विदेश धोरणातील पंतप्रधान मोदींचे योगदान - पुढारी

विदेश धोरणातील पंतप्रधान मोदींचे योगदान

ज्ञानेश्वर मुळे, माजी परराष्ट्र सचिव

विदेश धोरणात पंतप्रधानांची भूमिका फार महत्वाची ठरते. पंतप्रधान मोदींची पहिली अमेरिका भेट ‘पाथब्रेकिंग’ आणि ऐतिहासिक होती. या भेटीतच मोदींनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना मांडली. ही भेट मोदींच्या इतर देशांच्या भेटीसाठी मानदंड ठरली.

सध्याच्या अफगाण परिस्थितीमुळे जगातील सर्व प्रमुख देशांसमोर पेच निर्माण झाला आहे. अफगाणिस्तानच्या विकासाचा भागीदार व शेजारी या नात्याने भारतासमोरही काही गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. 9/11 च्या घटनेला 20 वर्षे पूर्ण होत असताना या परिस्थितीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्गार विचार करायला लावणारे आहेत. ते म्हणाले होते, ‘जर विनोबांच्या ‘जय जगत’ आणि विवेकानंदांच्या ‘विश्व बंधुत्वाच्या’ संदेशानुरूप जग चालले असते, तर अशा प्रकारचा विध्वंस झाला नसता.’ नरेंद्र मोदींच्या विदेश नीतीचा अंदाज अशा प्रकारच्या वक्तव्यातून येतो.

आंतरराष्ट्रीय राजनीतीला व त्या होणार्‍या उच्चस्तरीय चर्चांना भारतीय संस्कृती आणि विचार यांचे आयाम देण्याची पंतप्रधानांची किमया या पूर्वीच्या परदेश धोरणात न दिसलेली गोष्ट आहे. एरेव्ही विवेकानंद आणि विनोबा भावे यांना आंतरराष्ट्रीय संदर्भात उद्धृत करण्याची कल्पना फारशी कुणाला सुचलेली दिसत नाही.

विदेश नीती अनेक गोष्टींवर अवलंबून असते आणि सध्याच्या या अत्यंत गुंतागुंतीच्या काळात तिला अनेक पातळ्यांवरून हाताळावे लागते. उदा. त्रिपक्षीय किंवा दोन देशांमधल्या वार्ता किंवा संवाद, सार्क, ब्रिक्स, राष्ट्रकुल यासारख्या गुंत्यांच्या संदर्भातील कार्य, संयुक्त राष्ट्रसंघ आणि युनेस्को, युनिसेक, युएनडीपी इत्यादी शाखांच्या कामातील आपली भूमिका, त्याचबरोबर आतंकवाद, हवामान बदल, अंटार्क्टिक व आर्क्टिक प्रदेश, अवकाश क्षेत्र, आण्विक धोरण व धोके अशा अनेक पातळ्यांवर नेतृत्व बजावू पाहणार्‍या देशांना काम करावे लागते. शिवाय आपल्या नागरिकांच्या विदेशातील हितसंबंधांच्या जपणुकीचे कामही विदेश धोरणाअंतर्गत येते.

त्यालाही लागणारी उत्तम विदेश सेवा, जाणकार अधिकारी, सक्षम दूतावास व राजदूत यावर एखाद्या देशाच्या विदेशी धोरणाचे यशापयश अवलंबून असते. त्यातही विदेश मंत्रालयातील मुख्य अधिकारी, सचिव, मंत्री, यांची भूमिका विदेश नीतीमध्ये फार महत्त्वाची ठरते; पण आजच्या या तंत्रज्ञानाच्या जमान्यात क्षणार्धात जगात काय चालले आहे, ते कळते. शिवाय फोन उचलला, तर कुणाशीही व्हिडीओ कॉन्फरन्स करता येते अशा काळात आणखी एका व्यक्तीची भूमिका फार महत्त्वाची ठरते आणि ती म्हणजे पंतप्रधान यांची.

मला 2014 ते 2019 या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाला ते कशा प्रकारे वेगवेगळे विषय हाताळत ते समजून घेण्याच्या अनेक संधी मिळाल्या. त्यांची भाषणे ऐकली. अनेक भाषणांना आवश्यक मसुदे आणि मुद्दे तयार करण्याची संधी मिळाली. मुख्य म्हणजे दिल्लीत त्यांच्याबरोबर अनेक बैठकांत सहभागी होण्याची संधी मिळाली. आपल्या विदेशी धोरणाचे स्तंभ बर्‍यापैकी स्थिर असले, तरी त्यात नेतृत्वानुसार गतिशीलता कमी- अधिक होत असते.

शिवाय विदेश धोरणात गतिमानता ही असावीच लागते. जगभरच्या प्रमुख सत्तांचे व्यवहार, सर्वत्र होणारी सत्तांतरे, शेजारच्या देशांबरोबरच्या संबंधातील चढ-उतार या सर्वांना हाताळताना आपले विदेश नीतीचे स्तंभ जरी पक्के असले, तरी त्यांच्या अंमलबजावणीत लवचिक गतिशीलता असावी लागते. पंतप्रधान मोदींच्या बाबतीत अशा प्रकारची गतिशीलता निश्चित आढळते. प्रत्येक पंतप्रधान स्वतःच्या विशिष्ट व्यक्तिमत्त्वाची छाप सोडतात.

त्यांची स्वतःची गतिशीलता, प्राथमिकता, क्षमता, दूरद़ृष्टी या सर्वांचा प्रत्यक्ष परिणाम विदेशी धोरणाच्या यशापयशावर होतो. थोडक्यात, पंतप्रधानांच्या व्यक्तिमत्त्वाचा थेट संबंध परराष्ट्र धोरणाच्या अंमलबजावणीत दिसतो. विदेशी धोरणाबाबत पंतप्रधान मोदींनी सुरुवातीपासून रुची दाखवली आणि त्यात एक गतिमानता, समस्यानुकूल तत्परता आणली असे निःसंशय म्हणता येईल.

सप्टेंबर 2014 च्या मोदींच्या अमेरिका भेटीत मला त्यांची अनेक वैशिष्ट्ये दिसून आली. बर्‍याचदा विदेशातील पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर विदेश मंत्रालयाची छाप असते. विदेशाच्या विशेषतः महासत्ता असलेल्या अमेरिकेसारख्या देशात कार्यक्रमाच्या आशयात कशी भर टाकता येईल, हा चिंतेचा विषय असतो; पण पंतप्रधान मोदी कार्यक्रमाचा प्रत्येक पैलू तपासून बघत तर होतेच; पण इतक्या कमी वेळेत ‘जामपॅक’ कार्यक्रम तोही अर्थपूर्ण करण्यावर त्यांचा भर होता. थोडक्यात, त्या भेटीतून अपेक्षित अशा निष्कर्षांबाबतीत पूर्ण विचार करून त्यांनी कठोर चाळणी लावून प्रत्येक कार्यक्रम स्वीकारला होता. कार्यक्रमाच्या तपशिलात जाऊन प्रत्येकाचा उद्देश, वेळ आणि चर्चा करावयाची विषयसूची याबाबत ते जागरुक होते.

पहिल्यांदाच मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये वीस हजार अमेरिकनांना आमंत्रित करून एक जगावेगळा कार्यक्रम करण्याचे आव्हान त्यांनी न्यूयॉर्कमधील कौन्सुलेटला आणि वॉशिंग्टनमधल्या दूतावासाला दिले होते. या कार्यक्रमासाठी त्यांच्या कार्यालयाकडून सतत मदत व मार्गदर्शन मिळत राहिले. कोणत्याही दौर्‍याचे यशापयश त्या दौर्‍याची आधी किती तयारी झाली, यावरून ठरते. पंतप्रधानांच्या विदेश दौर्‍यात अशा पूर्वतयारीचे महत्त्व अधिकच असते.

पंतप्रधानांच्या दौर्‍यात अशा प्रकारची तयारी कसून केली होती. माझ्या तीन दशकांपेक्षा अधिक विदेश सेवेत मी राजीव गांधी, नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी इत्यादी पंतप्रधानांचे दौरे जवळून अनुभवले आणि त्यात योगदानही दिले; पण त्या भेटीमध्ये अशा प्रकारचेच महत्त्वाकांक्षी नियोजन आणि तितकीच जबरदस्त अंमलबजावणी मी कधीही पाहिली नव्हती. विश्वमंचावर भारताचे स्थान महत्त्वाचे आहे, हे ठासून सांगणार्‍या पंतप्रधान मोदींचा प्रयत्न आगळावेगळाच नव्हता तर अभूतपूर्व होता. त्यांच्या जणू प्रत्येक पावलाचे नियोजन त्यांनीच केले होते आणि परिणामतः मोदींची पहिली अमेरिका भेट खर्‍या अर्थाने ‘पाथब्रेकिंग’ आणि ऐतिहासिक झाली.

या भेटीत त्यांचे संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणही गाजले. भारताच्या पंतप्रधानांनी सार्वजनिकरीत्या हिंदी आणि तेही संयुक्त राष्ट्रसंघात ही परंपरा त्यांनी अधिक समृद्ध केली. यापूर्वी वाजपेयी हिंदीत भाषण करत असत. त्यांनी 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिस्थळला भेट देऊन अमेरिकन जनतेची मने जिंकली शिवाय दहशतवादाला भारताचा कट्टर विरोध आहे ही गोष्टही ठळकपणे अधोरेखित केली.

याशिवाय त्यांची अमेरिकन युवा पिढीबरोबर संवादाची तीव्र इच्छा होती. न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध सेंट्रल पार्कमध्ये त्यांनी हजारो अमेरिकन युवक-युवतींना पर्यावरण व शांतीपूर्ण विश्व याबाबत प्रभावी संबोधन केले. द्वीपक्षीय वार्तालाप राष्ट्राध्यक्ष ओबामांसह अनेकांबरोबर झाला. त्यात न्यूयॉर्कचे महापौर आणि न्यू जर्सीचे गव्हर्नर यांचाही समावेश होता.

या भेटीच्या आधी पंतप्रधान विदेश सेवेतल्या अधिकार्‍यांबरोबर सविस्तर चर्चा करत अतिशय समर्पक प्रश्न विचारत. उदा. न्यूयॉर्कच्या महापौरांना त्यांनी गरिबांसाठी माफक दरात घरकुले बांधण्याच्या कार्यक्रमाबाबत चौकशी केली. न्यूयॉर्कचे पोलिस जगप्रसिद्ध आहेत. त्यांचे व भारतातील महानगर पोलिस व्यवस्थेचे सहकार्य प्रस्थापित करण्याबाबत चर्चा करून त्याची कार्यवाही करण्याचे ठरवले. त्याचप्रमाणे न्यू जर्सीत भारतीयांची संख्या प्रचंड असल्याने तेथील गव्हर्नर बरोबर चर्चा केली.

या भेटीत पंतप्रधान मोदी यांच्या राजनैतिक कौशल्याचा पुरेपूर परिचय अमेरिकेला झाला. ही भेट अनेक अर्थांनी मोदींच्या इतर देशांच्या भेटीसाठी मानदंड ठरली. या भेटीचे यश अनेक पद्धतीने मांडता येईल; पण एक गोष्ट जरी सांगितली, तरी पुरेशी आहे. या भेटीतच मोदींनी आंतरराष्ट्रीय योगदिनाची कल्पना मांडली आणि त्यानंतर केवळ 3 महिन्यांत जगभरच्या 175 देशांनी को-स्पॉन्सर करून आंतरराष्ट्रीय योगदिनावर संयुक्त राष्ट्रसंघाने शिक्कामोर्तब केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेपासून या ठरावासारखा दुसरा ठराव बहुमताने पारित झाला नाही.

न्यूयॉर्कमधील महत्त्वाच्या वृत्तपत्रांनी व नियतकालिकांनी मोदींचा ‘आंतरराष्ट्रीय मंचावरचा रॉकस्टार’ असे वर्णन व प्रशस्ती केली. कुठल्याही देशाच्या पंतप्रधानांना मॅडीसन स्केअर गार्डनमधल्या सर्व खुर्च्या भरून फिरत्या रंगमंचावर भाषण करणे आजवर जमले नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका दगडात अनेक पक्षी मारले गेले. मोदींनी भारताच्या वतीने शक्तिप्रदर्शन केलेच शिवाय अमेरिकेतील भारतीयांना व पर्यायाने जगभरच्या भारतीयांना एक नवा आत्मविश्वास दिला. अमेरिकन सिनेटर, काँग्रेसजन व जनता यांच्या मनपटलावर भारताची एक न मिटणारी प्रतिमा कोरून ती भेट संपली.

Back to top button