पुढारी अग्रलेख : जुन्याच संकटाची चाहूल | पुढारी

पुढारी अग्रलेख : जुन्याच संकटाची चाहूल

दिल्ली पोलिसांनी शोधून काढलेल्या घातपाती टोळीतील एकाची मुंबईत धारावी येथून उचलबांगडी करण्यात आली. यापैकी चार जणांना आधीच कोर्टात हजर केलेे होते आणि दोघांना नंतर हजर करायचे होते; पण मुद्दा त्यांना पकडण्यापुरता किंवा त्यांचा डाव उधळण्यापुरता मर्यादित नाही. 26/11 च्या हल्ल्यातून मुंबईला अजून बाहेर पडता आलेले नसताना इतका मोठा कट रचला जाऊ शकतो, ही बाबच भयंकर आहे. यापैकी दोघे हत्यारांचा वापर करायचे प्रशिक्षण पाकिस्तानात जाऊन घेऊन आल्याचे सांगण्यात आले आहे. तिथे त्यांना दाऊद इब्राहीमचा भाऊ अनिस इब्राहीम याच्या माध्यमातून सर्व मदत करण्यात आल्याचेही उघडकीस आले. त्यांना मस्कतमार्गे पाकिस्तानात नेण्यात आले व तिथे पूर्ण प्रशिक्षित करून मायदेशी दगाबाजी करायला परत पाठवण्यात आले.

पोलिसांनी गुन्ह्याआधीची सर्व कार्यपद्धती उघड केली. परदेशी जाऊन प्रशिक्षण घ्यायचे आणि मायदेशी परतून आपल्याच देशबांधवांच्या जीवावर उठायचे, ही मानसिकता अमानुष व रानटी आहे. यातून अशा लोकांना काय साधायचे असते, त्याचाही उलगडा होत नाही. ही माणसे दहशतवादाच्या आहारी कशाला जातात आणि अशी भयंकर कृत्ये करताना आपलेही प्राण गमावत असतात. त्यातून त्यांना काय मिळते, त्याचा शोध मानसोपचार जाणकारांकडून घेतला जाणे आवश्यक आहे. कारण, हा धोका भारतापुरता, तसेच पाकिस्तानपुरताही मर्यादित नाही. खुद्द पाकिस्तानातच अशा जिहादी दहशतवादाचे पालनपोषण होत असले, तरी त्यांनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागतच असते. आताही तालिबानच्या निमित्ताने जे काही उघडकीस येत आहे, त्यातून पाक नागरिकांचे जीव कसे कायम मृत्यूच्या छायेत आहेत, त्याचा अंदाज येतो. मग, त्या देशाची जनता असल्या राष्ट्रीय धोरणाला विरोध का करत नाही, असाही प्रश्न पडतो.

प्रत्यक्षात घातपात करणारे किंवा कुठल्याही देशात जाऊन सामान्य लोकांच्या जीवाशी खेळणारे अतिरेकी बाजूला ठेवून त्याचा विचार करावा लागेल. कारण, हा भारताच्या नागरी जीवनाचा प्रश्न नाही, तर अवघ्या जगाला भेडसावणारा गंभीर प्रश्न आहे. त्याकडे प्रत्येक देशाने एकूणच मानवतेला धोका म्हणून बघायला शिकले पाहिजे. हा स्थानिक वा राष्ट्रीय सुरक्षेच्या मर्यादेतला विषय नसतो. आज भारतापुढे किंवा अमेरिका, इंग्लंडपुरता विषय वाटेल; पण व्यवहारात तो कोरोनासारखाच जागतिक संकटाचा विषय झालेला आहे. त्यामुळेच अवघ्या जगाने मानवतेसमोरचे आव्हान म्हणून त्याला सामोरे जाण्याखेरीज पर्याय नाही. त्यातही भारतातील विविध राज्ये व तिथल्या स्थानिक सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर हा विषय सोडता कामा नये. मुंबईसह दिल्लीतून पकडण्यात आलेल्या या टोळीविषयी लवकरच प्रादेशिक वा राजकीय ऊहापोह सुरू होईल. त्यामध्येही धर्माचे धागेदोरे शोधून त्याला फाटे फोडले जातील. पर्यायाने त्यातही आपापल्या मतपेढ्यांचे राजकारण खेळले जाण्याचा धोका अधिक भयंकर आहे.

संबंधित बातम्या

बुद्धिवंत कायम गोंधळलेले असतात आणि मूर्ख माथेफिरू नेहमीच आत्मविश्वासाने भारावलेले असतात, अशा अर्थाचे कुणा नामांकित विचारवंताचे विधान या परिस्थितीत आठवते. तसे नसते, तर दोन दशकांपूर्वी जन्मलेला हा दहशतवादाचा भस्मासूर एव्हाना विश्वव्यापी अक्राळविक्राळ झालाच नसता. त्याने भारतात उच्छाद मांडला नसता किंवा अमेरिकेच्या जुळ्या मनोर्‍यांवर प्रवासी विमाने आदळवण्यापर्यंत मजल मारली नसती. तालिबान्यांचा बंदोबस्त अमेरिकन फौजेला शक्य झाला नाही, तर मुंबई, दिल्लीचे पोलिस अशा काही टोळ्यांना जेरबंद करून दहशतवाद कसा मोडीत काढू शकतील? अपवादात्मक परिस्थितीला अपवादात्मक पर्याय व उपाय शोधावे लागतात, त्याचे भान नसलेल्यांकडून अशा समस्यांचा निचरा होत नसतो. 30-40 तासांत केवळ दहा घातपात्यांनी अवघी मुंबई ओलिस ठेवून शेकड्यांनी निरपराध नागरिकांना किडा-मुंगीप्रमाणे ठार मारले; पण त्यापैकी एक जिहादी जिवंत सापडला त्या अजमल कसाबला फासावर लटकवण्यासाठी भारतीय कायदा व न्याय व्यवस्थेला पाच वर्षांचे दीर्घ सव्यापसव्य करावे लागले होते.

अझहर मसूद भारताच्या तुरुंगात खितपत काही वर्षे पडलेला होता. त्याला दोषी ठरवून फाशी देण्याचे काम आपल्याला साधता आले नाही; पण क्षणार्धात प्रवासी विमानाचे अपहरण करून प्रवाशांनाच ओलिस ठेवत काही तासांत त्याच्या सहकार्‍यांनी त्याची सुखरूप मुक्तता करून दाखवली होती. कारण, जिहादी घातपाती वा अतिरेकी यांच्यात चर्चेला जागा नसते आणि चर्चेपेक्षा परिणामांना प्राधान्य असते. उलट जगातल्या कुठल्याही देशात प्राधान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला नसून कायद्याच्या शब्दाला व तरतुदींना प्राधान्य आहे. मग, त्याचाच लाभ उठवित दहशतवाद जगभर बोकाळला. जणू अशा जिहादी घटना स्थानिक पातळीवरचे किरकोळ गुन्हे बनून गेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर दिल्ली, मुंबईतून काही जणांना पोलिसांनी पकडल्याने धोका संपणार कसा? गुन्हेगाराला शिक्षेचा धाक नसल्यास गुन्ह्यांचा बंदोबस्त होऊ शकत नाही आणि नागरिकांचे जीवन सुरक्षित होऊ शकत नसते.

शिवाय अशा बाबतीत फौजेपेक्षाही मरायला उतावळे झालेले आत्मघातकी मूठभर अवघ्या जगाला भारी पडत असतात. त्यात एका बाजूला कायदा, प्रशासन गुंतून पडत असते आणि दुसर्‍या बाजूला युद्ध करूनही त्यात सेनादलाला दूर ठेवले जाते. बिचारा सामान्य नागरिक असुरक्षित होऊन जातो. सगळे जनजीवनच अस्थिर होऊन जाते. या ताज्या घटनेने असे अनेक प्रश्न उपस्थित करताना जुना अनुभव पुन्हा डोके वर काढत आहे का, ही शंकाही उपस्थित झाली आहे. ऐन सणासुदीला अशा घातपाताच्या घातक योजना पकडल्या वा उधळल्या गेल्या म्हणजे धोका संपत नाही. गुन्हेगार मोकाट आणि सामान्य माणूस मात्र कोंडवाड्यात ही स्थिती संपणे गरजेचे आहे.

Back to top button