रासायनिक खतांचे आव्हान | पुढारी

रासायनिक खतांचे आव्हान

हरितक्रांतीमुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असला, तरी शेतात अमर्यादित रासायनिक खतांच्या वापरामुळे लोकांची आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. वेगाने वाढणार्‍या कर्करोगामागेही रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर हे कारण असल्याचे समोर आले आहे.

शेतीचा कस राखण्यासाठी आणि अधिकाधिक उत्पादनासाठी शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. शेतातील मृदा परीक्षण न करताच आपल्या मनाप्रमाणे खतांचा भडिमार केला जात आहे. पूर्वी शेतकरी चक्रिय स्वरूपात शेती करत असत. म्हणजे जे पीक मागच्या वर्षी घेतले गेले, त्या शेतात यावर्षी ते पीक न पेरता दुसरे पीक घेण्यास प्राधान्य दिले जात असे. त्यामुळे पिकांना गरजेनुसार मातीतूनच आवश्यक घटक मिळत असत. सध्या मात्र अधिकाधिक फायद्याच्या दृष्टीने पिकांचा विचार केला जातो.

ज्या पिकामुळे अधिक उत्पन्न मिळते, तेच पीक दरवर्षी एकाच शेतात पेरले जाते. चक्रिय शेती पद्धतीत वेगवेगळी पिके आलटूनपालटून घेतल्यामुळे शेतातील मातीतच गरजेनुसार खनिजे तयार होत असत. याबरोबरच शेतात दोन-तीन पिकांच्या उत्पादनानंतर एक हंगाम काहीच पेरले जात नसे. एक हंगाम शेत पडिक ठेवले जात असे. त्यामुळे मातीचा कमी झालेला कस भरून काढण्यास मदत होई. साहजिकच, मातीचा कस वाढविण्यासाठी खतांचा वापर करण्याची गरज फारशी उद्भवत नसे. 1950-51 मध्ये भारतीय शेतकरी केवळ सात लाख टन रासायनिक खतांचा वापर करीत होते. आज हा आकडा 310 लाख टनांवर गेला आहे. यापैकी 70 लाख टन रासायनिक खते विदेशातून आयात करावी लागतात.

संबंधित बातम्या

केंद्रीय रासायने आणि खते तसेच अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी अलीकडेच लोकसभेत दिलेल्या एका लेखी उत्तरानुसार, देशात युरिया, डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट), एमओपी (म्यूरेट ऑफ पोटॅश), एनपीकेएस (नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम) या चार खतांची एकूण मागणी 2017-18 मध्ये 528.86 लाख मेट्रिक टन इतकी होती. 2021-22 मध्ये त्यात 21 टक्क्यांनी वाढ होऊन हा आकडा 640.27 लाख मेट्रिक टनांवर पोहोचला आहेे. यामध्ये सर्वाधिक वृद्धी (25.44 टक्के) डीएपीची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 2017-18 मध्ये डीएपीची मागणी 98.77 लाख मेट्रिक टन होती; ती वाढून 2021-22 मध्ये 123.9 लाख मेट्रिक टन झाली आहे. देशात सर्वाधिक वापर करण्यात येणारे रासायनिक खत म्हणजे युरिया. युरियाच्या वापरात मागील पाच वर्षांत 19.64 टक्के वाढ झाली आहे. 2017-18 मध्ये युरियाला असणारी मागणी 298 लाख मेट्रिक टन इतकी होती. ती 2021-22 मध्ये 356.53 लाख मेट्रिक टनांवर पोहोचली. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, रासायनिक खतांचा वापर बेसुमार वाढला आहे.

रासायनिक खतांमुळे शेती उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे, हे वास्तव आहे; परंतु त्याच वेळी शेतजमिनींबरोबरच भवतालच्या पर्यावरणावर याचा प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. रासायनिक खतांच्या मार्‍यामुळे मातीचा कस कमालीचा खालावतो आहे. तसेच माती क्षारयुक्त होत आहे. अशी माती पीक उत्पादन घेण्याच्या क्षमतेची राहात नाही. त्यामुळे वर्षांनुवर्षे रासानिक खतांचा वापर केल्या जाणार्‍या काही शेतांमधून उत्पादनात लक्षणीय घट होत असल्याच्या तक्रारीसुद्धा यायला सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हे तर युरिया आणि डीएपीसारख्या खतांचा अधिकाधिक वापर केल्यामुळे मातीतील नैसर्गिक तत्त्वे लोप पावत आहेत. त्यामुळे मातीच्या कणांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे. रासायनिक खतांमुळे होणार्‍या नुकसानीचा विचार करता जलमार्ग प्रदूषण, अधिक रासायनिक खतांच्या वाढत्या प्रमाणामुळे पीक करपणे, वायूप्रदूषण, मातीचे आम्लीकरण आणि मातीतील खनिजे कमी होणे असे अनेक धोके उद्भवत आहेत.

– योगेश मिश्र, विश्लेषक

Back to top button