विधानसभा निवडणूक : गुजरातमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा | पुढारी

विधानसभा निवडणूक : गुजरातमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा

गुजरात विधानसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्याचे मतदान उद्या, गुरुवारी तर दुसर्‍या टप्प्याचे मतदान येत्या सोमवारी होत आहे. निवडणूक अंतिम टप्प्यात आल्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दाही मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. विशेषत: भाजपकडून या मुद्द्याला हात घातला जात आहे.

काँग्रेस पक्ष गुजरातसह देशभरात तुष्टीकरणाचे राजकारण करीत असल्याचा थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभांद्वारे चालविला आहे. तर काश्मीरमधील कलम 370 संपुष्टात आणणे, अयोध्येत राम मंदिराची निर्मिती आणि समान नागरी कायदा हे विषय उपस्थित करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपच्या बाजूने कौल देण्याचे आवाहन जनतेला करीत आहेत.

2002 मध्ये झालेल्या जातीय दंगलीनंतरच्या विधानसभा निवडणुकांवर नजर टाकली तर त्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्याचा प्रामुख्याने पगडा दिसून येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा केंद्राच्या राजकारणात गेले असले तरी गुजरातवर त्यांची बारीक नजर असते. हिंदुत्वाच्या मुद्द्याचे महत्त्व ते आणि गुजरात भाजपचे नेते विसरू शकत नाहीत. गुजरातची यावेळची निवडणूक भाजप आणि काँग्रेससाठी ‘करो वा मरो’ची ठरली आहे. त्यामुळे भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित झाला नाही तरच नवल. मुंबईवरील 26/11 चा दहशतवादी हल्ला, दिल्लीतील बाटला हाऊस एन्काऊंटरवेळी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी घेतलेली भूमिका, अहमदाबाद, सुरतसह ठिकठिकाणी झालेले बॉम्बस्फोट आदी मुद्दे पंतप्रधान मोदी यांच्याकडून जाहीर सभांमध्ये उपस्थित केले जात आहेत.

संबंधित बातम्या

स्वत: पंतप्रधान मोदी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रखर असताना इतर भाजप नेते मग मागे कसे राहतील! अमित शहा यांनीदेखील 2002 सालच्या दंगलींचा उल्लेख करीत दंगलखोरांना धडा शिकविण्यात आल्याचे स्पष्ट केले. गेल्या पंधरा वर्षांच्या तुलनेत हिंदुत्वाचा मुद्दा तितका गरम राहिलेला नाही; पण निवडणुकीवर प्रभाव टाकण्याची क्षमता अजूनही या मुद्द्यात आहे, याची भाजपला पुरेपूर जाणीव आहे. भाजपचा आक्रमक प्रचार हा त्याचाच एक भाग आहे.

अडीच दशकांपेक्षा जास्त काळ गुजरातवर भाजपचा एकछत्री अंमल आहे. या कालावधीत भाजपची सर्वोत्तम कामगिरी 127 जागा जिंकण्याची आहे. यापेक्षाही सरस कामगिरी करण्याचे उद्दिष्ट यावेळी भाजपने ठेवलेले आहे. अमित शहा यांनी तर दीडशे जागांचे उद्दिष्ट जाहीर केलेले आहे. भाजपचा 127 जागांचा विक्रम मागे पडणार काय, हे येणारा काळच सांगणार आहे; पण भाजपवाल्यांनी त्यासाठी जोरदार ताकद लावली आहे, यात मात्र शंका नाही.

राज्यातील 53 जागा अशा आहेत की, ज्याठिकाणी मुस्लिम मतांची संख्या 10 ते 61 टक्क्यांपर्यंत आहे. या जागांवर होणारे मतदानच भाजपच्या सरस कामगिरीचा फैसला ठरणार आहे. मुस्लिमबहुल मतदारसंघांत खडिया,जमालपूर, दरियापूर, कालुपूर, दानिलिमदा, वेजलपूर आणि बापूनगर या मतदारसंघांचा समावेश आहे. येथील मुस्लिम लोकसंख्या 20 ते 61 टक्के आहे. अशीच स्थिती सौराष्ट्रमधील वांकानेर, सोमनाथ, द्वारका, खंभालिया, कच्छमधील अबडासा, मांडवी, भूज, उत्तर गुजरातमधील वडगाम, सिद्धपूर, अहमदाबादमधील ढोलका, पंचमहलमधील गोध्रा, तसेच भरूच, वागरा, जंबूसर, मटर, मेहमदाबाद, महुधा, लिंबायत आणि सूरत पूर्वमध्ये आहे. याठिकाणी भाजपला विशेष ताकद लावावी लागत आहे.

गुजरातमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. तरीही आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये प्रवेश केल्याने चुरस वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी गुजरातमध्ये ठाण मांडल्याने गुजरातची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची बनवली. काँग्रेसनेही आपली ताकद पणाला लावली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप आपली सत्ता कायम राखण्यात यशस्वी होईल की नाही, हे निवडणुकीनंतर कळेल.

– पार्थ ठक्कर

Back to top button