लवंगी मिरची : शिक्षणेतर कामांचा भार | पुढारी

लवंगी मिरची : शिक्षणेतर कामांचा भार

आज लवकर शाळेला निघताय सर?
हो. काम पुष्कळ आहे. सध्या ते आधार अपडेट प्रकरण लागलंय ना आमच्यामागे.
तुम्ही तर मुख्याध्यापक! तुम्हाला कशाला काम करावं लागतंय? तुम्ही सरळ हाताखालच्या लोकांना कामाला लावायचंत.
एवढं सोपं नाही राहिलं आता ते.विद्यार्थ्यांचे आधार कार्डाचे तपशील शोधणं, मिळवणं आमच्याच गळ्यात पडलंय.
पोरांचे खरे आधार असतात ते त्यांचे पालक, त्यांच्या आधार कार्डांची काय एवढी महती?
आपल्या शिक्षण विभागाला महती वाटतेय खरी. विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झाली नाही तर चालणार नाही, असा निर्देश दिलाय त्यांनी.
आता मुख्याध्यापकांनी त्याबाबत काय बरं करावं?
सगळं काम त्यांनीच करावं असं म्हणतोय शिक्षण विभाग. जसे काही आम्ही लोक रिकामेच बसलोय.
ते काही मला माहीत नाही; पण आपापल्या पोराबाळांची आधार नोंदणी करणं ही जबाबदारी पालकांनी घ्यायला हवी नाही का?
तोच तर वांधा आहे. अनेक पालक निवांत आहेत. ते काही आधारबिधार मनावर घेत नाहीयेत. ह्या कामात शाळांना सहकार्य करत नाहीयेत.
मग तुम्ही हे शिक्षण विभागाला सांगावं ना!
थकलो सांगून सांगून.
एखादं स्टुडंट पोर्टल वगैरे असेलच ना!
सगळं आहे हो जिथल्या तिथे; पण आहे म्हणजे आहे! काम करेलच असं नाही. त्या पोर्टलवर पोरांची अद्ययावत माहिती भरली तरी ती अपडेट होत नाही.
हे तांत्रिक सहकार्य महसूल आणि शिक्षण विभागाने द्यायला हवं नाही का?
हवं तर; पण लक्षात कोण घेतो? मुलांचं बायोमेट्रिक पूर्ण केलं तरी ते आधारवर चढत नाही. दुरुस्त्या केल्या तरी पोर्टल घेत नाही. पालक काहीच मनावर घेत नाहीत. मधल्या मध्ये कोंडी होते आम्हा मुख्याध्यापकांची.
बरोबर आहे. मुख्य माणसानेच सर्व जबाबदारी घ्यायची असते की नाही?
आता तुम्हीच ठरवा. मुख्याध्यापकाचं मुख्य काम कोणतं असायला हवं? तर शाळा नीट चालवणं, विद्यार्थ्यांना नीट शिक्षण देणं.
प्रश्नच नाही.
पण आता आम्ही हे काम कधी करायचं, हा मात्र प्रश्न आहे. अहो, दिवसेंदिवस शिक्षणेतर कामांचा आमच्यावरचा भार वाढतोय. रात्र थोडी आणि सोंगं फार अशी अवस्था होतेय.सगळ्या गोष्टींना आम्हालाच जबाबदार धरलं जातंय, त्यात आता पोरांचे आधार आम्हाला निराधार करायला निघाले तर काय करावं आम्ही?

– झटका

Back to top button