लवंगी मिरची : होर्डिंग्जचा इंगा | पुढारी

लवंगी मिरची : होर्डिंग्जचा इंगा

का हो आबुराव? दोन दिवस आला नाहीत आपल्या नेहमीच्या कट्ट्यावर?
अपघात झालावता.
कोणाला?
मला!
अपघात? तुम्हाला? काय हो हे? ह्या वयात पाऊल वाकडं पडलं की काय?
पाऊल नाही, स्कूटरचं चाक वाकडं पडलं.
नीट सांगा हो. आपली काय हाडांची तोडमोड करून घ्यायची वयं आहेत का आता?
फार काही नाही झालं. फक्त फ्लेक्स आडवा आला.

तुम्ही विमान चालवत होतात का? उंचावर उभारलेला फ्लेक्स आडवा यायला मुळात तुम्हीसुद्धा हवेत असायला हवे ना!
हवेत नव्हतो, रस्त्यावर स्कूटरवरच होतो, तसा स्पीडही फारसा नव्हता. अंधार मात्र झाला होता. त्यामुळे फ्लेक्स किंवा होर्डिंगचा जमिनीत पुरलेला स्टँड मला दिसला नाही. रस्त्यात एकदम त्याच्यावर आदळायची वेळ आली तेव्हा गर्रर्रकन स्कूटरचं पुढचं चाक वळवलं मी. त्या धक्क्याने स्वतःच पडलो!
अच्छा, म्हणजे फ्लेक्स उतरवला; पण जमिनीत रोवलेला त्याचा स्टँड उचकवायचा राहिला, असंच ना?
अगदी असंच. सध्या शहरात चहुबाजूंनी हेच तर चाललंय, होर्डिंगं उभारायला नाक्यानाक्यांवर रस्त्याला खणून ठेवायचं, त्यात लोखंडी स्टँड पुरून ठेवायचे, चौकटी लावायच्या; पण होर्डिंगचं काम संपल्यावर असली टेकणं उकरून काढायचे कष्ट कोण घेणार?
हो बुवा. आजकाल ठिकठिकाणचा हा उच्छाद फार वाढलाय खरा. आता निवडणुकांपर्यंत रस्त्यांवरून जाणार्‍या येणार्‍यांची काही खैर नाही. कुठे कोणा भाऊंचं अभीष्टचिंतन, कोणा अण्णा-दादांना शुभेच्छा, कोणा ताई-माई-आक्कांना अभिवादन असा हाकारा उठणारच रस्तोरस्ती.

जेवढी जागा मोक्याची तेवढी जास्त गर्दी होर्डिंग, फ्लेक्सची. एरवी जाहिरात कशी होणार?तीही फुकटात?
त्यांची जाहिरात होते. आपली मात्र वाहतूक कोंडी होते. अनेक नाक्यांवर रस्त्यांच्या अगदी डावीकडची वळणं मुळी घेताच येत नाहीत. तिथे अशाच अडगळी ठोकलेल्या, पुरलेल्या असतात. जरा लांबचा वळसा घालून जावं तर वेळ लागतो, वाहतूक कोंडी होते.
पण काय हो, वाहत्या रस्त्यावर कोणीही, केव्हाही, कुठेही असे खांब रोवू शकतं? चौकटी उभारू शकतं? रस्ते ही खरी तर सार्वजनिक मालमत्ता असणार ना?

असेना! खरं म्हणजे होर्डिंगं, फ्लेक्स उभारायला वाहतूक पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागते. ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागतं. जितके दिवस आपली जाहिरात झळकवायची त्याच्या प्रमाणात भाडं भरावं लागतं; पण असं एवढं करण्यापेक्षा बेकायदा फ्लेक्स उभारून टाकणं लोक पत्करतात. फुकटात जाहिरात होते.
नाहीतरी पेपरच्या जाहिरातींचे दर परवडण्याच्या पल्याड गेलेत आता.
मग काय हातपाय मोडले तर त्यांच्या उपचाराचे दर परवडणारे आहेत का?
तो विचार रस्त्यावरून जाणार्‍यांनी करावा. अनेकदा काही फ्लेक्समुळे रस्त्यांवरच्या पाट्या झाकल्या जातात. धड वाचता येत नाहीत. काही फ्लेक्सवरच्या प्रखर दिव्यांमुळे वाहन चालवणार्‍याच्या डोळ्यावर अंधारी येते. बिचकायला होतं त्याला!

मग लोक तक्रार करतात, तेवढ्यापुरती काही कारवाई होते. पालिका अधिकारी नोटिसा वगैरे बजावतात. दंड ठोठावतात. तिकडे राजकीय दबाव आला की, लगेच सारं कसं शांत शांत होतं. नावापुरता आकाश चिन्ह आणि परवाना विभाग असतो सगळीकडे! पण रस्त्यांचा असा बेकायदा वापर थांबण्याची चिन्हं काही दिसत नाहीत.
मग आमच्यासारख्यांनी काय करावं?
सध्या तरी तुम्ही दुखर्‍या पायाला आराम द्यावा. असं करा, दोन-तीन दिवस तुम्ही कट्ट्यावर यायचा त्रास घेऊ नका. जमेल तसे आम्हीच येत जाऊ तुमच्याकडे!

– झटका

Back to top button