राजस्थानातील सुंदोपसुंदी | पुढारी

राजस्थानातील सुंदोपसुंदी

राजस्थानात भाजप आणि काँग्रेस या दोन्हीही पक्षांना अंतर्गत गटबाजीने ग्रासले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील कार्यकर्ते गोंधळलेले आहेत. भाजपमध्ये अंतर्गत संघटितपणाचा अभाव दिसून आल्याने केंद्रीय नेतृत्वाने निर्णयांची दोरी आपल्या हातात घेतली आहे. काँग्रेसमध्येही मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात खुर्चीसाठी सतत संघर्ष सुरूच आहे. मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यानंतरसुद्धा राजस्थानात काँग्रेसमध्ये खांदेपालट केले जाईल याबाबत शक्यता कमीच दिसते.

राजस्थानचे राजकारण वेगाने बदलत आहे. एकीकडे 2023 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शंखनाद केला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसनेसुद्धा दंड थोपटले आहेत. एकप्रकारे राजस्थानात राजकारणाला आखाडड्याचे स्वरूप आले आहे. राजस्थानात दोन्ही पक्षांत गटबाजी दिसून येत आहे. भाजपमध्येही गटबाजीने संघर्षाचे रूप धारण केल्यामुळे शेवटी पक्षनेतृत्वाला संघटित होण्याचे निर्देश द्यावे लागले. काही दिवसांपूर्वी भाजपची कोअर कमिटी बोलाविण्यात आली होती. अनेक गटांत विभागलेल्या पक्षाला एकत्रित आणणे हा यामागचा हेतू होता. खरे तर राजस्थानात सध्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा गट शक्तिशाली असल्याचे दिसून येते. धार्मिक यात्रेच्या माध्यमातून त्या वातावरणनिर्मिती करीत आहेत.

आगामी काळात मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या गटाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांची पक्षावरील पकड कमकुवत होत चालली असल्याचे दिसून येते. ते प्रयत्न खूप करीत असले तरी एकाकी पडत आहेत. पक्षांतर्गत गटबाजीमुळे राजस्थानातील भाजप कार्यकर्ते गोंधळलेल्या स्थितीत आहेत. एकीकडे वसुंधरा राजे आहेत, तर दुसरीकडे गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुन मेघवाल, तर तिसरीकडे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आपल्या गटाचा नेता पुढे आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

भाजपचे नेते 2023 मध्ये सत्ता येण्याचा दावा एकाच आधारावर करीत आहेत तो म्हणजे, राजस्थानातील जनतेची सत्तापालटाची परंपरा. त्यानुसार सध्या काँग्रेस सत्तेवर असल्यामुळे 2023 मध्ये भाजपचे सरकार येणार, असे त्यांचे मत आहे; पण केंद्रीय पक्षनेतृत्व राजस्थानातील घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याने त्यांनी सर्वाधिकार आपल्या हातात घेण्याचा निर्णय घेतलाआहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच राजस्थानात सभा घेतली. मेवाडच्या आदिवासी क्षेत्रात राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा पोहोचण्यापूर्वीच काही दिवस अगोदर पंतप्रधान मोदी पक्षासाठी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत.

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा 7 डिसेंबरला मध्यप्रदेशच्या सीमेवरून झालावाडमार्गे राजस्थानात प्रवेश करेल. राजस्थानात ही यात्रा 20 दिवस चालू राहील. त्या दरम्यान राहुल गांधी यांच्या चार सभा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसबाबत बोलायचे झाल्यास भाजपच्या तुलनेत काँग्रेस मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येईल. मात्र, काँग्रेसमध्येही गटबाजी आहेच. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात खुर्चीसाठी सतत संघर्ष सुरूच आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्यातील द्वंद्व उघडच आहे. मात्र, राजकीय वारे गेहलोत यांच्या दिशेने असल्याचे दिसून येते. खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यानंतरसुद्धा राजस्थानात काँग्रेसमध्ये खांदेपालट केली जाईल याबाबत शक्यता कमीच दिसते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांच्या मते, संघटनेत 19 लाख कार्यकर्ते आहेत. पक्ष बूथ स्तरावर अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष आणि मंडल अध्यक्षापासून जिल्हास्तरापर्यंत कार्यकारिणी बनली आहे. पक्ष आमदारपदाचे चेहरे बदलण्याच्या विचारात आहे.

खर्गे काँग्रेस अध्यक्ष बनण्यामागे राजस्थानातील घटनाच कारणीभूत आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष होतील, हे जवळजवळ स्पष्ट झाले होते. मात्र, त्यांना राजस्थानची खुर्ची सोडायची नव्हती. नंतर राजस्थानातील काँग्रेस आमदारांनी राजीनामास्त्र उगारल्यानंतर हे घटनाचक्र उलटे फिरले आणि गेहलोत अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर गेले. गेहलोत अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतरच खर्गे यांचे नाव पुढे आले आणि अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव निश्चित झाले. या संपूर्ण प्रकरणामुळे सोनिया गांधी गेहलोत यांच्यावर नाराज होत्या आणि या कारणामुळेच गेहलोत यांना सोनिया गांधी यांच्या भेटीदरम्यान माफी मागावी लागली होती.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेहलोत यांनी उघडपणे खर्गे यांचे समर्थन केले. सुरुवातपासून ते याबाबत उघडपणे बोलत होते की, अनुभवाला पर्याय नाही. खर्गे यांचा मोठा अनुभव पाहता त्यांच्याच गळ्यात काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पडावी, असे गेहलोत यांचे मत होते. याबाबत एक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता. त्यात ते उघडपणे खर्गे यांना मत देण्याबाबत सांगत होते. या व्हिडीओेमुळे वादाला तोंड फुटले होते. अशा स्थितीत आता खर्गे हे गेहलोत यांच्या विरोधात जातील असे वाटत नाही.

गेहलोत यांना राजकारणातील जादूगार मानले जाते. त्यांना याबाबत पूर्ण माहिती आहे की, कोणता डाव केव्हा खेळला पाहिजे. जसे खर्गे यांचे नाव अध्यक्षपदासाठी आल्यानंतर त्यांनी उघडपणे आपले समर्थन खर्गेंना जाहीर केले. खर्गे अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेहलोत सर्वात पुढे होते. सचिन पायलट यांनीसुद्धा खर्गे यांना शुभेच्छा देताना म्हटले की, आता आम्ही एकत्रित सर्व संकटांचा सामना करणार. अशीही चर्चा होती की, सचिन पायलट यांना पक्ष नेतृत्वाकडून मुख्यमंत्रिपद दिले जाण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, गेहलोत आणि त्यांचे समर्थक अजूूनही पायलट यांना विरोध करत असल्याचे दिसून येतात. खर्गे यांच्या राजकीय गुणांची पहिली परीक्षा राजस्थानमध्येच होणार आहे.

अशोक गेहलोत यांच्या समोर आता राजस्थानमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेची तयारी करण्याचेही आव्हान आहे. दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि मुकुल वासनिकसहित पक्षाच्या अनेक नेत्यांनी गेहलोत यांच्याशी ‘भारत जोडो’ यात्रेबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेसने ‘भारत जोडो’ यात्रेची तारीख घोषित केली आहे. मात्र, विस्तृत कार्यक्रम अजून ठरवलेला नाही. ‘भारत जोडो’ यात्रा 6 ते 23 डिसेंबर म्हणजे जवळपास 18-20 दिवस राहणार आहे. पुढील दोन महिने हिंदी भाषिक पट्ट्यातून जाणार्‍या या यात्रेच्या मार्गात राजस्थान एकमेव राज्य काँग्रेसशासित आहे. या यात्रेच्या मार्गात सचिन पायलट यांचा प्रभाव असलेले दौसा, सवाई माधोपूर, अलवर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांना सहभागी करून येणार्‍या निवडणुकांचा शंखनाद केला जाऊ शकतो.

– विनिता शाह

Back to top button