उत्तर कोरियाचा पुन्हा आक्रमक पवित्रा | पुढारी

उत्तर कोरियाचा पुन्हा आक्रमक पवित्रा

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हा नेहमीच त्याच्या धडाकेबाज क्षेपणास्त्र परीक्षणांमुळे जगभरात चर्चेत असतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना किम जोंग याच्यासोबत करार करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून उत्तर कोरियाने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. यामुळे जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यासह अमेरिकेचीही चिंता वाढली आहे.

जगाच्या राजकारणात शीतयुद्धाच्या काळात रशिया आणि अमेरिका यांच्यात म्हणजेच साम्यवाद आणि भांडवलशाहीमध्ये लढत रंगली. रशियातील साम्यवाद कोसळला आणि अमेरिकेतही राजकीय सत्ताबदल होत गेले. अलीकडील काळात ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याच्यासोबत करार करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला; परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून उत्तर कोरियाने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.

उत्तर कोरियाने अलीकडेच सुमारे 23 क्षेपणास्त्रे डागून दक्षिण कोरियाच्या सागरी सीमेवर मोठा तणाव निर्माण केला. या क्षेपणास्त्रांपैकी एक दक्षिण कोरियाच्या सागरी सीमेजवळ पडले. असा प्रकार पहिल्यांदाच झाल्याने दक्षिण कोरियानेही तीन क्षेपणास्त्रे डागून त्वरित प्रत्युत्तर दिले. उत्तर कोरियाने अशाच प्रकारची क्षेपणास्त्रे जपानच्या दिशेनेही डागली. त्यामुळे जपानमध्ये प्रचंड खळबळ उडाली. यानिमित्ताने उत्तर कोरियाच्या या आक्रमक पवित्र्याचे कारण काय आहे, त्याचे कोणते परिणाम भविष्यात दिसू शकतात, याचा वेध घेणे औचित्याचे ठरेल.

संबंधित बातम्या

खरे तर दक्षिण कोरियासोबत अमेरिकेने लष्करी सराव सुरू केला आणि त्यानंतर उत्तर कोरियाचा तिळपापड झालेला दिसत आहे. कारण, या सरावानंतरच किम जोंग उन याने प्रतिक्रिया म्हणून मोहिमा सुरू केल्या. काही क्षेपणास्त्रे पॅसिफिक महासागरातही सोडली. शिवाय पाणबुडीचा वापर करूनही काही क्षेपणास्त्रे किमने डागली. यातीलच एका क्षेपणास्त्राचा थेट जपानवर मारा झाला. यामुळे संतापून जाऊन जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी तातडीने या हल्ल्याचा निषेध करत थेट प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. आम्हाला जपानी जनतेचे रक्षण करायचे आहे. उत्तर कोरिया आणि जपान यांच्यातील संघर्ष नवा नाही. आजवर जवळपास सातवेळा उत्तर कोरियाने जपानवर हल्ले केले आहेत; परंतु यावेळचा हल्ला मात्र काहीसा गंभीर होता. त्यामुळे जपानमध्ये उत्तर कोरियाविरुद्धचे वातावरण तापले आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संघर्षामध्ये जपानने उडी घेतल्यास काय परिस्थिती उद्भवेल हे जाणून घेण्यापूर्वी कोरिया संघर्षाचा इतिहास लक्षात घेतला पाहिजे.

उत्तर कोरियाने अण्वस्त्रशक्तीचा विकास कसा केला, याची माहिती मोठी उद्बोेधक आहे. 1970 च्या दशकापासून उत्तर कोरियाने आण्विक सामर्थ्य विकसित करण्यासाठी मदत करण्याची विनंती रशियाला केली होती; परंतु रशियाने ती नाकारली; परंतु 1978 ते 1991 या काळात मात्र हळूहळू रशियाने उत्तर कोरियाच्या आण्विक सामर्थ्याला मदत केली. चीननेही सुरुवातीला यासाठी नकार दर्शवला असला तरी पुढे जाऊन चीननेही उत्तर कोरियाच्या आण्विक महत्त्वाकांक्षेला खतपाणी घातले. चीन हे साम्यवादी राष्ट्र होते. 1991 पर्यंत रशियाही साम्यवादी होता. त्यामुळे उत्तर कोरियातील साम्यवादी साम—ाज्य विस्ताराला या दोन्ही देशांचा वरदहस्त लाभणे स्वाभाविकच होते.

उत्तर कोरियाने आण्विक सामर्थ्यवृद्धीबरोबरच आंतरखंडीय क्षेपणास्त्रे विकसित करण्याचा सपाटाच लावला. 1993 पासून ते 2022 पर्यंत सातत्याने उत्तर कोरियाने आपल्या आण्विक साधनसामग्रीमध्ये वाढच केली आहे. सीटीबीटी आंतरखंडीय क्षेपणास्त्रबंदी करार झाले; पण उत्तर कोरिया या करारातून बाहेर पडला आणि त्याने आण्विक कार्यक्रम सुरूच ठेवले. कोव्हिड साथीच्या काळातही चारवेळा उत्तर कोरियाने आण्विक चाचण्या केल्याचे दिसून आले. गेल्या 10 वर्षांत 8 ते 10 वेळा क्षेपणास्त्रे डागण्याचा सपाटा किम जोंग याने लावलेला दिसला.

मध्यंतरी त्याची प्रकृती बिघडली होती. त्याने ट्रम्प यांच्याबरोबरच्या शिखर परिषदेतून शांततेचा करार केला; परंतु ट्रम्प यांच्या पराभवानंतर बायडेन यांची सत्ता आली आणि अमेरिकेने जुनेच राजकारण सुरू ठेवल्याने अमेरिका व दक्षिण कोरिया यांचे मेतकूट जसजसे चांगले जमत गेले आणि दक्षिण कोरियाला अमेरिकेकडून लष्करी मदत जसजशी वाढत गेली, तशी त्याला प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरियाने आपल्या क्षेपणास्त्रांचा विकास सुरू ठेवला. याबरोबर उत्तर कोरियाने इंडो पॅसिफिक विभागात आपला वरचष्मा दाखवण्यासाठी अधूनमधून जपानला प्रतिशह देण्याचे राजकारण सुरू ठेवले आहे. हे करत असताना चीनला आपल्या बाजूस वळते करणे, रशियाची सहानुभूती मिळवणे या प्रकारचे डावपेच उत्तर कोरियाचे नेते सातत्याने खेळत असतात.

एकीकडे गंभीर आर्थिक प्रश्नांचा सामना करत असतानाही उत्तर कोरियाचा हुकूमशहा जागतिक राजकारणात आपला डंका वाजत राहावा यासाठी क्षेपणास्त्र कार्यक्रम मात्र थांबवायला तयार नाही. गेल्या आठ वर्षांतील उत्तर कोरियाचा क्षेपणास्त्र वाढीचा दर पाहिला तर आपणास थक्क व्हायला होते. कारण कुठल्याही प्रकारे अडचणी आल्या; मग त्या आर्थिक, आरोग्य की अंतर्गत असो, त्याची परवा न करता किम जोंग आण्विक कार्यक्रमाचा धडाका सुरू ठेवत आहे.

संयुक्त राष्ट्रसंघात उत्तर कोरियाविरुद्ध अधूनमधून ठराव येतात; परंतु चीनसारखे राष्ट्र त्याच्या पाठीशी असल्यामुळे या मुजोरीला कोणीही लगाम घालू शकणार नाही. रशियाचीही सहानभूती आपण घेतोच आहे, या प्रकारच्या भावनेमुळे उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम तसाच चालू आहे. त्याला लगाम कसा घालणार, हा प्रश्न आहे. कारण, विभागलेल्या जागतिक सत्तांचे राजकारण आणि दोन कोरियांमधील शीतयुद्ध काळातील राजकीय भांडण हे जग बदलले तरी अजूनही सुरूच आहे. दोन्ही कोरियांमधील राज्यकर्त्यांनी शांततामय विकास कार्यक्रमासाठी पैसा खर्च केला तर जनतेचा विकास होईल.

कोरियातील या अंतर्गत संघर्षाचे परिणाम जपानसारख्या शांतताप्रिय राष्ट्रावरही होत आहेत. या ना त्या कारणाने युक्रेनचा प्रश्न जसा गुंतागुंतीचा बनला आहे आणि त्यातून जसे प्रश्न निर्माण होत आहेत, तसेच प्रश्न आणि उपप्रश्न दोन्ही कोरियांच्या संघर्षातून निर्माण होऊ शकतात. हा धोका लक्षात घेऊन दोन्ही कोरियांतील युद्धजन्य परिस्थिती टाळून शांततेच्या मार्गाने विकासाचा आशियाई मार्ग कसा पुढे नेता येईल यावर विचार व्हायला हवा; तरच उत्तर कोरियातील बेलगाम सत्ताधीशाच्या महत्त्वाकांक्षेला कुठेतरी मर्यादेत ठेवू शकू आणि कोरियामध्ये शांततेचे, विकासाचे पर्व उदयास येऊ शकेल.
– प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Back to top button