आता कामाला लागा! | पुढारी

आता कामाला लागा!

महाराष्ट्राच्या राजकारणात दसर्‍याचे राजकीय महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. इतके की, आणखी काही वर्षांनी विजयादशमी हा पारंपरिक सण असल्याचा विसर पडून हा राजकीय मेळाव्याचा दिवस असल्याचेच नव्या पिढीला वाटू लागेल की काय? यादिवशी ग्रामदैवताला, एकमेकांना सदिच्छांचे सोने द्यायला जाण्याऐवजी कुठल्या मेळाव्याला जायचे, याचेच नियोजन लोक करू लागतील. वृत्तवाहिन्या मेळावे घेणार्‍यांना वेळा ठरवून देतील, जेणेकरून त्यांना सगळ्यांचे थेट प्रक्षेपण करून टीआरपी कमावता येईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पूर्वापार चालत आला आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा 56 वर्षे सुरू आहे. काही वर्षांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही भगवान गडावर मेळावा सुरू केला. यंदा शिवसेनेतून फुटून निघालेल्या एकनाथ शिंदे यांनीही दसरा मेळावा घेऊन आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा ठोकला. एकाच दिवशी, एकाच वेळी होणार्‍या शिवसेनेच्या दोन मेळाव्यांनी यंदा केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे लक्ष वेधून घेतले. मेळाव्यासाठीचे पारंपरिक शिवाजी पार्क मैदान मिळवण्यापासून संघर्ष टिपेला पोहोचला होता. हे मैदान उद्धव ठाकरे गटाला मिळाल्यामुळे शिंदे गटाला बीकेसी मैदानावर जावे लागले. ते मैदान मोठ्या क्षमतेचे असल्यामुळे गर्दी जमवण्याचे आव्हान शिंदे गटापुढे होते.

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या लाखो लोकांनी मैदान हाऊसफुल्ल झाले आणि गर्दी जमवण्याची पहिली लढाई शिंदे गटाने जिंकली. तिकडे शिवाजी पार्क अर्धे रिकामे होते तोवर त्याहून दुप्पट मोठे असलेले बीकेसी मैदान भरले. त्यामुळे शक्तिप्रदर्शनाच्या लढाईत शिंदे गटाने बाजी मारल्याचे चित्र महाराष्ट्रासमोर गेले. अर्थात, गर्दी जमवली म्हणजे लोकप्रियतेवर किंवा पक्षाच्या अधिकृततेवर शिक्कामोर्तब झाले, असे मानता येणार नाही. कारण, त्यासाठीची लढाई खूप मोठी आहे आणि त्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागणार आहेत. अशा राजकीय लढाया अनेकदा प्रत्यक्ष मैदानात लढाव्या लागतात त्याचप्रमाणे त्या मानसिक पातळीवरही लढवाव्या लागतात. एकनाथ शिंदे गटाने त्याही पातळीवर बाजी मारल्याचे दिसून आले.

मेळाव्यामध्ये पुढचे पाऊल टाकताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे, स्नुषा स्मिता ठाकरे आणि नातू निहार ठाकरे आपल्यासोबत असल्याचे दाखवले. शिवसेना आणि ठाकरे हे नाते अतूट मानले जात असताना उद्धव ठाकरे वगळता सगळे ठाकरे कुटुंबीय आपल्यासोबत असल्याचे चित्र त्यांनी उभे केले. त्याशिवाय आनंद दिघे यांच्या भगिनीही उपस्थित होत्या. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे खरे वारस आपणच आहोत हे दाखवण्याचा शिंदे यांचा प्रयोग कमालीचा यशस्वी झाल्याचे दिसून आले. त्याअर्थाने शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला मात दिली. जनतेतील ताकद दोन्ही गटांनी दाखवून दिली. शिवसेनेतील फुटीची ही जनतेतील प्रतिक्रिया उभ्या महाराष्ट्राने बघितली.

राजकारणात संघर्ष अटळ असतो आणि काहीवेळा तो टिपेला पाहोचतो. अशावेळी शक्तिप्रदर्शन अपरिहार्य असते. ते दोन्ही गटांनी केले. शिवसेनेत फूट पडली असताना उद्धव ठाकरे यांनीही शिवाजी पार्क मैदान भरून दाखवले. शिवसेना संपलेली नाही हे त्यांनी दाखवून दिले. त्या द़ृष्टिकोनातून बघितले तर त्यांच्यासाठीही मेळावा बळ देणारा ठरला. शिवसैनिक कुणासोबत आहेत हे दाखवण्यासाठी हे शक्तिप्रदर्शन असले, तरी आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक हे त्यामागचे मूळ कारण होते. आता शक्तिप्रदर्शन होऊन गेले आहे. जी काही कायदेशीर लढाई आहे ती सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर सुरू राहील आणि तीच निर्णायक असेल. रस्त्यावरचा संघर्ष आणि शक्तिप्रदर्शनाने केवळ काम चालणार नाही.

त्याने सामान्य नागरिकांना उपद्रव होत राहील. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील मंत्र्यांनी आणखी गतीने कामाला लागायला हवे. मेळावे, सत्कार आणि देवदर्शनामध्ये बराचसा वेळ चालला आहे. तो सामान्य माणसांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी, सोडवण्यासाठी वापरला पाहिजे. शेतकरी, कष्टकरी, आदिवासी अशा विविध घटकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. उद्योगवाढीसाठी आणि त्या माध्यमातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी शक्तीचा वापर केला पाहिजे. राज्यातील जनतेने खड्ड्यांतूनच दसरा साजरा केला. आता किमान दिवाळीपूर्वी तरी काही सुधारणा होईल, याकडे जनतेचे लक्ष आहे.

लोकांच्या अपेक्षा खूप आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आता कंबर कसली पाहिजे. राज्य सरकारचे केंद्रातील सरकारशी चांगले संबंध आहेत त्याचा उपयोग महाराष्ट्राच्या हितासाठी करून घेतला पाहिजे. विरोधकांनीही केवळ उणीदुणी काढत बसून जनतेची करमणूक करून चालणार नाही. पक्षाचा आणि चिन्हाचा निर्णय काहीही लागला, तरी उद्धव ठाकरे यांच्यासमेार पक्षाची नव्याने उभारणी करण्याचे आव्हान आहे. लोकशाहीमध्ये सरकारची जबाबदारी असते. त्याहून अधिक विरोधकांची जबाबदारी असते याचे भान ठेवून भविष्यातील वाटचाल करायला हवी. विधायक राजकारण करतानाच लोकांच्या प्रश्नांवर सरकारला अडचणीत आणण्याचे काम केले, तर लोकांचा विश्वास कमावता येऊ शकेल.

महाराष्ट्र हे पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य आहे. सततच्या संघर्षामुळे राज्याची देशात चुकीची प्रतिमा निर्माण होत आहे, याचे भान सगळ्यांनीच ठेवण्याची आवश्यकता आहे. आपला वर्तनव्यवहार मराठी माणसांना राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर मान खाली घालायला लावणारा नसावा. ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा!’ सेनापती बापट यांच्या या ओळी ध्यानात घेऊन महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी प्रयत्न केले, तर ते सगळ्यांच्याच हिताचे ठरेल.

Back to top button