लवंगी मिरची : सातनंतर घराबाहेर? | पुढारी

लवंगी मिरची : सातनंतर घराबाहेर?

आई, मला आज रात्री घरी यायला उशीर होईल बरं का.
आजही? कालही उशिरानेच घरी आलीस गं.
तू काय घड्याळाकडे बघत बसतेस की काय, मी घरी पोचेपर्यंत?
माझं सोड, तुझं सांग. आज रात्री घरी यायला तुला सुमारे किती वाजतील?
साडेबारा तरी वाजतील बहुतेक.
काय गं हे? ‘सातच्या आत घरात’ हे तत्त्व पाळणारे लोक आम्ही. आता तुम्ही मुली तर सारख्या ‘सातनंतर घराबाहेर’ अशाच वागायला लागलात.
तेवढीच महत्त्वाची कामं असतात आई. आज मीटिंग आहे. नंतर डिनर ठेवलाय क्लायंटसाठी. रात्री नऊनंतर तर जमणार मंडळी. शेवटचा पाहुणा जाईपर्यंत मला हॉटेल सोडता येणार नाही.
म्हणजे आजही माझं हरीजागरण आहेच. रात्री-अपरात्री, तू सुखरूप घरी आलेली दिसेपर्यंत माझ्या जीवाला चैन नसतो.
रात्रीचं काय वेगळं? भर दिवसा बायाबापड्यांवर अत्याचार होत नाहीत का आई?
होतात, बये, होतात. दिवसभरात, केव्हाही, कुठेही, कोणत्याही वयाच्या बाईला धोका हा असतोच आपल्याकडे.
म्हणूनच म्हटलं. शेवटी तू काय माझ्या पायांना दोरी बांधून ठेवणार आहेस का आई? तुला माहीत आहे ना? माझी नोकरी आहे आणि तिच्यानिमित्ताने बाहेर जाणं-येणं, प्रवास असतोच. कामं सुरू असतात सारखी कुठे कुठे.
पण मी तर घरीच आणि रिकामी असते ना? मग बसते विचार करत, काळजी करत.
कमाल आहे. मी खूप शिकावं, स्वतःच्या पायावर ठामपणे उभं राहावं हे तुझंच स्वप्न होतं ना आई? मग ते वास्तवात आल्यावर ही हळहळ का?
तू पायावर नुसती उभी कुठे आहेस बये? तू तर सैरावैरा पळते आहेस. खरं सांगायचं तर, पुढे जाऊन वास्तव इतकं गढूळ होईल, बायकांच्या जीवावर उठेल असं वाटलं नव्हतं मला.
एरव्हीचं राहू दे, कालची तारीख 25 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय स्त्री हिंसाचारविरोधी दिन असतो आई. काल तरी तू निश्चिंत राहायचंस.
असं एका दिवसाने काय होणार आहे? रोज कसला ना कसला दिवस घातला जातोच आपल्याकडे. पण बाहेर बायकांबाबत हिंसाचाराचा नुसता हैदोस सुरू आहे आणि तुम्हा मुलींचं वेळी-अवेळी हिंडणं वाढतंय. त्याला काय करायचं?
त्यासाठी मुलींना मजबूत तयार करायचं. धीट करायचं. समोर येईल त्या प्रसंगाशी दोन हात करायला शिकवायचं. शेवटी आजच्या काळात मुलींना घरी आणि गोणपाटात गुंडाळून ठेवता येणार आहे का आई?
बये, बाहेरची वाढती व्यसनं, विकृती, हत्यारं, नवी सायबर गुन्हेगारी यांच्यामुळे भेदरलेली आमच्यासारखी माणसं दुसरं मोठंसं काय करू शकणार?
काळजी करणं सोडा. विश्वास ठेवा. मुलींवरही, त्यांना आपण दिलेल्या शिदोरीवरही.
माझा तुझ्यावर विश्वास असेलही एक वेळ, पण बाहेरच्या जगाचं काय करू?
त्याला बायकांचं महत्त्व पटवत राहा. बायकांना सन्मानाने वागवायला शिकवा. मुलींना सातच्या आत घरात येण्याचं शिकवण्यापेक्षा मुलग्यांना, बाप्यांना सभ्यतेच्या मर्यादेत राहायला शिकवा. असा नजरिया बदलला की जगही बदलेल आई.

– झटका

Back to top button