साखर उत्पादनासह निर्यातीत भारताची आघाडी | पुढारी

साखर उत्पादनासह निर्यातीत भारताची आघाडी

यंदा साखर उत्पादन आणि निर्यातीत भारताने आघाडी घेतली आहे. जगभरातील साखर उत्पादक आणि निर्यातदार देशांना मागे टाकण्याचा विक्रम भारताने केला आहे. गेल्या पाच वर्षांत सरकारने साखर उद्योगाला आर्थिक संकटातून बाहेर काढले आहे. विशेष म्हणजे केवळ साखर निर्यातीतून देशाला सुमारे 40 हजार कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले.

यंदाचा हंगाम भारतीय साखर उद्योगासाठी अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरला आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक म्हणून उदयास आला आहे. यंदा देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असून सध्या भारत जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यातदार देश बनला आहे. या हंगामातील ऊस उत्पादन, साखर उत्पादन, साखर निर्यात, ऊस खरेदी, उसाची थकबाकी आणि इथेनॉल उत्पादनाच्या सर्व नोंदींमधून भारत आश्वासक प्रगती करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे जागतिक साखर उत्पादनात भारताने आघाडी घेताना ब्राझीलला मागे टाकले आहे.

भारताने साखर उत्पादनात मुसंडी मारताना 355 लाख टन साखरेची निर्मिती केली आहे. चांगल्या पावसामुळे मागील हंगामात भारतात उसाचे उत्पादन बहुतांशी राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत दीडपट झाले. भारतीय साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीलाही प्राधान्य दिले असले तरी ब्राझीलच्या तुलनेत ते कमी होते. यामुळे भारतातील साखर उत्पादन वाढतच राहिले. येथे नोंद करण्यासारख्या महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. उत्तर प्रदेश दरवर्षी साखर उत्पादनात देशात अग्रेसर असतो, मात्र यंदा उत्तर प्रदेशला मागे टाकत महाराष्ट्राने हे स्थान मिळविले आहे. महाराष्ट्राच्या विक्रमी उत्पादनामुळेच देशातील एकूण साखर उत्पादनाचा आकडा 360 लाख टनांहून अधिक झाला आहे.

2021-22 या आर्थिक वर्षात देशात विक्रमी 5 दश लक्ष टन उसाचे उत्पादन झाले. यापैकी सुमारे 3,574 लाख टन उसाचे साखर कारखान्यांनी गाळप करून सुमारे 3,584 लाख टन साखर म्हणजे सुक्रोज तयार केली. यापैकी 35 लाख टन साखर इथेनॉल तयार करण्यासाठी वापरली गेली आणि 359 लाख टन साखर ही साखर कारखान्यांनी तयार केली.

साखरेचे विपणन हे ऑक्टोबर ते सप्टेंबरपर्यंत चालते. मागील वर्षांची तुलना केल्यास साखर निर्यातीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. भारताची साखर निर्यात 2018-19 मध्ये 38 लाख टन होती. 2019-20 मध्ये 59 लाख टन तर 2020-21 च्या विपणन वर्षात 70 लाख टन एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली. तसेच भारताचे साखर उत्पादन सप्टेंबरमध्ये संपलेल्या 2021-22 च्या विपणन वर्षात 57 टक्क्यांनी वाढून 109.8 लाख टन झाले. जगभरात साखर उत्पादनचा विचार केल्यास, 2022-23 च्या गळीत हंगामात जगभरात सुमारे 182 दशलक्ष टन साखर उत्पादन झाले आहे. यंदा जगभरातसुद्धा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे.

जगभरात भारतीय साखरेच्या निर्यातीचा विचार करता असे स्पष्ट दिसून येते की, भारताला ब्राझीलच्या साखरेशी स्पर्धा करावी लागते. जागतिक साखर उत्पादनात आघाडीवर असलेला ब्राझील जागतिक साखरेच्या बाजारातील अव्वल क्रमांकाचा देश आहे. जागतिक बाजारात ब्राझीलची साखर मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध असल्यास साखरेचे दर दबावाखाली येतात. मागील पाच वर्षांत ब्राझीलमधील साखर उत्पादन कमी-अधिक प्रमाणात झालेले आहे. 2020 मध्ये 757.12 दशलक्ष टन ऊस उत्पादनासह ब्राझील जगातील सर्वात मोठा ऊस उत्पादक देश ठरला होता. 2015-16 मध्ये अंदाजे 34.7 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले होते तर यंदा ब्राझीलमध्ये 35.35 दशलक्ष टन साखर उत्पादन झाले आहे. जगातील सुमारे 110 हून जास्त देशांमध्ये साखर उत्पादन केले जाते. एकूण साखरेपैकी जवळपास 80 टक्के साखर उसापासून तर 20 टक्के साखर बीटपासून तयार केली जाते. मात्र युक्रेन-रशिया युद्धामुळे बीटपासून तयार होणार्‍या साखर उत्पादनात घट झाली.

जगभरातील देशांचा आढावा घेतल्यास भारत, ब्राझील, युरोपियन युनियन, थायलंड आणि चीन हे प्रमुख साखर उत्पादक देश आहेत. एकूण जागतिक साखर उत्पादन 180 दशलक्ष टन आहे. 2019-20 मध्ये 166.58, 2020-21 मध्ये 181.18, 2021-22 मध्ये 181.18 आणि 2022-23 मध्ये 182.89 दशलक्ष टन उत्पादन झाले आहे. उत्पादक देशांचा विचार करता यंदा भारतात 36.88, ब्राझीलमध्ये 35.35, युरोपियन युनियनमध्ये 16.51, थायलंडमध्ये 10.23, चीनमध्ये 9.6, अमेरिकेत 8.37 आणि पाकिस्तानमध्ये 7.14 दशलक्ष टन उत्पादन झाले आहे.

दरवर्षी भारतातून 70 ते 80 लाख टन साखरेची निर्यात होते. यंदा निर्यातीत विक्रमी वाढ होऊन 110 लाख टन साखर भारताने निर्यात केली आहे. भारताने साखर निर्यातीत आघाडी घेतली त्यामागची पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. 2021-22 मध्ये साखर निर्यातीच्या बाबतीत केंद्र सरकारने खुले धोरण स्वीकारल्याने जगात साखर निर्यातीत भारत मोठा निर्यातदार ठरला. यामुळे साखर कारखान्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले. शिवाय मोठ्या निर्यातीतून परकीय चलनातसुद्धा वाढ झाली. साखरेच्याबाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच सुरू ठेवावे, अशी मागणी महाराष्ट्राने केली आहे. कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध असून यामुळे कारखान्यांना मर्यादा येतील, असे म्हणणे आहे.

साखर उत्पादन वाढल्याचा चांगला परिणाम निर्यातवाढीवरही झाला. 2017-18 ला केवळ 6 लाख टन असणारी निर्यात 2018-19 ला 38 लाख टन, 2019-20 ला 59 लाख टन, 2020-21 ला 70 लाख टन होती, ती वाढून 2021-22 मध्ये 110 लाख टनांपर्यंत गेली आहे. निर्यातीने आणि कारखानदारांना स्थानिक पातळीवर दर नसतानाही आधार दिला. शेतकर्‍यांची उसाची थकबाकी हा मुद्दासुद्धा यानिमित्ताने हाताळला गेला पाहिजे. विपणन वर्ष 2021-22 (ऑक्टोबर-सप्टेंबर) अखेरीस शेतकर्‍यांची उसाची थकबाकी 6000 कोटी रुपये होती. साखर कारखान्यांनी 1.18 लाख कोटी रुपयांच्या एकूण थकबाकीपैकी 1.12 लाख कोटी रुपये आधीच शेतकर्‍यांना दिले आहेत. गेल्या पाच वर्षांत सरकारने वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे उद्योगाला आर्थिक संकटातून बाहेर काढले आहे. भारतीय साखर उद्योगाने आंतरराष्ट्रीय किमती आणि भारत सरकारच्या धोरणाच्या पाठिंब्याने हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे केवळ साखर निर्यातीतून देशाला सुमारे 40 हजार कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे.

– नवनाथ वारे, कृषी अभ्यासक

Back to top button