अन्यायच आहे. कारण, कोणतीही स्पर्धा ही तुल्यबळ किंवा समान पातळीवरील घटकांमध्ये असेल, तरच ती निकोप असते.

आधीच महागड्या झालेल्या शिक्षणव्यवस्थेमुळे आर्थिकद़ृष्ट्या कमकुवत असणारे विद्यार्थी प्रवाहाबाहेर फेकले जात आहेत. त्यातूनही तग धरून राहून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून उत्तम गुण मिळवण्यासाठी धडपडणार्‍या विद्यार्थ्यांसमोर जर आधीपासूनच तयार झालेला, निष्णात उमेदवार स्पर्धेत उतरत असेल, तर त्यांचा टिकाव लागणार नाही. वैद्यकीय क्षेत्र असो किंवा लोकसेवा आयोग असो, यासाठी असणार्‍या जागांची संख्या मोजकी असते. त्यामुळे येथे स्पर्धेची तीव्रता कमाल पातळीवर पोहोचलेली असते. अशा स्थितीत धनसंपत्तीच्या जोरावर आणि गैरमार्गांचा अवलंब करून जर कुणी पुढे जात असेल, तर त्यांना रोखणे गरजेचेच ठरते. त्यामुळे नीट परीक्षांना डमी बसलेल्या उमेदवारांना शिक्षा करतानाच मूळ विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारे कठोर शासन केले पाहिजे की, जेणेकरून भविष्यात कुणीही या मार्गाने जाण्यास धजावणार नाही. त्यासाठी अशा विद्यार्थ्यांची छायाचित्रांसह सर्व माहिती समाजासमोर उघड झाली पाहिजे.

दुसरे म्हणजे, आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इतकी देदीप्यमान भरारी घेतलेली असताना आपल्या शिक्षणव्यवस्थेला डमी विद्यार्थी ओळखण्यात अपयश येणे ही खेदाची बाब आहे. रेशन व्यवस्था, मतदार याद्या आदींमधील बनावटगिरी मोडून काढण्यासाठी ज्याप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर उपाययोजना केल्या गेल्या, तशाच प्रकारे शिक्षणव्यवस्थेतही बनावट, डमी उमेदवार परीक्षेला बसूच शकणार नाहीत, अशी प्रणाली-व्यवस्था तयार करणे फार अवघड आहे, असे वाटत नाही. प्रश्न आहे तो याकडे गांभीर्याने पाहण्याचा!

Back to top button