लवंगी मिरची : ऐन दिवाळीत उपासमार | पुढारी

लवंगी मिरची : ऐन दिवाळीत उपासमार

मग काय भावजी? दिवाळी आनंदात गेली ना?
हं. गेलीच म्हणायची. एक दिवस सोडून. त्या दिवशी मात्र ऐन दिवाळीत उपासमार झाली.
उपासमार? कशामुळे? घरात तर डबे भरभरून मेवामिठाया असणार.
तरी उपासमार झालीच. तब्बल 96 मिनिटं सलग व्हॉट्सअ‍ॅप बंद होतं ना.
अरे देवा. ती तसली उपासमार होय?
तसली काय म्हणता वहिनी? दिवाळीच्या आनंदावर विरजण घातलं, 25 ऑक्टोबरचा दिवस बरबाद केला ना तिने?
जरा कुठे व्हॉट्सअ‍ॅप नाही, म्हणून लगेच अख्खा दिवस बरबाद?
दुपारी 12.30 ला सर्व्हर डाऊन झाला. तो सुरू करेकरेपर्यंत दोन वाजून सहा मिनिटं झाली. एवढा वेळ माणसं नुसती डोक्याला हात लावून बसलेली.
माणसं म्हणजे तुम्ही एकटेच ना?

असं काय करता वहिनी? जगभरात निदान दोन अब्ज लोक व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. आपल्या जगभरातल्या मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात राहातात.
अच्छा! म्हणजे एखाद्या खास मैत्रिणीचा संपर्क होऊ शकला नाही, म्हणून एवढी चिडचिड चाललीये होय?
तसं काही नाहीये. मला मुळात अशी खास मैत्रीणच नाहीये. अच्छा, म्हणजे आपल्याला मैत्रीणच नसावी ह्याचा राग येतोय स्वतःशी?
जाऊ द्या. आमच्या भावना तुम्हाला समजत नाहीयेत किंवा समजून घ्यायच्या नाहीयेत. त्या व्हॉट्सअ‍ॅप नावाच्या खेळण्यात एवढ्या भावना गुंतल्या आहेत तुमच्या?

नुसतं खेळणं नाहीये ते. माणसांमधला सुंदर दुवा आहे तो. कोणाचा वाढदिवस आहे, कोणाचं प्रमोशन झालंय, कोण गावाला जातंय ह्या सगळ्यांची बित्तंबातमी संबंधितांना देत असतं ते व्हॉट्सअ‍ॅप. तेही ताबडतोब आणि विनामूल्य.
पण काय हो? हे तुमचं लाडकं व्हॉट्सअ‍ॅप नसताना म्हणजे हा दुवा नसताना माणसं व्यवहार करत होतीच ना?
होती की. एकमेकांबद्दल माहिती घेत होती. गरजेप्रमाणे एकमेकांचं कौतुक, सांत्वन वगैरे करत होतीच.जरा विलंबाने करत असतील, एवढाच फरक.

शिवाय आता जे सारखं एकमेकांशी बोलता, एकमेकांना प्रत्येक गोष्ट कळवता ते तरी खरंच एवढं गरजेचं असेल का हो? म्हणजे मी सकाळी जेवणात कोबीची भाजी खाल्ली, किंवा आज भांडीवाली न आल्याने माझा मूड गेलाय, हे काय जगाला कळायलाच हवंय का?

आम्हाला आवडतं तसं; पण त्यावर वेळ किती जातो तुमचा? माध्यमांवर खूप सारा वेळ वाया जातोय की काय तुमचा, असा प्रश्न पडतो मला एकेकदा. आम्हाला सवय लागलीये त्याची. ते बंद पडलं तर चुकल्यासारखं होतं आम्हाला.

नुसती सवय नाहीये ही, व्यसन आहे. आणि कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाणं वाईटच. ही उपासमार आहे की, माध्यमांसाठीची वखवख आहे, ह्याचा विचार करा आणि वेळीच ह्यापासून दूर सरा भावजी. बघतो. आधी हा तुमचा विचार व्हॉट्सअ‍ॅपवर टाकतो आणि सगळे काय म्हणतात, ते बघतो.’

– झटका

Back to top button