लवंगी मिरची : फक्त बायकांनीच का? | पुढारी

लवंगी मिरची : फक्त बायकांनीच का?

निघालीस कॉलेजला?
हो बाबा. मघापासून तिसर्‍यांदा हाच प्रश्न विचारताय तुम्ही!
हो का? असेल बुवा. तरी चौथ्यांदा विचारतो. कॉलेजला निघालीस? हे असे कपडे घालून?
होच की. कॉलेजला निघाले, संपलं. अजून आमच्या कॉलेजमधले गुरुजी नीट कपडे घालून आमच्यासमोर या, तरच शिकवू, असं म्हणायला लागले नाहीयेत. तुम्हाला तरी माझ्या कपड्यांचा काय एवढा प्रश्न आहे हो?
मला वाटतोय खरा. शेवटी आज तू विद्यार्थिनी आहेस. हा असा स्कर्ट, असा बिन बाह्यांचा टॉप की सदरा, हे कपडे मुलींना शोभतील कॉलेजमध्ये?
त्यात एवढं चालण्या, न चालण्यासारखं काय असतं बाबा? अंगभर कपडे घातलेत ना?
हो बये. तेवढे उपकार केलेस खरे माझ्यावर. पण तरी एवढा खोल गळा, एवढा लांडा स्कर्ट हे कॉलेजमध्ये पोरीबाळींना शोभतं का, हा प्रश्न पडतोच.
असे त्या त्या जागेनुसार वेगवेगळे कपडे असतात का बाबा?
असायला हवेत. देवळात जाणार्‍यांचा पारंपरिक पेहराव हवा. देशभरासाठी बातम्या वाचणार्‍या सुंदरीने देशभर मान्यता मिळालेला, आपल्याकडला पेहराव घालायला हवा.
हे अप्रिय विधान सुप्रियाताईंनी केलंय बाबा. उगाच ते स्वतःच्या रेशनकार्डावर घेऊ नका.
राहिलं. कार्ड कोणतंही असो, कपड्यांचं टेन्शन येणार नाही, एवढं बघायला हवंच तुम्ही मुलींनी.
अच्छा, म्हणजे मुलांनी काहीही कपडे घातले किंवा न घातले तरी काही फरक पडणार नाही, असंच ना?
छे छे! मुलगे म्हटले तरी त्यांनी अंगावर कोणतेच कपडे न घालणं हा काही पर्याय नाहीये.
नशीब, तिथे तरी त्यांना सवलत दिली नाहीये.
तू उगाच ह्याला ‘मुली विरुद्ध मुलगे’ असा रंग देऊ नकोस बरका.
वेगळा रंग द्यायला कशाला हवाय? तसा पक्का रंग तर पहिल्यापासून आहेच ना? दादाने यडपटासारखे कानात डूल घातले, त्याला बोललात का काही?
नाही, म्हणजे त्या यडपटाने कानात डूल, हातात कडे वगैरे घालणं मला फार आवडतंय असं काही नाही; पण त्याची गोष्ट वेगळी.
करेक्ट. त्याची गोष्ट वेगळी. म्हणून तर भिडे गुरुजी कोणाही बाप्याला ‘धोतर नेसून ये, मग माझ्याशी बोल’ असं म्हणाले नाहीत. किंवा सुप्रियाताईंनी बातम्या वाचणार्‍यांना कपाळावर गंधाचा ओम काढायला सांगितला नाही.
त्यांचं सोड गं. एकेकाची आवड असते.
हे पण करेक्ट आहे. मग हा असा स्कर्ट, ब्लाऊज घालणं ही माझीही आवड असू शकते की नाही?
लोकांच्या नजरा असतात बये. आपल्या पारंपरिक साडीत तर जास्त छान दिसशील राणी.
मग, कर काय करायचं ते, लाव दिवे हवे तेवढे.
असं वैतागून म्हणू नका बाबा. समजून घ्या.
आता तेवढंच राहिलंय बये! मला आपलं वाटतं, आपली संस्कृती तू बुडवायला निघालीस असं कोणी म्हणू नये.
संस्कृती ही फक्त बायकांनी टिकवायची गोष्ट आहे का बाबा? सगळी ओझी फक्त बायकांनीच वाहावी का? बायका, पुरुष सर्वांना सारखे नियम लावा बाबा, मग सगळे खरे आनंदात राहातील.

Back to top button