9/11 Attack : ‘9/11’हल्ल्याची दोन दशके; अजूनही हा खटला सुरू | पुढारी

9/11 Attack : ‘9/11’हल्ल्याची दोन दशके; अजूनही हा खटला सुरू

- आरती आर्दाळकर-मंडलिक, मियामी (फ्लोरिडा), अमेरिका

9/11च्या (9/11 Attack) हल्ल्यात अमेरिकन नागरिकांसोबत इतर सत्तर देशांतील सुमारे तीन हजार लोक मृत्युमुखी पडले. 1,106 मृतदेहांची ओळख पटली नव्हती. न्यूयॉर्क मेडिकल सेंटर तेव्हापासून डीएनएवरून मृतांची ओळख पटवून देण्याचे काम करीत आहे. चार दिवसांपूर्वीच दोन मृतांची ओळख पटली आहे. ‘9/11’ हल्ल्यातील (9/11 Attack) 19 दहशतवाद्यांपैकी पंधरा जण सौदी अरेबियाचे नागरिक होते. न्यूयॉर्क फेडरल कोर्टात सौदी अरेबिया सरकारविरुद्ध खटला त्यावेळीच दाखल केला होता. अजूनही हा खटला सुरू आहे.

एबीसी न्यूजनुसार हल्ल्याच्या दोन महिने आधी एफबीआय अधिकार्‍याने अल कायदा व ओसामा बिन लादेन यांनी मिळून अमेरिकेत नागरी विमाने वापरून हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता व त्यासाठी त्यांचे दोन सहकारी अरिझोना येथे हवाई प्रशिक्षण घेत असल्याचे वरिष्ठांना सांगितले होते; पण काही गोष्टी अस्पष्ट असल्याने त्यावर अंमलबजावणी झाली नाही. त्याकडे का दुर्लक्ष केले, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले आणि त्यात जगातील इतर देशांना सहभागी होण्याचे आवाहन दिले.

या हल्ल्यामुळे अमेरिकेन इंटेलिजन्स खात्याचे अपयश

या हल्ल्यामुळे अमेरिकेन इंटेलिजन्स खात्याचे अपयश आणि दुसरे विमानतळावरील सुरक्षितता व छाननी व्यवस्था कमकुवत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अमेरिकन विमानतळावरील सुरक्षितता वाढवली गेली. या हल्ल्यामुळे मुस्लिम लोकांवरील अमेरिकन लोकांचा रोष वाढला. आज वीस वर्षांनंतर हा संशय कायम आहे. अमेरिकेत येणार्‍यांवर व इथे पहिल्यापासून राहणार्‍या लोकांवर बारीक नजर ठेवण्यासाठी, गरज पडली तर त्यांचे फोन कॉल्स, मेसेज टॅप करण्यासाठी, कधीही संशय आला, तर त्यांच्या घरी छापा मारण्यासाठी पॅट्रिऑट अ‍ॅक्ट काढण्यात आला.

संबंधित बातम्या

7 ऑक्टोबर 2001 रोजी अमेरिकेने पहिल्यांदा अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या अड्ड्यांवर बॉम्बवर्षाव करून युद्धास सुरुवात केली; पण लादेन तिथून निसटला. दरम्यान, इराकच्या सद्दाम हुसेनकडे विध्वंसक सामग्री असल्याची व तो आपल्याला घातक असल्याची कुणकुण अमेरिकेला लागली. लगेच तिकडेही मोर्चा वळवून युद्धास सुरुवात झाली.

त्यावेळी 75 टक्के अमेरिकन नागरिक या दोन्ही ठिकाणी सैन्य ठेवण्यास तयार होती; पण पुढे अमेरिकन जनता लादेन व सद्दामला मारल्यानंतर सैन्य मागे घेण्यासाठी आग्रही राहिली. इराकमधील सैन्य मागे घेण्यात आले. अफगाणमधील सैन्य यावेळी प्रथमच 9/11 चे स्मरण करण्यासाठी मायभूमीत आहेत.

तालिबान पुन्हा सत्तेत आल्याने अमेरिकेवर पुन्हा हल्ला होण्याची लोकांना भीती  

लादेनला मारणे, दहशतवादावर नियंत्रण, अफगाण जनतेच्या मूलभूत गरजा भागविणे, शिक्षण व महिलांना स्वातंत्र्य मिळाल्यामुळे अमेरिकेचे वास्तव्य काही अंशी सफल झाले, असे म्हणता येईल; पण पिव रिसर्चनुसार 79 टक्के अमेरिकन लोकांना आपण या युद्धात अपयशी ठरलो, असे वाटते. तालिबान आता पुन्हा सत्तेत आल्यानंतर अमेरिकेवर पुन्हा हल्ला होण्याची भीती 89 टक्के लोकांना वाटत आहे.

2002 पासून अगदी अलीकडे 2017-18 पर्यंत लोकांनी राष्ट्राध्यक्ष व अमेरिकन संसदेने दहशतवादापासून देशाचे संरक्षण करणे याच मुद्द्याला प्राधान्य द्यावे, असा आग्रह धरला. सध्या दहशतवादापेक्षा गेल्या दोन वर्षांत थैमान घालणारा कोरोना लोकांना जास्त चिंताजनक वाटत आहे. बंडखोरीतून झालेले सहा जानेवारीसारखे हल्ले महत्त्वाचे वाटत आहेत.

बंदुकीचा सहज मिळणारा परवाना व माथेफिरूकडून होणारे मास शूटिंग यावर अमेरिकेच्या सरकारचे कोणतेही नियंत्रण वा उपाययोजनाही नाहीत. वर्णभेद, वातावरण बदल यामध्ये अमेरिकन जनता भरडली जात आहे.

या सगळ्या गोष्टी दहशतवादी हल्ल्यांपेक्षाही घातक ठरत असल्याचे जनमानसाचे मत झाले आहे. वीस वर्षांपूर्वी देशाची संसद वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण पणाला लावलेले त्या विमानातील नागरिक व सध्याची स्वतःला सत्ता मिळावी म्हणून स्वतःच संसदेवर हल्ला करणारी अमेरिकन जनता बघितली की, महासत्ता कशी बदलत चालली आहे, याचे प्रत्यंतर येते.

 

Back to top button