लवंगी मिरची : नाईलाजपर इलाज | पुढारी

लवंगी मिरची : नाईलाजपर इलाज

दिवाळी संपली बरं का चिरंजीव. आता जरा अभ्यासाकडे बघा.
कुठला अभ्यास बाबा?
अरेरे, तू शिकतोयस, विद्यार्थी आहेस, हेही विसरायला झालंय ना तुला?
तसं नाही बाबा. पण मागच्या वर्षाचा माझा अभ्यास तर करून झालाय. वार्षिक परीक्षेतले धो-धो मार्क हा पुरावा आहे त्याचा आणि यंदाचा अभ्यास तर काही अजून सुरूच झाला नाहीये.
सोन्या, नोव्हेंबर लागायला आला की रे. चालू शैक्षणिक वर्षाचं पहिलं सत्र, पहिली टर्म संपलीसुद्धा. अजून अभ्यास सुरू झाला नाही, असं कसं म्हणतोस तू?
खरंच सांगतोय बाबा. अहो, पंधरा सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया म्हणजे नेहमीच्या अ‍ॅडमिशन्स चालल्या होत्या. आम्हाला कॉलेजमध्ये कुठे काय आहे, हे कळे कळेपर्यंत दिवाळी आली. हा काय आमचा दोष आहे?
दोष नसेल, पण पुढच्या चार महिन्यांमध्ये सगळ्या वर्षाचा अभ्यास कसा रे संपवणार तुम्ही? त्यात सहली येणार, संमेलनं भरणार, ‘रात्र थोडी आणि सोंगं फार’ असं होणार तुमचं.
त्यात बाहेर सगळा गलबला. माध्यमांचा धुमाकूळ.शांततेचं नाव नाही, अशी परिस्थिती.
इस नाईलाजपर क्या इलाज बाबा?
करता येतो. त्यातल्या त्यात उपाय, इलाज शोधता येतो, करता येतो. सांगली जिल्ह्यातल्या खेराडेवांगी ह्या छोट्या गावाचंच उदाहरण बघ ना.
खेराडेवांगी? अशा नावाचं गाव कुठे असतं का हो बाबा?
आहे. विट्याजवळ, कडेगाव तालुक्यात आहे. गाव छोटं पण प्रयत्न कौतुकास्पद आहे.
कुठलं तरी, काही तरी काय सांगता हो बाबा?
फार मौलिक आहे, म्हणून सांगतो. तिथल्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रोज संध्याकाळी सात वाजता एक भोंगा, सायरन वाजवतात. पुढचा तासभर सगळं गाव चिडीचूप होतं. घराघरांतले लोक टी.व्ही. बंद करतात. मोबाईल, कॉम्प्युटर दूर सारतात. कोणीही कोणत्याही छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर काहीही बघत नाही, ऐकत नाही. सगळे वाचत बसतात.
काय म्हणतात ह्या फॅडला?
फॅड नाही रे. चांगला प्रयत्न आहे. ह्याला डिजिटल ब्लॅक आऊट म्हणतात. तांत्रिक स्तब्धता. रोज तेवढा एक तास लोकांनी फक्त वाचावं, अभ्यास करावा, विचार करावा. चिंतन-मनन करावं. तेवढं केलं तरी जनतेच्या खूप काही हाती लागेल, असा विचार आहे त्यामागे.
लोक कुठले ऐकताहेत असल्या जबरदस्तीला?
केली तिथेही सुरुवातीला काहींनी खळखळ. हा अन्याय आहे. हा छळ का सोसायचा? वगैरे विरोध केला, पण पुढे सगळ्यांना कळलाय ह्याचा फायदा.
विद्यार्थ्यांना तर मागे पडलेला अभ्यास भरून काढल्याचा अनुभव येतोय.
हे फक्त लहान गावातच जमेल बरं का!
अरे, असली खुसपटं काढण्यापेक्षा एकदा प्रयोग करून तर बघा. रोज एक तास अत्यंत मन लावून फक्त अभ्यास करायचा, वाचन करायचं. स्वस्त, सोप्पा उपाय. नाईलाजपर इलाज सापडेल बरं का यातूनही.

Back to top button