लवंगी मिरची : गडांचे पर्यटन | पुढारी

लवंगी मिरची : गडांचे पर्यटन

काय, चलता का गडावर?
आत्ता? गडावर? ह्या वयात कुठे चढउतार करायला लावता राव?
आम्ही चौघ निघालोय, म्हटलं तुम्हाला वाटलं तर या. भेळ फार छान मिळते गडाच्या सदरेवर.
ओली चटकमटक भेळ? मग येतो मी. पाय दुखले तर चोळून घेऊ उद्या नोकराकडून. शिवाय एकदा भेळेपर्यंत पोहोचलो की, आणखी कुठे चालणार नाही हं मी. नसती पायपीट करायला लावू नका.
राहिलं; पण सदरेच्या पुढे अंबरखान्यावर चायनीजची एक मस्त गाडी लावलीये म्हणतात. आम्ही कदाचित तिथेही जाऊ.
अगदीच राहावलं नाही तर तेवढं चालेन मीही. शेवटी चायनीजची मजा काही औरच.
आणखी पुढे गेल्यावर तोफेजवळ फार रुचकर ताक मिळतं म्हणे; पण ताकाने तुम्हाला सर्दी होईल.
नाही हो. एकदा गेलो की ताकही पिऊन बघेन थोडंसं.
बघावं तिथे भेळेचे कागद, पाणीपुरीचे द्रोण, पेयांचे रिकामे खोकडे, रबर, प्लास्टिक, कागदी रुमालाचे बोळे! तो कचरा बघायला कोण जाणार आहे?
खरंय. तीन-चारशे वर्षांपासूनचा कचरा पडला असणार तिथे!
नाही नाही. तसा तो गड वारसास्थळ म्हणून जाहीर झालाय. पुरातत्त्व विभाग करतो वाटतं त्याची देखभाल.
पण आपल्या लोकांची हुशारी कुठे जातेय? पुरातत्त्ववाल्यांची नजर चुकवून गडावरची झाडं तोडायला, तिथल्या तिथे लाकूडफाटा मिळवायला कमी करत नाहीत लोक.
आता आपल्याला गरम भाकरी-पिठलं हाणायला पाहिजे म्हटल्यावर जळण तर लागणारच ना? स्वयंपाकासाठी गॅस परवडत नाही अनेकांना.
हो. म्हणून तर लोक गडावर कुठेही बेकायदा चुली मांडतात. हाती लागेल ते लाकूड जाळतात. उरलंसुरलं अन्न, कचरा तिथेच टाकतात. मग कावळ्यांपासून गिधाडांपर्यंत कोणीही तिथे घिरट्या घालू दे.
आता पुढच्या थंडीच्या दिवसात गडावर लोकांची गर्दी वाढणार. किल्ल्याच्या कपारींमध्ये, पाणटाकीजवळ, बुरुजांच्या आधाराने अशा ठिकठिकाणी खाद्यपेयांच्या टपर्‍या उभ्या राहणार. ही गरज असते ना पर्यटकांची?
असतेच. असणारच; पण त्यासाठी प्रत्येक गडाची चौपाटी करायला हवी का?
एवढा अरसिकपणा करू नका. भटकंतीला चाऊम्याऊ खाऊची जोड नको ?
हवी तर. जरूर हवी; पण त्यासाठी गडावर कुठेही हॉटेलं चालवण्याची भानगड का सुचते लोकांना? खात्याने नेमून दिलेल्या तळातल्या जागेवर अधिकृतपणे करावा ना धंदा.
लोकांना खातपीत हिंडायला जास्त मजा येते.
पण पर्यावरणाला, इतिहासाला सजा होते! अशा उद्योगामुळे आपण कशाकशावर अतिक्रमण करतोय ह्याचंही भान नसावं लोकांना? पूर्वी गडांवर शत्रूंचं आक्रमण व्हायचं. तसं आता हे अतिक्रमण समजावं.
नाही. हा गुन्हा पूर्वीपेक्षाही गंभीर आहे. पूर्वीचे लोक त्यांचं वर्तमान वाचवत होते. आपल्याला इतिहास वाचवायचाय. त्याचं पावित्र्य राखायचंय. पुढच्या पिढ्यांसाठी त्याचा ठेवा जतन करायचाय. ऐतिहासिक गडांवरील वाईट कृत्ये थांबविण्याचं भान आल्याशिवाय आपलं काही खरं नाही.
गड-किल्ल्यांचे पर्यटन वाढायले हवे!

  • झटका 

संबंधित बातम्या
Back to top button