नियम बदलांनी काय साधणार? | पुढारी

नियम बदलांनी काय साधणार?

‘जंटलमन्स गेम’ म्हणून ओळखला जात असला तरी क्रिकेट या खेळाला नियमांचे कोंदण आहे. विशेषतः राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये या नियमांचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित होते. नियमांवर बोट ठेवून प्रतिस्पर्धी संघाला कमकुवत करण्याचे कसब खेळाडूंमध्ये असणे गरजेचे असते. दुसरीकडे या नियमांमुळे खेळातील रोमहर्षकताही वाढण्यास मदत होते. त्यामुळेच आता क्रिकेटसाठीच्या नियमांमध्ये नव्याने काही बदल करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी एमसीसीने सुचविलेल्या काही नियमांना सौरव गांगुली यांच्या मध्यस्थीने आयसीसीच्या चीफ एक्झिक्युटिव्ह समितीने मंजुरी दिली आहे. ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून सुरू होणारी टी-20 विश्वचषक ही स्पर्धासुद्धा या नव्या नियमांनुसारच होणार आहे. या नव्या बदललेल्या नियमांमुळे खेळावर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल असे नाही. कारण, यातील काही नियम यापूर्वीच लागू केलेले असून, ते एव्हाना रूढ झाले आहेत. उदाहरणार्थ, चेंडूवर खेळाडूने लाळ लावू नये, हा नियम कोरोना काळातच लागू केला आहे. आता गोलंदाजांची चेंडूला लाळ लावण्याची सवय पूर्णपणे मोडली आहे.

फलंदाज बाद झाल्यानंतर दुसर्‍या बाजूचा फलंदाज स्ट्राईकसाठी पोहोचला, तरी बाद झालेल्या फलंदाजाच्या जागी नवा फलंदाजच स्ट्राईकला असेल, हा नियमसुद्धा प्रायोगिक पद्धतीने वापरण्यात येत आहे. नव्या नियमात मंकडिंग आऊट नाहीसे केले आहे. आता या पद्धतीने बाद होणार्‍या फलंदाजाला धावबाद दिले जाणार आहे. यामुळे अशा पद्धतीने बाद होणार्‍यांवरील टीका कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, आयपीएल 2019 मध्ये रविचंद्रन अश्विनने जेव्हा जोस बॅटरला मंकडिंगने बाद केले होते, तेव्हा अश्विनवर टीका करण्यात आली होती. गोलंदाजी करत असताना अश्विनने पाहिले की, नॉन स्टायकर बटलर क्रिजच्या बाहेर गेला आहे; तेव्हा अश्विनने त्याचे स्टंप उडविले. ‘जंटलमन्स गेम’ समजल्या जाणार्‍या क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने बाद करण्यावरून मोठा वाद निर्माण झाला. आता अशा पद्धतीने नॉन स्ट्रायकर फलंदाज गोलंदाजीवेळी क्रिजबाहेर असेल आणि गोलंदाजाने स्टम्प चेंडूने उडविला तर फलंदाजाला धावबाद दिले जाणार आहे. भारतीय गोलंदाज विनू मंकडने बिल ब्राऊनला अशाच पद्धतीने बाद केले होते. त्यामुळे अशाप्रकारे फलंदाजाला बाद करण्याच्या पद्धतीला त्यांचेच नाव दिले गेले. मात्र, अशाप्रकारे बाद करण्याच्या पद्धतीला योग्य मानता येत नाही.

नव्या नियमानुसार एक फलंदाज बाद झाल्यानंतर आणि नवा फलंदाज क्रिजमध्ये पोहोचण्याची वेळ कमी करण्यात आली आहे. आतापर्यंत कसोटी सामन्यात आणि एकदिवसीय सामन्यात यासाठी तीन मिनिटांचा वेळ आणि टी-20 मध्ये 90 सेकंदांचा वेळ मिळत होता. आता टी-20 मधील मिळणार्‍या वेळेत काही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ही वेळ कमी करून दोन मिनिटांवर आणण्यात आली आहे. खरे तर 2000 सालापर्यंत नव्या फलंदाजाला क्रिजपर्यंत पोहोचण्यासाठी दोन मिनिटांचाच अवधी मिळत होता. मात्र, त्यानंतर ही वेळ वाढवून तीन मिनिटे करण्यात आली होती. आता नव्या नियमांनी पुन्हा ती पूर्वपदावर आणली आहे इतकेच! खेळादरम्यान 10-15 मिनिटे वेळ वाया जातो याकडे लक्ष गेल्यामुळे आयसीसीने नव्या नियमात हा बदल केला आहे. या नव्या नियमानुसार फलंदाजाने क्रिजवर यायला उशीर केला तर त्याला बाद करण्याची अपील केली जाऊ शकते आणि पंचांकडून ती स्वीकारलीही जाऊ शकते. अशा प्रकारे बाद होणारा हेरॉल्ड हेगेट हा पहिला फलंदाज होता. 1919 मध्ये त्याला अशा पद्धतीने बाद केले होेते. मात्र, त्यानंतर आजपर्यंत कुणालाही अशा पद्धतीने बाद दिले गेले नाही, हे विशेष!

– नितीन कुलकर्णी

Back to top button