लवंगी मिरची : बोलाचीच खिचडी! | पुढारी

लवंगी मिरची : बोलाचीच खिचडी!

स्वयंपाक झालाय ना गं?
आताशी सकाळचे बारा तर वाजताहेत, एवढी काय घाई आहे जेवणाची?
मला एकवेळ उशीर चालेल गं; पण मुलं येतील ना शाळेतून? त्यांचं घरी परत आल्यापासून ‘भूकभूक’ सुरू होईल.
शाळेत खिचडी मिळते ना त्यांना खायला? तरी घरी येईपर्यंत एवढी भुकेजलेली कशी असतात कार्टी?
खिचडी मिळते म्हणे; पण कशी आणि केवढी मिळते, ते विचारू नकोस.
आपल्या बकासुरांना केवढीही मिळाली तरी कमीच वाटत असेल बहुतेक. जळली ती पोषण शक्ती, नुसतं नाव मोठं आणि पोरं सदैव वखवखती!
आता तूच बघ अन् काय! मागे साधं ‘शालेय पोषण आहार योजना’ असं रोखठोक नाव होतं. ते बदलून राज्य सरकारने पोषणशक्ती वगैरे असं मोठं भरघोस नाव देण्याची युक्ती केली. हल्ली बरंका, आपल्याकडे कशालाही पी. ए. जोडणं फार आय. एम. पी. होत चाललंय!
ते काही करा हो, वाढीच्या वयातल्या पोरांना द्यायचं ते खाणं पोटभर तर असू द्या.
एका मुलामागे अडीच रुपये एवढी बुलंद रक्कम ठेवली, तर चिमणीच्या मुलाचं, आपलं, पिलाचं तरी, पोट भरेल का सध्याच्या दिवसांत?
काय सांगता? एका मुलामागे अडीच रुपये? काहीतरीच काय?
खोटं नाही सांगत. प्रत्येक मुलामागे, पहिली ते पाचवीपर्यंत अडीच रुपये आणि सहावी ते आठवीपर्यंत चार रुपये असं अनुदान मिळतं म्हणे या योजनेत!
अहो, आताशा चणेफुटाणेसुद्धा येत नाहीत अडीच रुपयांमध्ये. खिचडी कसली करताय?
त्यातच काहीतरी करून बसवा म्हणताहेत शेवटी!
आले सरकारच्या मना, तेथे कोणाचे चालेना!
का म्हणे? हे ठरवणारे सरकारी अधिकारी स्वतः बाजारात जात नसतील का कधी? आज बाजारभाव काय चाललेत हे माहीत नसेल त्यांना?
काय माहिती? त्यांनी फर्मान काढलंय, एका विद्यार्थ्यामागे 88 पैशांच्या तेलात खिचडी बनली पाहिजे.
कर्म माझं. एक लिटर खाद्यतेलाची पिशवी दोनशे रुपयांच्या घरात गेलीये सध्या! 88 पैशांत काय पाच थेंब तेल येणार आहे?
जे येईल ते! शंभर मुलांच्या खिचडीला सत्तर-ऐंशी रुपयांचं तेल पुरवा असं म्हणताहेत ते. शेवटी असं नुसतं दुरून तेल दाखवून काय मोठी चव आणि पोषण येणार आहे त्या खिचडीला?
पोरांसाठीचे डाळ, तांदूळ, भाजीपाला, मसाले या सर्वांनाही असंच कमाल बजेट दिलंय. वरती आशीर्वादही दिलेत, खा लेको, पोटभर खा, धष्टपुष्ट व्हा. आता फक्त मूठभर कच्चे डाळ-तांदूळ मुलांना द्यायचे राहिले असतील!
वरती म्हणायला सगळे मोकळे, मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे. असल्या भिकेच्या डोहाळ्यांमधून कसली संपत्ती निपजणार आहे कोण जाणे?
आजपर्यंत आपण बिरबलाची खिचडी वगैरे ऐकलंय, वाचलंय. त्याऐवजी आता दुर्बलाच्या खिचडीबद्दल बोलावं लागणार बहुतेक.
त्यापेक्षा मला वाटतं, बोलाचीच खिचडी, असं म्हणावं. बोलाचीच खिचडी, बोलाचीच मदत, तेणे तृप्त संतुष्ट, कोण होईल!

– झटका

Back to top button