लवंगी मिरची : सर्वांना नियम सारखेच काय? | पुढारी

लवंगी मिरची : सर्वांना नियम सारखेच काय?

का रे? आज एवढ्या उशिरा घरी आलास?
स्कूटर नेलेली बाबा.
कोणी नेलेली? तूच ना? का दुसर्‍याने? आणि अशी अचानक का म्हणे?
पोलिसांनी नेली असणार. तीही वेडीवाकडी, फरफटत, हाल करत.
कशासाठी गाडीचा असा सूड घेतला बरं?
पार्किंग रेषेच्या थोडी बाहेर आली होती म्हणतात. मी नक्की रेषेतच ठेवलेली बाबा, आयशपथ; पण दुसर्‍या कोणीतरी स्वतःच्या वाहनाला जागा करताना हलवलेली!
तसं नसेल. भूकंप झाला असेल. पार्किंगसाठी ओढलेल्या रेषा जागीच आपल्या आपण हलल्या असतील.
ही काय जोक करायची वेळ आहे का बाबा? इकडे आमचे हाल आम्हाला माहिती. दिवसभराची कामं संपवा, मग चौकीवर जा, न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा सोसा, दंड भरा, कसेबसे घरी या!
पोलिसांना पण वाटत असणार ना, कधीकधी तरी नागरिकांनी चौकीवर यावं, आपली चौकशी करावी म्हणून आळीपाळीने एकेकाच्या गाड्या नेत असतील ते.
काय हो? ती एवढीशी गाडी जरा चार-दोन इंच पुढे आल्याने जग काय बुडणार होतं का?
नाही. पण आपल्या कायदेशीरपणावर मोहोर उठणार नव्हती. त्याच रस्त्यावर वाट्टेल तशी जागा अडवून अनेकजण बसलेले असतात ना!
हो तर. कॉलेजचा रस्ता म्हणजे जवळजवळ तरुणांची बाजारपेठ झालीये.
ती चालते. तिच्यावर हात उचलायची हिंमत नाही. गेल्या आठवड्यात माझी चारचाकीपण अशीच टो करून नेली होती
का बरं? नो पार्किंगमध्ये लावली का?
अरे, दोन-तीन बसेसपण तिथेच पुढे लावलेल्या. त्या रोज तिथे असल्या तरी चालतात. माझी गाडी तेवढी लग्गेच पकडली.
मग तक्रार करायची की नाही.
कोणाकडे? आपल्यासारख्या लहानांना कोण वाली आहे आता? आपला बँकेचा कर्जाचा हप्ता भरायला एक दिवस उशीर झाला की लग्गेच नोटिसा येतात, थकबाकी वाढवत वाढवत बँका बुडवणारे उजळ माथ्याने फिरतातच की नाही? त्यातलाच प्रकार.
मग आपण काय करायचं बाबा?
निमूटपणे स्वीकारायचं.
दंड भरणं, वाहनाची नुकसानी हे स्वीकारतोच की आपण.
नुसतं तेवढं नाही. आपल्याकडे सगळी बंधनं, नियम, कायदेकानू हे फक्त आपल्यासारख्या सामान्यांसाठी आहेत. लहानांना नियम-कायदे, सत्ता बघणार मोठ्यांचे फायदे! हे मनात ठेवून वावरलं की, सगळं सुखच सुख आहे बघ.
बाबो, आता देशातील सर्व शहरांत वाहनांची गर्दी वाढली आहे, त्यामुळे नो पार्किंग झोनमध्ये गाडी लावल्यास पोलिस कारवाई करणारच, ते त्यांचे कामच आहे!
होय बाबा, कळतेय ना मला; पण त्याची काळजी घेतली होतीच की, मग विद्यार्थी म्हणून त्यांनी मला सवलत द्यायला हवी!
हे बघ, सर्वांना कायदा समानच. त्याला तू कसा अपवाद ठरणार?
होय बाबा, आता यापुढे मी नक्कीच काळजी घेईन.
होय, ती तर तुला घ्यावीच लागेल, तर तू भविष्यात एक जबाबदार नागरिक ठरशील.

– झटका

Back to top button