लवंगी मिरची : कडक परीक्षा, बेधडक विद्यार्थी! | पुढारी

लवंगी मिरची : कडक परीक्षा, बेधडक विद्यार्थी!

तुझ्या बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक कधी येणार आहे रे?
येईल तेव्हा येईल. तुम्हाला का एवढी चिंता पडलीये?
तू निष्काळजी आहेस ना? म्हणून मला लक्ष घालावं लागतं?
आतापर्यंतच्या बहुतेक परीक्षांमध्ये काठावर तरी पास होत आलोय ना मी पिताश्री?
ते उपकार तू नक्कीच केलेस माझ्यावर; पण काठावर पास होण्याबाबत सांगतो, आता आपलं शिक्षण मंडळ तो काठच उंच करायला निघतंय बहुतेक.
तो कसा काय म्हणे?
त्यांनी परीक्षा व्यवहारातल्या गेल्या दोन वर्षातल्या ढिसाळपणावर चाप बसवायचं ठरवलेलं दिसतंय.
ढिसाळपणा त्यांनीच आणला होता ना मुळात?
थोडंफार झालं असेल तसं; पण कोरोनानेही लावला त्या ढिसाळपणाला हातभार. परीक्षा कधी झाल्या, कधी झाल्या नाहीत. परीक्षेला हजर राहण्याच्या वेळा कधी पाळल्या गेल्या, कधी गेल्या नाहीत. एकूण सगळ्या व्यवहारातच चोखपणा जाऊन थोडा शिथिलपणा आला.
असं तुम्हाला वाटत असेल; पण आमच्या खूप दोस्तांना खच्चून मार्क भेटले गेल्या दोन वर्षांच्या परीक्षांमध्ये. सगळ्यांकडे आबादीआबाद पसरली जशी काही.
तेच पुढे व्हायला नकोय बोर्डाला. म्हणून यंदा दहावी,बारावी परीक्षांबाबत काटेकोर राहायचं ठरवतंय ते.
माझ्याच वर्षी ह्यांना बरी दुर्बुद्धी सुचली हो? कायकाय छळ करणार आहेत ते आमचा?
लगेच छळ म्हणू नका चिरंजीव, नियम घालणं, नियमांना जागणं म्हणजे छळ असतो का?गेली दोन वर्षं सगळ्यांनाच अडचणीची होती. म्हणून मग अभ्यासक्रमात कपात, पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ, ज्याला त्याला शाळेतच परीक्षा केंद्र देणं, असे मार्ग चोखाळले गेले.
आमच्या चंद्याच्या दादाला तर पेपर सुरू झाल्यावर पाऊण तासानंतर पोहोचल्यावरही पेपर लिहू दिला दिला परीक्षेचा. असं सहकार्य करायला पाहिजे.
सहकार्य? उद्या म्हणाल, आम्हाला पेपर लिहायलाही सहकार्य करा. परीक्षेला क्रमिक पुस्तक सोबत नेऊ द्या! असं कधी सहकार्य असतं का चिरंजीव?
आजकाल कित्येक प्रश्नपत्रिका परीक्षेआधीच ऑनलाईन बघायला मिळतात, माहीत आहे तुम्हाला?
हो रे! ह्या नवनव्या तंत्रज्ञानामुळे असले उद्योग हातोहात करता येतात आताशा. सवलत दिली की तुम्ही विद्यार्थी डोक्यावरच बसता. म्हणूनच बहुतेक बोर्डाने मनावर घेतलं असावं, परीक्षा कडक घ्यायच्या. अभ्यासक्रमात कपात नाही, पेपरला वाढीव वेळ मिळणार नाही, उशिरा पेपरला येणं किंवा लवकर चालतं होणं चालणार नाही, मार्कांची खैरात करणार नाही, पेपर अगोदरपासून व्हायरल होऊ देणार नाही.
परीक्षा तुम्ही कितीही कडक करा बाबा. आमच्यातले काही भिडू बेधडक होऊन आपापल्या पळवाटा शोधतीलच! तसे हुशार असतात बरं हे लोक.
तेच तर म्हणतोय. नाहीतरी एवढे हुशार आहात तर धड अभ्यास करून बैजवार पेपर लिहा ना लेको. सगळी बुद्धी वापरायची ती गैर मार्ग शोधायलाच का?
हे वाक्य माझ्याकडे बघत बोलू नका बाबा. मी काही उलटसुलट करत नसतो बरं का.
पण तू अभ्यासही करत नाहीस. तो तेवढा कर. काय आहे, इमानाने अभ्यास करून सन्मानाने पास व्हावं हेच सगळ्यात चांगलं. नाहीतर कॉपी करून, अगोदर पेपर लीक करून पुढे गेलात तर कोणा मेहनती विद्यार्थ्यावर अन्याय केला जाईल.
ह्या! मी कशाला अन्याय करतोय?
सध्या परीक्षेचं वेळापत्रक नीट समजून, उतरवून वगैरे घ्या बच्चनजी. यंदा पेपरला उशिरा पोहोचलात तर कोणीही परीक्षा हॉलमध्ये घेणार नाही हे नक्की!

Back to top button