लवंगी मिरची : विकते ते पिकवा | पुढारी

लवंगी मिरची : विकते ते पिकवा

काय मग? चिरंजीव स्थिरस्थावर झाले की नाही?
नाही अजून. सध्या तोच घोर आहे जीवाला.
तो पास झाल्याचे पेढे तर मागेच वाटलेत तुम्ही.
हो ना. आमच्या घरातला पहिला द्विपदवीधर तो!
चांगला एम. कॉम. शिकलाय ना?
हो तर. अभ्यासात चांगला होता तो.
शिवाय बाजूबाजूने कॉम्प्युटरचे छोटे-मोठे कोर्सेसही केले असतीलच.
ते तर सारखे सुरूच असतात. मला विचारा! त्यांच्या लागतील त्या फिया भरत असतो ना मी!
तरीही म्हणण्यासारखं काही हाती लागू नये?
थोडंफार लागतं हाती. कुठे पाच-सात हजारांची टेंपरवारी कामं मिळतात. तेवढ्यानं काय होतं हो आजच्या दिवसात? उलट मुलाची चिडचिड वाढते. निराशा वाढते.
त्याला टाय-बूटवाली, टेबल-खुर्चीवाली नोकरीच हवी असेल ना?
अर्थातच! एवढं शिकल्यावर तो काय शारिरीक कष्टाची कामं करणार आहे?
बघा बुवा. असं कानावर येतंय की, काही ठिकाणी म्युनिसिपालटीतल्या सफाई कर्मचार्‍यांच्या वगैरे नोकर्‍यांसाठीही पदवीधर लोक अर्ज करायला लागलेत सध्या.
हे काय भलतंच?
असं आपल्याला वाटतं; पण नाइलाजापोटी भली शिकलेली माणसंही शिपायांच्या, सफाईच्या, मोल मजुरीच्या कामाकडे वळणं नेहमीचं झालंय आता! नुसतं बी. कॉम., बी. ए. अशा पदव्यांना कोण विचारतंय सध्याच्या स्पर्धेत?
एकेकदा वाटतं, ज्या पदव्यांना कोणी विचारत नाही त्या घ्यायच्याच कशाला?
खरंय; पण ते अगोदर कळेल तर ना? होतं काय, दहावीनंतर आर्टस्ची, कॉमर्सची बारावी, बारावीनंतर पदवी, हे आपलं सवयीने होत राहतं. पहिल्या पदवीनंतर बरीशी नोकरी मिळत नाहीये हे पाहिलं की दुसरी पदवी घेतात. सारखा आजचा प्रश्न उद्यावर ढकलण्याकडे कल होतो माणसाचा!
एवढ्यात वयं तेवढी वाढत जातात बघा. वयाची पंचविशी आली, तिशी झाली, तरी जम बसत नाही अनेकांचा. मग वाटतं, दहावीनंतरच एक ना एक उद्योग, व्यवसायाचं कसब शिकलो असतो तर बरं झालं असतं!
आता राज्य सरकारलाही असंच वाटायला लागलंय बहुतेक!
कशावरून?
राज्य सरकार नव्या कॉलेजांना मान्यताच देणार नाहीये. आपण अशा संस्थांमधून सालोसाल फक्त बेरोजगारांच्या फौजा निर्माण करतोय हे लक्षात येतंय सरकारच्या.
नशीब! आता तरी लक्षात येतंय.
असं म्हणू नका एकदम. सध्या नाना प्रकारची नोकर भरती होतेच आहे सरकारकडून; पण कोणत्याही नोकरीसाठी काही कौशल्यं हवीत, तांत्रिक कसब हवं, तेच लवकरात लवकर शिकवावं याची जाणीव होणं महत्त्वाचं आहे. ‘पिकतं तिथे विकत नाही’ ही जुनी म्हण झाली. ‘जे विकेल तेच पिकवा’ या दिशेने शैक्षणिक धोरण जातंय याचं स्वागत करूया आणि तुमच्या चिरंजीवांना लवकर नोकरी मिळेल, अशी प्रार्थनाही करूया!

Back to top button